जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Friday, 21 August 2026
*विदर्भातील
पहिल्या पुस्तकांचे गाव नवेगाव बांध येथे थाटात लोकार्पण झाडीबोली साहित्य
संमेलनासाठी २५ लाखांचे अनुदान*
- मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
गोंदिया, दि.21 : मराठी
भाषेचा विकास, तिचा अभिजात दर्जा अधिक बळकट करणे आणि जागतिक स्तरावर मराठीला
प्रमुख भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी गावपातळीवर वाचन संस्कृती रुजविणे
आवश्यक आहे. त्यासाठीच ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात आली असून, विदर्भातील
पहिले पुस्तकांचे गाव नवेगाव बांध येथे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन
राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच झाडीबोली साहित्य
संमेलनासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी
घोषणाही त्यांनी केली.
यावेळी श्री. सामंत म्हणाले
की, गोंदिया जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे.
येथील वाचन संस्कृती अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने नैसर्गिक सौंदर्य आणि
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या नवेगाव बांधची ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून निवड केली
आहे. आज पहिल्या दालनाचे उद्घाटन करताना विशेष आनंद होत आहे. झाडीबोली साहित्य
संमेलनासाठी शासनाकडून दरवर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा करत
त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी तिची समृद्ध ग्रंथसंपदा,
संतपरंपरा आणि ऐतिहासिक वारसा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. संत
ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
यांच्या साहित्यामुळे मराठी अधिक समृद्ध झाली आहे. मराठीचा पहिला राज्यव्यवहार कोश
छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
मराठीसोबतच विविध
बोलीभाषांचाही विकास झाला पाहिजे आणि ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना त्यासाठी
प्रेरणादायी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील ‘चांदा ते बांदा’ या
संकल्पनेनुसार प्रत्येक भागात पुस्तकांचे गाव आणि कवितेचे गाव उभारण्याचा शासनाचा
मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठीत शिक्षण घेऊनही जागतिक
स्तरावर यश संपादन करता येते, याचा उल्लेख करत त्यांनी मातृभाषेच्या सामर्थ्यावर
भर दिला. महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी भाषा
शिकल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, असेही ते म्हणाले. राज्य शासनाने
आतापर्यंत १ लाख ६७ हजार हिंदी भाषिकांना मराठी शिकवल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी
मातृभाषेत शिक्षण घेऊन आपल्या मातीत राहून समाजसेवा करावी आणि जागतिक स्तरावरही
नाव कमवावे, असा मोलाचा संदेश ही त्यांनी यावेळी दिला.
भंडारा दौऱ्यात गणेशपूर हे
‘पुस्तकांचे गाव’ आणि लाखनी हे ‘कवितेचे गाव’ म्हणून घोषित करण्यात आल्याची
माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच, झाडीपट्टीतील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी
आपणही त्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
प्रा. डॉ. शरद मेश्राम यांनी केले, तर सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक डॉ.
लक्ष्मीकांत कापगते यांनी केले.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment