जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 20 July 2026

विशेष वृत्त... आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने भात उत्पादन वाढीस गती; विविध पद्धतींचा प्रचार व नियोजन

 


गोंदिया, दि.20 : भात पिकामधील उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित पद्धतीचा अवलंब आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी विविध उपाययोजना आणि लागवड पद्धतींचे नियोजन करण्यात आले असून, त्यातून उत्पादनवाढीस मोठी मदत होणार आहे.

भात पिकासाठी बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया मोहिम राबविणे, बियाणे स्वउत्पादनाबाबत जनजागृती करणे, तसेच संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर वाढविणे यावर विशेष भर दिला जात आहे. गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करणे, श्री पद्धत, पट्टा पद्धती तसेच यंत्राद्वारे पेरणी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठीही मोहिमा राबविल्या जात आहेत.

याशिवाय, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अझोला व हिरवळीच्या खतांचा वापर, तसेच माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जात आहे. युरिया ब्रिकेट्सचा वापर वाढवून खर्चात बचत व उत्पादनात वाढ साध्य करण्याचा प्रयत्न आहे.

भात लागवडीसाठी विविध पद्धतींचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत. श्री पद्धतीमुळे बियाणे, पाणी व वेळेची बचत होऊन उत्पादन वाढते. पट्टा पद्धतीमुळे रोग व कीड नियंत्रण सुलभ होते. यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास मजुरी खर्चात ६० टक्क्यांपर्यंत बचत होते. डीएसआर (DSR) व एसआरटी (SRT) पद्धतींमुळे पाण्याची बचत आणि उत्पादनात वाढ होते. तसेच यंत्राद्वारे पेरणीमुळे योग्य अंतर राखले जाऊन तण नियंत्रण सुलभ होते.

या सर्व पद्धतींच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ६४ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री पद्धतीसाठी सुमारे २४ हजार हेक्टर, पट्टा पद्धतीसाठी २८ हजार हेक्टर, यांत्रिक लागवडीसाठी २९ हजार हेक्टर, डीएसआर (DSR) साठी ६ हजार हेक्टर, एसआरटी (SRT) साठी १ हजार हेक्टर आणि यंत्राद्वारे पेरणीसाठी ८०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

तसेच, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत भात, हरभरा व मका पिकांसाठी अनुक्रमे ४३०, ५००, ३५० व ० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून, एकूण १७,५२७ लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

एकूणच, आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित पद्धती आणि प्रभावी नियोजन यांच्या माध्यमातून भात उत्पादन वाढविण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment