जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 2 July 2026

'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' योजने‌द्वारे युवकांना स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी

 

 

       गोंदिया, दि.2 : पर्यावरण संवर्धन, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उ‌द्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभर ‘अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा व्यापक लाभ गोंदिया जिल्ह्यातील युवक, महिला व उ‌द्योजकांना मिळावा यासाठी अमृत जिल्हा कार्यालयाकडून विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

           इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे भविष्यात शहरांसह ग्रामीण भागातही ईव्ही चार्जिंग स्टेशनची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होणार आहे. या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याने अमृतने युवक-युवती, महिला उ‌द्योजक, स्वयंसहाय्यता गट, एमएसएमई उ‌द्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच ग्रामीण भागातील इच्छुक नागरिकांसाठी हा विशेष उपक्रम सुरु केला आहे.

          योजनेअंतर्गत उपलब्ध सुविधा : ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी. संचालन व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण. चार्जिंग उपकरणांची देखभाल व तांत्रिक मार्गदर्शन. सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा व ग्रीन एनर्जी सेवा. प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास मदत. व्यवसाय नियोजन, बाजारपेठ अभ्यास व आर्थिक नियोजन. विविध शासकीय योजनांची माहिती. अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ.

          ऑनलाईन अर्ज प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'योजना' 'विशेष योजना' 'EV Charging Station Partner' या पर्यायातून ऑनलाईन अर्ज करावा.

          प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, EWS / उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (TC), बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, स्वाक्षरी इत्यादी.

          ग्रामीण भागासाठी विशेष संधी : ग्रामीण भागात चार्जिंग हब उभारणी, ईव्ही सेवा केंद्रे, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, इलेक्ट्रिकल देखभाल, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि ईव्ही उपकरण विक्री व सेवा या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार व उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.

         अधिक माहितीकरीता जिल्हा व्यवस्थापक अमृत कार्तिक तिवारी मो. ९११२२२८७७६ यावर संपर्क साधावा. असे जिल्हा व्यवस्थापक अमृत, गोंदिया यांनी कळविले आहे.

00000000

No comments:

Post a Comment