गोंदिया, दि.२५ : महाराष्ट्र
प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत गोवंश हत्या बंदीच्या तरतुदींची
प्रभावी अंमलबजावणी आणि प्राणी कल्याणाच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीला पशुसंवर्धन जिल्हा
उपायुक्त डॉ. जालिंदर तिटमे, सहायक आयुक्त डॉ. संजय गायगवळी, पोलीस निरीक्षक आर. के.
सिंगनजुडे, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच विविध गौशाळांचे
पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. घोरपडे यांनी ॲनिमल
वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक नगरपालिका व
नगरपंचायत क्षेत्रात प्राणी जन्म नियंत्रण केंद्र (Animal Birth Control Unit)
स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरांमध्ये वाढलेल्या मोकाट जनावरांमुळे
अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचा नियमानुसार बंदोबस्त करण्याचे निर्देश
त्यांनी दिले.
जिल्ह्यात वाढत असलेल्या कुत्रा
चावण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी उपाययोजना
कराव्यात, तसेच जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी,
असेही त्यांनी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या जनावरांना अधिकृत अॅनिमल शेल्टर
हाऊसमध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
प्राणी जन्म नियंत्रण
केंद्रांच्या उभारणीसाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे
प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार
दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे वर्गीकरण, गौशाळांची अद्ययावत यादी, मासिक घटनांची नोंद
आणि जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यावरही
भर देण्यात आला.
पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ.
जालिंदर तिटमे यांनी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकृत गौशाळांची माहिती देत, दर
पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येत असल्याचे सांगितले.
00000000
No comments:
Post a Comment