


‘राजस्व-समाधान’ शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदिया दि. 29 :
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण
करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज ‘राजस्व-समाधान’
(शिकायत निवारण) शिविर विजयलक्ष्मी हॉल, आमगाव येथे नुकतेच संपन्न झाले.
या शिबीराला जिल्हाधिकारी
मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला
असून एकूण 2470 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन
आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद
उपाध्यक्ष सुरेश हर्षे, पंचायत समिती आमगावच्या सभापती योगिताबाई पुंडे, सालेकसा
सभापती विनताई कटरे, देवरी सभापती अनिलकुमार भिसेन जिल्हाधिकारी मंदार पत्की,
यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात तहसीलदार
मोनिका कांबळे यांनी शिबीराची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी मंदार
पत्की यांनी आमगाव, देवरी व सालेकसा येथील महसूल यंत्रणा, तहसीलदार व उपविभागीय
अधिकारी यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच नागरिकांनी शासनाच्या
योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
शिविरात महिलांना ‘शेतकरी’
दर्जा देणारी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच गावठाण वस्तीतील नागरिकांना
मालकी हक्काच्या सनदा देण्यात आल्या. मुख्यमंत्री बलिराजा शेत/फार्म ऍक्सेस रोड
योजनेला मंजुरी देण्यात आली असून शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित
करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.
याशिवाय ‘प्रिव्हेन्शन ऑफ
फ्रॅगमेंटेशन अॅक्ट’ अंतर्गत स्थानिक क्षेत्रांची घोषणा, ‘जीवंत सातबारा’ अभियान,
विस्थापितांच्या जमिनींना फ्री-होल्ड करण्यासाठी ‘स्पेशल अमनेस्टी स्कीम-2025’ ला
मुदतवाढ, राजमाता जिजाऊ महिला सशक्तीकरण योजना, आवास योजनेतील विशेष प्रावधान,
कुंभार समाजासाठी सवलती तसेच कृषी जमिनीच्या कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी
यांसारख्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
कार्यक्रमात आमदार संजय
पुराम यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच
अधिकाऱ्यांना प्राप्त तक्रारींचे तातडीने व प्रभावी निवारण करण्याच्या सूचना
दिल्या.
शिविरात केंद्र, राज्य व
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन
करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास मोठी मदत झाल्याचे
समाधान व्यक्त करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment