जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 20 August 2026

गोंदियाच्या जलवैभवाचा समृद्ध वारसा...

 




 

            महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला वसलेला, झाडीपट्टी म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमेला लागून असल्यामुळे येथील नागरिकांच्या बोलीभाषेत हिंदीचा प्रभाव दिसून येतो. मात्र, या जिल्ह्याची खरी ओळख येथील डोंगर-दऱ्या, वनाच्छादित प्रदेश आणि नैसर्गिक तलावांमुळे अधिक उठून दिसते. आदिवासीबहुल जिल्हा असल्याने प्राचीन काळापासून येथे निसर्ग व पर्यावरणाचे केवळ संवर्धनच नव्हे, तर पूजन करण्याची परंपरा आणि संस्कृती जपली गेली आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या मालगुजारी तलावांमुळे गोंदिया जिल्ह्याला ‘तलावांचा जिल्हा’ अशीही ओळख प्राप्त झाली आहे.

            ‘मालगुजारी’ हा शब्द इंग्रजांच्या काळात प्रचलित झाला. महसूल (मालगुजारी) वसूल करण्याचा अधिकार ज्या व्यक्तींना देण्यात आला होता, त्यांना मालगुजर असे संबोधले जात असे. मालगुजर शेतकऱ्यांकडून महसूल वसूल करून त्यातील निश्चित रक्कम सरकारकडे जमा करीत असत. तलावांची देखभाल, दुरुस्ती, गाळ काढणे तसेच पाण्याचे वाटप याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्यामुळे त्या काळात या तलावांना मालगुजारी तलाव असे नाव प्राप्त झाले. सध्या या तलावांचे व्यवस्थापन शासनाकडे आहे.

            आज गोंदिया जिल्ह्यात 1,659 मालगुजारी तलाव आहेत. या तलावांचा इतिहास सुमारे 300 ते 350 वर्षांपूर्वीचा आहे. गोंड राजा हिरशहा यांनी दूरदृष्टी ठेवून त्या काळातील पर्जन्यमान आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण फर्मान काढले होते. त्यानुसार, जो कोणी जंगल साफ करून शेती करेल त्याला ती जमीन बहाल करण्यात येईल आणि जो कोणी तलाव बांधेल त्याला त्या तलावाखालील जमीन बक्षीस म्हणून दिली जाईल. या धोरणामुळे तत्कालीन प्रजेने लोकसहभागातून जलव्यवस्थापनाची प्रभावी आणि शाश्वत पद्धत विकसित केली.

तलाव उभारताना पाण्याचा साठा योग्य प्रकारे होईल, यासाठी नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून जागेची निवड करण्यात आली. तलावांच्या खालच्या भागात विहिरी बांधण्यात आल्या. गावाच्या चारही दिशांना तलावांची साखळी निर्माण करण्यात आली. तलावातील अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे गावाच्या खालच्या बाजूने वाहून जाईल, अशी रचना करण्यात आली. त्यामुळे पुराचा धोका गावाला पोहोचत नाही. एका तलावातील अतिरिक्त पाणी दुसऱ्या तलावात आणि त्यानंतर तिसऱ्या तलावात जाईल, अशी साखळी निर्माण करून पाण्याचा अपव्यय टाळण्यात आला. त्या काळात विकसित केलेले हे जलव्यवस्थापनाचे तंत्र आजही आश्चर्यचकित करणारे आहे. याच परंपरेचा परिणाम म्हणून, अल निनोसारख्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही या भागात धान पिकासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा उपलब्ध राहतो.

पाण्याची साठवण करण्याची ही पारंपरिक पद्धत आजही अत्यंत उपयुक्त ठरत असून आधुनिक जलसंधारण योजनांमुळे तिला अधिक बळ मिळाले आहे. जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागांतर्गत 248 तलाव, 26 पाझर तलाव आणि 229 गाव तलाव आहेत. मालगुजारी तलावांसह जिल्ह्यात एकूण 2,152 तलाव जलसंपदेचा महत्त्वाचा स्रोत आहेत. या तलावांमुळे 868.78 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होत असून त्याद्वारे 1,01,007 हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध झाली आहे.

वर्ष 2023 पासून जलयुक्त शिवार अभियान (टप्पा-2) जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 2,047 कामे पूर्ण झाली आहेत. तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (टप्पा-2) अंतर्गत आमगाव, सालेकसा व देवरी तालुक्यांतील पाच क्लस्टरमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची 894 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 879 कामे पूर्ण, तर उर्वरित 15 कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.

‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. सन 2024-25 मध्ये जिल्ह्यातील 225 तलावांतील गाळ काढण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी 103 तलावांतून 4,32,950 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे 4.3295 दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. ही बाब जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी निश्चितच लाभदायक ठरली आहे. भविष्यात कोणत्याही जलसंकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा सक्षम होत आहे.

जलसंधारण सप्ताह आणि जनसहभागाचे आवाहन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील जलसंधारण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून त्यांनी पाणलोट विकास, भूजल पुनर्भरण आणि लघु जलसंधारणाच्या अनेक योजनांना चालना दिली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 21 ऑगस्ट हा दिवस राज्य शासनाने ‘जलसंधारण दिन’ म्हणून घोषित केला आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा कालावधी ‘जलसंधारण सप्ताह’ म्हणून साजरा केला जात असून जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सप्ताहानिमित्त मृद व जलसंवर्धन रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 वर्षांवरील युवक-युवतींनी या स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाविषयी जनजागृती करणाऱ्या रील्स तयार करूनhttps://register.mahaevent.co.in/#/register या संकेतस्थळावर अपलोड कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

21 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वाजता ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन जयस्तंभ चौक ते फुलचूर तलाव या मार्गावर करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्याला लाभलेल्या जलसमृद्धीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी सर्व नागरिकांनी या वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे.

 

चला, आपल्या पूर्वजांनी जपलेली जलसंवर्धनाची परंपरा पुढे नेऊया आणि जलसमृद्ध गोंदिया – समृद्ध भविष्य या संकल्पनेला साकार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करूया.

 

-मंदार पत्की,

जिल्हाधिकारी, गोंदिया

00000000


No comments:

Post a Comment