जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 17 August 2026

जलसंधारण ही लोकचळवळ बनली तरच जलसमृद्ध गावांचे स्वप्न साकार होईल

 





गोंदिया | 17 ऑगस्ट

जलसंधारण सप्ताहानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कनेरी येथे जलपूजन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

यावेळी आमदार बडोले यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना, जलसंधारण ही केवळ शासकीय योजना न राहता लोकचळवळ बनली पाहिजे, असे सांगितले. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जलसंधारणासोबतच मृदसंधारण आणि वृक्षारोपण या बाबींचा समन्वय साधल्यास गावांचा शाश्वत विकास साधता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पाऊलदौना येथील अमृत सरोवर परिसरात वृक्षारोपण करून जलसंधारण व मृदसंधारणाबाबत जनजागृती करण्यात आली.

15 ते 21 ऑगस्टदरम्यान आयोजित जलसंधारण सप्ताहात जिल्ह्यातील विविध तहसील व पंचायत समिती कार्यालयांमध्ये जलसंधारणाची शपथ घेण्यात आली असून, शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी, पोस्टर आणि रील स्पर्धांसह विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत.

पाणी वाचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. चला, जलसंवर्धनाच्या चळवळीत सहभागी होऊया!

No comments:

Post a Comment