जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 27 July 2026

गोंदिया जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेला वेग : ५५८ याद्या जाहीर, शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे!

 



गोंदिया, दि.27 : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कामकाजाला गती मिळाली असून पात्र शेतकऱ्यांच्या नावांच्या एकूण ५५८ (V.K. List) याद्या संबंधित बँकांकडून प्राप्त होऊन अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी मंदार पत्की तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली या याद्या २५ जुलै २०२६ रोजी बँक शाखा, सहकारी संस्था आणि गावपातळीवरील फलकांवर जाहीर करण्यात आल्या. या प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी बँक स्तरावर २९ पंचनामे, तर संस्था/गाव पातळीवर ३२९ पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरण (KYC) करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्ह्यात ७५२ ‘आपले सेवा केंद्रे’ उपलब्ध करून देण्यात आली असून, तेथे आवश्यक मार्गदर्शक सूचना (SOP) देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

यादीत आपले नाव असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी विलंब न करता जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गोंदिया यांनी केले आहे.

ही योजना शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, प्रशासनाकडून पारदर्शक आणि वेगवान अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.

00000000

No comments:

Post a Comment