जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 13 August 2026

‘व्होकल टू लोकल’च्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार द्या





 


‘व्होकल टू लोकल’च्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार द्या

-        अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे

गुंतवणूक परिषदेत एकूण ४२ सामंजस्य करार; ७२१ कोटींची गुंतवणूक

 

गोंदिया, दि. १३ : "व्होकल टू लोकल" या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६" च्या कार्यक्रमात केले.

गोंदिया जिल्ह्याची ओळख केवळ तांदूळ उत्पादनापुरती मर्यादित न ठेवता कृषी आधारित उद्योग, पर्यटन, बांबू उद्योग तसेच इतर पूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातून तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांसह इतर उद्योगांच्या निर्यातीसाठीही प्रयत्न वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या जिल्हा गुंतवणूक परिषदेत एकूण ४२ सामंजस्य करार; ७२१ कोटींची गुंतवणूक झाली.

गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि जिल्ह्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने आज  जिल्हा नियोजन भवन, गोंदिया येथे "जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६" चे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेची अध्यक्षता अपर जिल्हाधिकारी श्री. अभिजीत घोरपडे, यांनी केली.  याप्रसंगी मुख्य  सह आयुक्त (उद्योग व सेवा) एस. एस. मुद्दमवार, अतिरिक्त कामगार आयुक्त तथा नोडल अधिकारी "मैत्री" श्री. रविराज इलावे, सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) श्री. विक्की पु. खिराळे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती अंजु निमसरकर, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (महावितरण), स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक अधिकारी श्री. अतुल कुमार, नाबार्डचे श्री. अविनाश लाड, जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष श्री. हुकूमचंद अग्रवाल, नमो उद्योजक, विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार तसेच शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

४२ सामंजस्य करार; ७२१ कोटींची गुंतवणूक

या जिल्हा गुंतवणूक परिषदेत एकूण ४२ उद्योग घटकांसोबत ४२ सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. या करारांद्वारे ७२१ कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक जिल्ह्यात होणार असून त्यातून १,८७५ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या गुंतवणुकीमुळे गोंदिया जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच कुशल मनुष्यबळासाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

परिषदेचे प्रास्ताविक सह आयुक्त (उद्योग व सेवा) श्री. एस. एस. मुद्दमवार यांनी केले. त्यांनी शासनाच्या विविध औद्योगिक योजनांची, उद्योग आयुक्तालयाच्या उपक्रमांची तसेच उद्योगांना उपलब्ध असलेल्या सवलती व सुविधांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त कामगार आयुक्त तथा नोडल अधिकारी "मैत्री" श्री. रविराज इलावे यांनी मैत्री पोर्टल २.० तसेच Ease of Doing Business (EoDB) विषयी मार्गदर्शन केले. एकाच छताखाली १२८ परवाने व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या पोर्टलची माहिती त्यांनी उद्योजकांना दिली. तसेच "गोंदिया जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी" या विषयावर लघु उद्योग भारती, गोंदियाचे सचिव श्री. कुशल चोपडा यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत विविध चर्चासत्रे घेण्यात आली तसेच उद्योजकांच्या प्रश्नांचे व समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) श्री. विक्की पु. खिराळे यांनी मानले.

00000


No comments:

Post a Comment