जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Tuesday, 18 August 2026
शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक व आधार प्रमाणीकरण महत्वाचे
गोंदिया, दि.18 : शासनाच्या विविध शेतकरी कल्याणकारी योजना, अनुदान तसेच
विविध सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी
(Farmer ID) तयार करणे आणि आधार प्रमाणीकरण (e-KYC) करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी
ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा
प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना विविध विभागाच्या माध्यमातून कृषीविषयक तसेच आर्थिक
स्वरूपाच्या योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये सहकार विभाग, पणन विभाग, कृषी विभाग,
पुरवठा विभाग आणि वन विभागाशी संबंधित योजनांचा समावेश आहे. योजनांचा लाभ देताना
लाभार्थ्याची अचूक ओळख निश्चित करण्यासाठी तसेच लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्यासाठी ॲग्रीस्टॅक व आधार प्रमाणीकरण करुन घेणे अनिवार्य आहे.
ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून, त्यामध्ये
शेतकरी आणि त्यांच्या शेतीशी संबंधित विविध माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध होते.
त्यामुळे भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देताना शेतकऱ्यांची माहिती
पडताळणे अधिक सुलभ होते.
15
ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी झालेल्या समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री
इंद्रनील नाईक यांनीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी
(Farmer ID) लवकरात लवकर तयार करण्याचे आवाहन केलेले आहे. वन विभागाच्या जमिनी तीन
पिढ्यांपासून कसणाऱ्या वनपट्टेधारकांनी सुध्दा ॲग्रीस्टॅक करण्याचे शासनाने
निर्देशित केले असून त्यांनीही फार्मर आयडी लवकरात लवकर करुन घ्यावे.
ॲग्रीस्टॅक
(AgriStack) हा केंद्र व राज्य शासनाच्या
कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत अधिक सुलभ, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने
पोहोचविण्यासाठी तयार करण्यात येत असलेला डिजिटल कृषी डेटा प्लॅटफॉर्म आहे.
यामध्ये शेतकरी, त्यांची शेती, जमीन आणि कृषीविषयक माहिती डिजिटल पद्धतीने
जोडण्याची संकल्पना आहे. या व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे Farmer ID (शेतकरी
ओळख क्रमांक).
फार्मर आयडी म्हणजे काय?
फार्मर आयडी (Farmer ID) हा शेतकऱ्याची डिजिटल ओळख म्हणून वापरला जाणारा
विशिष्ट क्रमांक आहे. शेतकऱ्याची ओळख, जमीनधारणा आणि कृषीविषयक माहिती विविध
शासकीय यंत्रणांशी जोडण्यास याचा उपयोग होतो. यामुळे प्रत्येक योजनेसाठी
शेतकऱ्याला वारंवार वेगवेगळी माहिती किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता कमी
होण्यास मदत होऊ शकते.
ॲग्रीस्टॅकचा उद्देश केवळ एका योजनेपुरता मर्यादित नसून कृषी क्षेत्राशी
संबंधित विविध शासकीय सेवा आणि योजनांना डिजिटल पद्धतीने जोडणे हा आहे. यामध्ये
कृषी विभागाबरोबरच संबंधित इतर विभागांच्या योजनांचाही समावेश आहे.
कृषी विभाग : विविध कृषी अनुदान योजना. बियाणे, खते व कृषी
निविष्ठांशी संबंधित सेवा. पीकविषयक योजना. कृषी यांत्रिकीकरणाशी संबंधित लाभ.
सहकार व पणन
क्षेत्र : शेतमाल खरेदी-विक्रीशी संबंधित
सेवा. सहकारी संस्थांशी संबंधित काही सेवा. कृषी पणनविषयक योजना.
पुरवठा व वन विभाग
: संबंधित पात्रता व लाभाशी निगडीत
सेवा. वनपट्टेधारक लाभार्थ्यांशी निगडीत सेवा.
आधार प्रमाणीकरण का करावे?
आधार प्रमाणीकरण
(Aadhaar Authentication) हे शेतकऱ्याची ओळख निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
Farmer ID तयार करताना किंवा संबंधित योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्याची माहिती योग्य
व्यक्तीशी जोडली जात आहे की नाही, हे पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाचा उपयोग केला
जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार कार्डमधील नाव, मोबाईल क्रमांक आणि जमीन नोंदीतील
नाव यामध्ये आवश्यक सुसंगती आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
तरी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक
अंतर्गत फार्मर आयडी व आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment