गोंदिया, दि. 12 ऑगस्ट 2026 : राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहीम राबविताना अन्न व औषध प्रशासनाने गोंदिया जिल्ह्यातील चार आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० तसेच नियम १९४५ अंतर्गत परिशिष्ट-‘टी’मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळल्याने चार कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.
मे, जून आणि जुलै २०२६ या कालावधीत आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील एकूण पाच आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात आली.
चार कंपन्यांवर कारवाई
अंग्रास आयुर्वेद, आदित्य फार्मास्युटिकल्स, लालशाह सेंद्रिय उत्पादने आणि हिलॅरियस आयुर्वेद या चार कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
तर पाठक आयुर्वेदिक फार्मसीविरुद्ध कारणे दाखवा नोटिसीवरील कार्यवाही सुरू आहे.
तपासणीत काय आढळले?
तपासणीदरम्यान मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्तीचा अभाव, उत्पादन व चाचणी नोंदी उपलब्ध नसणे, कच्च्या मालाची व तयार औषधांची चाचणी न करणे, मंजूर नकाशानुसार उत्पादन परिसर नसणे, कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदींचा अभाव, चुकीचा उत्पादन दिनांक, उपकरणांचे कॅलिब्रेशन न करणे आणि पॅकिंग मटेरियलची गुणवत्ता तपासणी न करणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या.
औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जनस्वास्थ्याच्या हितासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment