जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 10 July 2026

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन-14567 सुरु

 


       गोंदिया, दि.10 : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तन्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक/मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि.९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे.

          सदर शासन निर्णयामध्ये नमूद बाबींकरिता ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अशी करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतुदीन्वये महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन परिपत्रकानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन-१४५६७ संबधी विविध शासकीय विभागांमार्फत जनजागृती आणि सहकार्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

          देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ (National Helpline For Senior Citizens - १४५६७) सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे.

         या राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे, तसेच अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेणे आणि चांगली सेवा देणे हा आहे.

         राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याव्दारे चालविण्यात येत आहे.

         सदर हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शक आणि भावनिक आधार प्रदान करते. तसेच बेघर वृध्द व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

         ज्येष्ठ नागरिकांना घरी चांगली वागणूक मिळत नाही. परिणामी त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या प्रकृतीवरही वाईट परिणाम होतो. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक/ मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे. घरी त्यांना मान व सन्मान मिळावा, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना जीवनात सकारात्मक बदल घडविणे, तसेच अत्याचारग्रस्त वृध्द व्यक्तींची काळजी घेणे यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन - १४५६७ सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा उपयोग जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment