जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Sunday, 18 October 2026

बोदलकसा डॅम प्रेसनोट...

 


             गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत असलेला बोदलकसा मध्यम हा ब्रिटिशकालीन असून त्याचे बांधकाम १९१७ साली पूर्ण झाले होते. सदर धरणास १०९ वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाची धरण पाळ दि.२२.१०.२०२६ रोजी डाव्या कालव्याच्या विमोचकाचा जवळून फुटल्याचे सकाळी ६.३० वाजता माहिती मिळताच मा. श्री. विजय रहांगडाले, आमदार, गोरेगाव-तिरोडा मतदार संघ, मा. श्री. ज. द. टाले, कार्यकारी संचालक, वि.पा.वि.म. नागपूर, मा. श्री. मंदार पत्की, जिल्हाधिकारी, गोंदिया, मा. श्रीमती सोनाली चोपडे, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर, श्री. राजेश पाटील, अधीक्षक अभियंता, भंडारा सिंचन मंडळ, भंडारा, यांनी घटनास्थळाची पाहणी करून फुटलेल्या धरण पाळीचे तातडीने दुरुस्ती करून वाहणारा विसर्ग बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी मा. श्री. ज. द. टाले, कार्यकारी संचालक, मा. श्रीमती सोनाली चोपडे, मुख्य अभियंता, श्री. राजेश पाटील, अधीक्षक अभियंता, यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२.१०.२०२६ पासून जलसंपदा विभागाच्या अधिकारी श्री. राजीव कुरेकर, कार्यकारी अभियंता, श्री. संजीव सहारे, उपकार्यकारी अभियंता, श्री. चंद्रकांत डोंगरे, उपविभागीय अभियंता, श्री. अभिषेक यादव, कनिष्ठ अभियंता तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर केलेल्या कामामुळे आज दि.१७.१०.२०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता फुटलेल्या धरण पाळीतून वाहणारा विसर्ग बंद करण्यात यश प्राप्त झाले आहे त्यावेळी धरणामध्ये ७.६८२ दलघमी जीवित पाणीसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ५०.२४ % आहे. तरी प्रकल्पाच्या मुख्य विमोचकामधून डाव्या कालव्यावरील खरीप सिंचनाचे काम सुरळीत सुरू आहे. फुटलेल्या भागातून विसर्ग थांबविल्यामुळे धरणाच्या खालील भागास कोणताही धोका राहिलेला नाही तसेच फुटलेल्या भागातून वाहणाऱ्या विसर्गाचे योग्यप्रकारे नियंत्रण केल्यामुळे धरणाच्या खालील गावांना व शेतीमधील पिकांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. धरणाचे संकल्पन इत्यादी पूर्ण करून पाळ फुटलेल्या ठिकाणाचे व सांडव्याचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येईल.
             सदर आकस्मिक कामामध्ये मा. श्री प्रशांत पडोळे, खासदार भंडारा गोंदिया क्षेत्र, मा. श्री विजय रहांगडाले, आमदार, गोरेगाव-तिरोडा मतदार संघ, मा. प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मा. सचिव, लाभक्षेत्र, मा. जिल्हाधिकारी, गोंदिया, महसूल यंत्रणा, पोलिस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
                                                                                                                                                                    (स्वाक्षरी)
कार्यकारी अभियंता
गोंदिया पाटबंधारे विभाग
गोंदिया

वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 


गोंदिया, दि. 18 : वन्यजीव व पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत नागझिरा फाउंडेशनच्या वतीने स्थानिक गुजराती बालक मंदिर, रेलटोली, गोंदिया येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव संवर्धनाबाबत नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गोंदियातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक व निसर्गप्रेमी डॉ. राजेंद्र जैन यांनी भारतातील विविध राष्ट्रीय उद्यानांमध्ये टिपलेली पक्षी व वन्यप्राण्यांची मनमोहक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. विविध प्रजातींचे पक्षी, वन्यप्राणी तसेच त्यांचे नैसर्गिक अधिवास यांची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाची माहिती प्रत्यक्ष छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवता आली.
प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमती वर्षाबेन पटेल यांच्या हस्ते रविवार, दि. 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले. उद्घाटनानंतर नागरिक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देत छायाचित्रांचे अवलोकन केले.
जिल्हाधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती अंजू कांबळे निमसरकर यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन छायाचित्रांचे अवलोकन केले. त्यांनी प्रदर्शनाचे कौतुक करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
हे प्रदर्शन गोंदियातील ज्येष्ठ वन्यजीव व पक्षीप्रेमी स्वर्गीय श्री. भरतभाई जसानी यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले असल्याचे आयोजक डॉ. राजेंद्र जैन यांनी सांगितले. वन्यजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राजेंद्र जैन यांच्यासह श्री. अजय वडेरा, श्री. सुनील धोटे, श्री. दिनेशभाई पटेल, श्री. अवनेश मेहता, श्री. जगेश निमोनकर, श्री. मुकुंद धुर्वे, श्री. रुपेश निम्बार्ते, श्री. जावेर चावडा, श्री. सावंत बाहेकर, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सतीश जैसवाल, श्रीमती स्मृती छपरिया, श्री. राकेश रजक तसेच इतरांनी परिश्रम घेतले.
0000000

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांचे आदेश



गोंदिया, दि. 18 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया खुल्या, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, तसेच मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी १६ ऑक्टोबर रोजी हे आदेश निर्गमित केले आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे, मतदारांवर प्रभाव टाकणे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता लक्षात घेऊन हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतदान पथके २२ ऑक्टोबर रोजी मतदान साहित्यांसह केंद्रांवर पोहोचणार असल्याने मतदान साहित्याच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणेही आवश्यक आहे.
*मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात विविध कृतींना मनाई*
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या १०० मीटर त्रिज्येच्या परिसरात प्रचार करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, शस्त्रे बाळगणे, मतदारांना आमिष दाखविणे, मतदारांना मतदानापासून रोखणे, धूम्रपान करणे तसेच ज्वलनशील पदार्थ नेणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या परिसरात ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपकासारख्या उपकरणांचा वापर करणे अथवा चालविण्यास मनाई राहील. तसेच १०० मीटरच्या बाहेरील भागातून ध्वनिक्षेपकांचा वापर करून मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी किंवा मतदानासाठी येणाऱ्या मतदारांच्या कामात अडथळा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही.
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणण्यास, मतदारांची ने-आण करण्यासाठी अनधिकृतपणे वाहनांचा वापर करण्यास, राजकीय नेत्यांचे छायाचित्र किंवा पक्षचिन्हे लावण्यास तसेच घोषणा देण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय या परिसरात हॉटेल, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन आणि फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही.
*राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यालयांवरही निर्बंध*
मतदान केंद्रापासून २०० मीटर त्रिज्येच्या परिसरात राजकीय पक्षांची किंवा उमेदवारांची प्रचार कार्यालये उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आणि मतदान केंद्रांच्या परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी या निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे.
*२२ ऑक्टोबरपासून आदेशाची अंमलबजावणी*
हे आदेश २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
मात्र, निवडणुकीचे कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच मतदानासाठी येणारे मतदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000000

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


21 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजल्यापासून प्रचारासाठी आलेल्या बाहेरील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्ह्यात थांबण्यास मनाई; ध्वनिक्षेपक वापरावरही बंदी
गोंदिया, दि. 18 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १२६ नुसार मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर निवडणूक प्रचाराची मुदत संपणार आहे. या कालावधीत मतदारसंघातील मतदार नसलेल्या राजकीय पदाधिकारी, पक्षकार्यकर्ते, प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्ती तसेच स्टार प्रचारकांकडून प्रचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
आदेशानुसार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार नसलेल्या सर्व राजकीय पदाधिकारी, पक्षकार्यकर्ते, प्रचार व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती आणि प्रचारासाठी आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, संबंधित मतदारसंघातील मतदार असलेल्या व्यक्तींना तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना या तरतुदीतून सूट देण्यात आली आहे.
तसेच, पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास व फिरण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तथापि, घरोघरी जाऊन निवडणूक प्रचार करणे किंवा मतदारांच्या घरी भेट देणे यासाठी हा निर्बंध लागू राहणार नाही. अंत्ययात्रा, विवाह समारंभ तसेच धार्मिक कार्यक्रमांतर्गत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांनाही या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.
२१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजल्यापासून २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. मतदान संपण्यापूर्वीच्या ४८ तासांच्या कालावधीत ध्वनिक्षेपकाच्या वापरावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
0000000

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

 

गोंदिया, दि. 18 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ज्या तालुक्यांच्या ठिकाणी शुक्रवारी आठवडी बाजार भरतो, तेथील बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
मतदानाच्या दिवशी संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी आठवडी बाजार भरल्यास नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन, मतदान केंद्रांवरील व्यवस्थापन आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी, २२ ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर मतदान साहित्य आणि मतदान पथके पोहोचणार असल्याने निवडणूक व्यवस्थेची सुरक्षितता व सुरळीत कार्यवाही सुनिश्चित करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
बाजार व जत्रा अधिनियम, १८६२ मधील कलम ५ (अ) व (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी ज्या तालुक्यांच्या ठिकाणी शुक्रवारचा आठवडी बाजार भरतो, तेथील बाजार बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000000

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण संपन्न

 

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी योग्य पसंतीक्रम नोंदविण्याचे आवाहन; मतदारांनी मतदार यादीतील नाव तपासावे
गोंदिया, दि. 18 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणूक-2026 च्या अनुषंगाने पदवीधर मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी आणि मतदान करताना कोणतीही चूक होऊ नये, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी तथा पदवीधर मतदारसंघाचे नोडल अधिकारी (प्रशिक्षण) चंद्रभान खंडाईत आणि उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशिक्षणादरम्यान, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करावे, मतपत्रिकेवर उमेदवारांना पसंतीक्रम कसा द्यावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी मतदानाच्या निर्धारित नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
*मतदान करताना जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा*
मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेसोबत पुरविण्यात येणाऱ्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल किंवा लेखनाचे साधन वापरू नये. मतपत्रिकेवर प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमाच्या रकान्यात ‘1’ हा अंक लिहिणे अनिवार्य आहे. हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच नोंदवावा.
मतदारांना त्यांच्या पसंतीनुसार इतर उमेदवारांसाठी ‘2’, ‘3’, ‘4’ असे पुढील पसंतीक्रम नोंदविता येतील. मात्र, पहिल्या पसंतीव्यतिरिक्त इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहे. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर वेगळाच पसंतीक्रम नोंदवावा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर लिहू नये. पसंतीक्रम अंकांमध्येच दर्शवावा; शब्दांमध्ये लिहू नये.
मतपत्रिकेवर मतदाराने स्वतःचे नाव, स्वाक्षरी, आद्याक्षरे, अंगठ्याचा ठसा किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खूण करू नये. पसंती दर्शविण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर ‘✓’ किंवा ‘X’ अशी खूण न करता केवळ निर्धारित अंकांचा वापर करावा.
*चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यास मतपत्रिका अवैध ठरण्याची शक्यता*
मतपत्रिकेवर प्रथम पसंतीचा ‘1’ हा अंक न लिहिणे, तो एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर लिहिणे किंवा कोणत्या उमेदवाराला प्रथम पसंती दिली आहे, याबाबत संदिग्धता निर्माण होईल अशा पद्धतीने अंक नोंदविणे, अशा परिस्थितीत मतपत्रिका अवैध ठरू शकते. तसेच एकाच उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ सोबत इतर पसंतीक्रम लिहिणे, पसंतीक्रम शब्दांत नमूद करणे, मतदाराची ओळख पटविणारी खूण करणे किंवा निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या स्केच पेनऐवजी अन्य साधनाचा वापर करणे, या बाबी टाळणे आवश्यक आहे.
*मतदार यादीतील नाव तपासण्याचे आवाहन*
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. यासाठी https://mahaelection.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन मतदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मतदारांनी मतदानाच्या नियमांची योग्य माहिती घेऊन, निर्धारित प्रक्रियेनुसार मतदान करावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले.
00000000

Friday, 16 October 2026

पदवीधर मतदारांसाठी रविवारी मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

 

गोंदिया, दि. 16 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना मतदानाची प्रक्रिया सुलभपणे समजावी, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण रविवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांनी मतदानाच्या दिवशी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी, मतदानपत्रिकेवर पसंतीक्रम कसा नोंदवावा, मतदान करताना कोणती काळजी घ्यावी, तसेच मतदानाची संपूर्ण पद्धत याबाबत प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पदवीधर मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सर्वसाधारण निवडणुकीपेक्षा वेगळी असल्याने मतदारांना त्याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. मतदानपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदविताना कोणती पद्धत वापरावी, मतपत्रिका वैध राहण्यासाठी कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी, तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा कसा वापर करावा, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे.
मतदारांनी मतदानाच्या दिवशी कोणती कागदपत्रे किंवा ओळखपत्र सोबत आणावे, मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतरची प्रक्रिया काय असेल, मतदारांची ओळख पडताळणी कशी केली जाईल आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका कशी हाताळली जाते, याबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र पदवीधर मतदारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन मतदान प्रक्रियेची माहिती करून घ्यावी आणि दि. 23 ऑक्टोबर रोजी मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मताला महत्त्व असून, पदवीधर मतदारांनी मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000000