जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 2 July 2026

राजकीय पक्ष व माध्यमांनी पुनरीक्षणाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी : जिल्हाधिकारी मंदार पत्की

 


                

         गोंदिया, दि.2 : भारतीय निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला अत्यंत महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांनी नागरिकांपर्यंत अचूक व योग्य माहिती पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले.

          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व माध्यमांना पुनरीक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली.

          जिल्हाधिकारी पत्की यांनी सांगितले की, शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने शाळा सुरू होण्यापूर्वी तसेच सुटल्यानंतर पुनरीक्षणाचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित भागातील मतदारांशी थेट घरी भेटून संपर्क साधणे शक्य होईल आणि प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविता येईल.

          तसेच, मतदारांनी मागील पुनरीक्षणातील मतदार यादीत आपले व आपल्या कुटुंबीयांचे नाव अधिकृत संकेतस्थळावर तपासावे व आवश्यक असल्यास घोषणापत्र भरावे, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही सहाय्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

          जर मतदार यादीतील माहिती उपलब्ध नसल्यास किंवा डेटाबेसशी जुळत नसल्यास संबंधित मतदाराला मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडून नोटीस दिली जाईल. अशा वेळी मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल.

           जन्मतारखेच्या आधारे आवश्यक कागदपत्रे :

१ जुलै १९८७ पूर्वी जन्म : स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे कोणतेही एक कागदपत्र.

१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान जन्म : स्वतःचे तसेच आई-वडिलांपैकी एकाचे जन्मतारीख/जन्मस्थळ सिद्ध करणारे कागदपत्र.

२ डिसेंबर २००४ नंतर जन्म : स्वतःचे तसेच आई-वडिल दोघांचे जन्मतारीख/जन्मस्थळ सिद्ध करणारे कागदपत्र आवश्यक.

       विशेष बाबी : पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास, त्यांच्या वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करावी. भारताबाहेर जन्म झाल्यास, संबंधित भारतीय दूतावासाने दिलेल्या जन्मनोंदणीचा पुरावा आवश्यक. नागरिकत्व नोंदणी/नैसर्गिकीकरणाद्वारे नागरिकत्व मिळाल्यास, त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

      स्वीकार्य कागदपत्रांची सूचक यादी : शासकीय/अर्धशासकीय ओळखपत्र किंवा निवृत्ती आदेश. १ जुलै १९८७ पूर्वीचे शासकीय प्रमाणपत्र. जन्म प्रमाणपत्र. पासपोर्ट. शैक्षणिक प्रमाणपत्र (मॅट्रिक/इ.). कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र. वनहक्क प्रमाणपत्र. जात प्रमाणपत्र. राष्ट्रीय नागरिक नोंदवही (लागू असल्यास). शासकीय नोंदीतील कौटुंबिक नोंदवही. जमीन/घर वाटप प्रमाणपत्र. आधार संदर्भातील निर्देश निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू राहतील.

         नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या 1950 या क्रमांकावर आपल्या समस्या मांडाव्यात.

         जिल्हाधिकारी पत्की यांनी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करून मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक करण्याचे आवाहन केले.

                                                               00000000

No comments:

Post a Comment