जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 9 July 2026

जिल्ह्यातील दोन प्रगतशील शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

 



वर्ष 2026 साठी पात्र शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

         गोंदिया, दि.9 : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील प्रिती टेंभरे यांना जिजामाता कृषीभूषण पुरस्काराने तर दादा फुंडे यांना उद्यान पंडीत पुरस्काराने राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.

         राज्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा एक जुलै कृषी दिनानिमित्त वरळी, मुंबई येथे कृषि विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम राज्यपाल यांच्या अध्यक्षतेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी, शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

         कृषी पुरस्कारांची माहिती : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध गटांमध्ये कृषी पुरस्कार प्रदान केले जातात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, सेंद्रिय शेती कृषीभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यान पंडीत, युवा शेतकरी आणि शेतीनिष्ठ शेतकरी असे आठ प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार शेती, फलोत्पादन व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था व गटांना दिले जातात.

          प्रिती ऋषी टेंभरे (चुटिया, ता.गोंदिया) जिजामाता कृषी पुरस्काराने सन्मानित : सौ. प्रिती टेंभरे यांना सन 2023 चा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार केवळ महिला शेतकऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कृषी कार्यासाठी दिला जातो. त्यांनी गांडूळ खत व अझोला उत्पादन युनिट उभारून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे. भात पिकासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड, फळ-भाजीपाला लागवडीसाठी उत्तम रोपे व कलमे, तसेच फेरोमन सापळे व पक्षी थांबे यांचा वापर करून त्यांनी आधुनिक शेती पद्धती आत्मसात केल्या आहेत. पंचायत समिती गोंदियातर्फेही त्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून गौरवण्यात आले आहे.

          दादा रामाजी फुंडे (खैरी, ता.अर्जुनी मोरगाव) उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित : श्री. दादा फुंडे यांना सन 2023 चा उद्यान पंडीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यांनी आंबा, पेरू, चिकू, सीताफळ तसेच विविध भाजीपाला पिकांची यशस्वी लागवड केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेद्वारे त्यांनी दर्जेदार रोपे तयार करून विक्री केली असून सेंद्रिय शेती तंत्रांचा प्रभावी वापर केला आहे.

         गोंदिया जिल्ह्यातील या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या कार्यातून इतरांसाठी आदर्श निर्माण केला असून त्यांच्या यशामुळे जिल्ह्याचा गौरव वाढला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी व्यक्त केली

                                   वर्ष 2026 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

       कृषी विभागामार्फत पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हा कालावधी विचारात घेतला जातो. वर्ष 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक शेतकरी, संस्था व गटांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. यासाठी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील कृषी पुरस्कार टॅबमध्ये स्वतंत्र प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कानवडे यांनी पात्र इच्छुकांनी वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.

                                                               0000000

No comments:

Post a Comment