

गोंदिया, दि. 20 : आई-वडिलांचे प्रेम, कुटुंबाचा आधार आणि मायेची ऊब ही प्रत्येक बालकाच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे काही बालकांना या सुखापासून वंचित राहावे लागते. अशा बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळवून देण्यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत आसरा शिशुगृहातील दोन बालकांची दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण करून त्यांना हक्काचे कुटुंब मिळवून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या आदेशाने गोंदिया जिल्ह्यातील हा पहिला दत्तक निर्णय पार पडला.
न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रक्रिया हस्तांतरीत-
गोंदिया जिल्ह्यात दत्तकविधानाची प्रक्रिया न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित झाल्यानंतर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी पहिला दत्तक आदेश निर्गमित केला. त्यानंतर दोन्ही बालकांना त्यांच्या पात्र दत्तक पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
महिला व बाल विकास मंत्रालयाने दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत गोंदिया जिल्हा प्रशासनाने दत्तक प्रक्रियेला गती दिली. दत्तक ग्रहण नियमावली 2022 तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे या दोन चिमुकल्यांच्या आयुष्यात आता केवळ घरच नाही, तर प्रेम, माया, सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधारही मिळाला आहे.
विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण-
ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, संरक्षण अधिकारी असंस्थात्मक मुकेश पटले, आचल फुलेकर, विशेष दत्तक संस्थेच्या अधीक्षिका तसेच डॉ. सचिन उईके आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) व राज्य दत्तक संसाधन प्राधिकरण यांच्या समन्वयातून ऑनलाइन पद्धतीने पारदर्शक व नियमानुसार पूर्ण करण्यात आली.
यापूर्वी बालक दत्तक देण्याबाबतचा अंतिम निर्णय न्यायालयाकडून घेतला जात होता. दत्तक प्रक्रियेला अधिक गती मिळावी आणि बालकांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे, यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या माध्यमातून दत्तकविधानाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दत्तक प्रक्रिया म्हणजे बालकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाचा मार्ग-
दत्तक प्रक्रियेकडे केवळ प्रशासकीय प्रक्रिया म्हणून न पाहता अनाथ, निराधार, परित्यक्त व समर्पित बालकांच्या पुनर्वसनाचा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
चाैकट... जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले चिमुकल्यांना कुशीत...
दत्तक आदेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दोन्ही बालकांना आपल्या कुशीत घेतले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहून उपस्थितांचे वातावरण भावूक झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांची तसेच दत्तक पालकांची माहिती जाणून घेतली. बालकांना पालकांच्या स्वाधीन करताना त्यांनी दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत दत्तक प्रक्रियेत नोंदणी करून नियमानुसार दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले.
0000000
No comments:
Post a Comment