जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Saturday, 15 August 2026

गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनवूया : पालकमंत्री इंद्रनील नाईक

 







गोंदिया, दि. 15 ऑगस्ट 2026 : गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनीत दोन्तुला, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व विद्यार्थी उपस्थित होते.

विकासासाठी ₹438.25 कोटींची तरतूद

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत ₹438 कोटी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी शेती, सिंचन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 12,679 शेतकऱ्यांच्या खात्यात ₹75.74 कोटी जमा करण्यात आले आहेत.

खरीप हंगामात भात लागवडीसाठी 74,613 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच धान खरेदी केंद्रांमार्फत 1.98 लाख शेतकऱ्यांकडून 75.57 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून ₹1,569.12 कोटींचे चुकारे वितरित करण्यात आले आहेत.

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

क्षयरोग निर्मूलनात गोंदिया जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.37 लाख आयुष्मान कार्ड आणि 9.90 लाख आभा कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

पर्यटन व जैवविविधतेला चालना

हाजराफॉलच्या विकासावर विशेष भर देण्यात येत असून, जूनअखेरपर्यंत 8,500 हून अधिक पर्यटकांनी हाजराफॉलला भेट दिली. सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाल्याने गोंदियाच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

रोजगार निर्मितीला प्राधान्य

व्ही.बी. जी-राम-जी अभियानांतर्गत ग्रामीण भागात 17.88 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती झाली आहे. पात्र कुटुंबांना 125 दिवसांपर्यंत रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जलसंधारण सप्ताहाचा संदेश

15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

🌱 “चला माती वाचवू... पाणी जपू... जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू!”

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या भावनेतून गोंदिया जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्याचा संकल्प करण्यात आला.

No comments:

Post a Comment