गोंदिया, दि.13 : गोंदिया जिल्ह्यातील
चुटिया येथील प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती प्रिती ऋषी टेंभरे यांना ‘जिजामाता
कृषिभूषण पुरस्कार वर्ष 2023’ प्रदान करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,
पूरक व्यवसायांची जोड आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी शेतीत उल्लेखनीय
यश संपादन केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना विद्यमान
राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्रीमती टेंभरे यांनी आपल्या शेतात सौर
ऊर्जा युनिट, सौर पंप आणि बायोगॅस युनिटची स्थापना करून ऊर्जा बचत साधली आहे.
मजुरी खर्च कमी करण्यासाठी ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मल्चिंग व गवत कापणी यंत्रांचा
प्रभावी वापर केला. तसेच 60 ते 80 गाईंचे संगोपन करत पंचगव्य आधारित उत्पादने तयार
करून दुग्धव्यवसायालाही चालना दिली आहे.
‘योगी’ ब्रँडच्या माध्यमातून त्यांनी
दुग्धजन्य पदार्थांची थेट विक्री सुरू केली असून स्थानिक बाजारपेठेबरोबरच शहरी
भागातही विक्रीचे जाळे उभे केले आहे. कोरोना काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून
देत देशी गाईंच्या शेणापासून राखी तयार करण्याचा उपक्रमही त्यांनी राबवला,
ज्यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे.
याशिवाय ‘लक्ष्मी’ कृषी पर्यटन केंद्र
उभारून कृषी पर्यटन व्यवसायाला चालना दिली आहे. ‘लक्ष्मी शेतकरी उत्पादक संघ’ व
‘लीलावती अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनी’च्या माध्यमातून शेतकरी हिताचे विविध उपक्रम
राबवले जात आहेत. गेल्या 12 वर्षांपासून सेंद्रिय शेती व गोपालन विषयावर शेतकरी
मेळावे आणि प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण देण्याचे कामही त्या सातत्याने करत आहेत.
शेतीतील पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक
सिंचन आणि शेततळ्यांचा वापर करून पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन त्यांनी केले
आहे. फेरोमोन सापळे व पक्षी थांबे यांसारख्या उपाययोजनांमुळे पर्यावरणपूरक शेतीला
त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.
श्रीमती प्रिती टेंभरे यांच्या या
यशस्वी वाटचालीमुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरत असून
महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
00000000
No comments:
Post a Comment