नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत
शेतकऱ्यांना सुवर्णसंधी
प्रक्रिया युनिट व गोदामासाठी ६०% अनुदान
गोंदिया, दि. २९ : नानाजी देशमुख
कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा–२ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या
(FPO/FPC) व महिला बचत गटांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कृषी मूल्यसाखळी बळकट
करणे, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि शेतमाल साठवण क्षमता
वाढविण्याच्या उद्देशाने प्रक्रिया युनिट व गोदाम उभारणीसाठी शासनाकडून आर्थिक
सहाय्य दिले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पात्र संस्थांना
प्रकल्प खर्चाच्या तब्बल ६० टक्के अनुदान मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी
गटांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. स्थानिक स्तरावरच शेतमाल प्रक्रिया
करून त्याला अधिक मूल्य मिळवून देणे, काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे तसेच
बाजारपेठेशी थेट जोडणी निर्माण करणे, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या प्रकल्पात कृषी प्रक्रिया
युनिट उभारणी, गोदाम बांधकाम, मूल्यवर्धन व पॅकेजिंग सुविधा, वैज्ञानिक साठवण
व्यवस्था आणि बाजारपेठेशी थेट जोडणी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.
यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटांची आर्थिक क्षमता वाढण्यास मदत
होणार असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष
(DPIU), गोंदिया यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या,
महिला स्वयं सहायता गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM,
MAVIM), गावसंघ, प्रभाग संघ, लोक संचालित साधन केंद्र, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट
तसेच पेसा क्षेत्रातील ग्रामसभा व ग्रामपंचायतींना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
इच्छुक संस्थांनी संबंधित तालुका
कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष,
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (आत्मा), कारंजा, गोंदिया येथे त्वरित संपर्क
साधून आवश्यक मार्गदर्शन, तांत्रिक माहिती व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा,
असेही कळविण्यात आले आहे.
शासनाने निश्चित केलेल्या
निकषांनुसार व निर्धारित कालमर्यादेत प्रस्ताव सादर केल्यास या योजनेचा लाभ मिळू
शकणार आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
(पोकरा), आत्मा, गोंदिया यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment