जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 30 September 2026

RBSK व DEIC गोंदियाची मोठी झेप! लाखांच्या घरात जाणारी अस्थिभंग शस्त्रक्रिया 'सेवा संकल्प' अभियानातून 16 बालकांसाठी पूर्णपणे मोफत!

 





 तिरोडा, अर्जुनी मोरगावसह 6 तालुक्यातील 16 बालकांवर नागपूरच्या प्रवीरा हॉस्पिटलमध्ये

मोफत शस्त्रक्रिया यशस्वी

गोंदिया, दि.30 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील गंभीर अस्थिभंग असलेल्या बालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक वैद्यकीय उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) व जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र (DEIC), गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील एकूण १६ गरजू बालकांवर नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी अधिकृत माहिती . राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम गोंदियाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (RBSK) संजय बिसेन यांनी दिली आहे.

सहा तालुक्यांमधील बालकांचा समावेश :

RBSK आणि DEIC च्या चमूने संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या शोधमोहिमेत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या १६ बालकांमध्ये जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रांमधील बालकांचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक तिरोडा तालुक्यातील ५, अर्जुनी मोरगाव ४, गोरेगाव २, देवरी २, सडक अर्जुनी २ आणि सालेकसा तालुक्यातील १ अशा एकूण १६ बालकांवर या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.

22 व 25 सप्टेंबर रोजी यशस्वी शस्त्रक्रिया :

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) ग्रामीण व दुर्गम भागात घेतलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये या बालकांच्या अस्थिभंगाचे व हाडांच्या विकृतीचे वेळेत निदान करण्यात आले होते.ही बालके आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल कुटुंबातील असल्याने त्यांना पुढील तातडीच्या उपचारांसाठी नागपूर येथील नामांकित प्रवीरा चाइल्ड हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तेथे दि.२२ आणि २५ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. विराज शिंगाडे व त्यांच्या वैद्यकीय चमूच्या हस्ते या बालकांवर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सक्षम मार्गदर्शन :

सदर संपूर्ण मोहीम व शस्त्रक्रिया प्रक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या थेट देखरेखीखाली आणि सक्षम मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे पार पाडण्यात आली.

RBSK व DEIC चे सातत्यपूर्ण कार्य :

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील गरजू बालकांना वेळेवर आवश्यक वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बालकांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांचे वेळेत निदान करणे, त्यांच्यावर दर्जेदार उपचार करणे आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांचा पुढील योग्य पाठपुरावा करण्यासाठी RBSK व DEIC ची टीम जिल्हाभरात सातत्याने अविरत कार्य करत आहे, असेही जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक संजय बिसेन यांनी स्पष्ट केले आहे.

लाखो रुपयांचा खर्च असणाऱ्या या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाल्यामुळे बालकांना नवीन आयुष्य मिळाले असून, त्यांच्या पालकांनी शासनाचे व जिल्हा आरोग्य प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

                                                    0000000

बिरसी विमानतळ व परिसरात ड्रोन कॅमेरा वापरण्यास मनाई : 5 कि.मी. परिघात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध; आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई


गोंदिया, दि.30 : खासदार व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दि.1 ऑक्टोबर 2026 रोजी गोंदिया दौरा प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने बिरसी विमानतळ आणि परिसरातील 5 कि.मी. परिघातील क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा मनाई आदेश जारी केला आहे. दि.1 ऑक्टोबर 2026 रोजी सुरक्षिततेच्या दृष्टीने बिरसी विमानतळ व त्याच्या लगतच्या 5 कि.मी. परिघातील क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण किंवा इतर कारणांसाठी ड्रोनचा वापर करता येणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी संबंधित ड्रोन चालक व मालक, संस्था, आयोजक तसेच नागरिकांनी काटेकोरपणे करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधितांनी ड्रोनचा वापर होणार नाही, याबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. सदर मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ड्रोन चालक अथवा मालक, संस्था, आयोजक तसेच संबंधित नागरिकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी स्पष्ट केले आहे. 0000000

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा जिल्हा व तालुकास्तरीय निकाल घोषित; राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार जिल्हास्तरावर प्रथम

 


गोंदिया दि.30 : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-2026' चा अंतिम निकाल जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक उत्सव, सामाजिक बांधिलकी, सुरक्षितता आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणाऱ्या मंडळांचे मूल्यमापन करून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत गोरेगाव तालुक्यातील राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ, मुंडीपार या मंडळाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विजेत्या मंडळांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे :

1) राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार, तालुका-गोरेगाव : जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक.

2) बाल गणेश उत्सव मंडळ पाटेकुर्रा, तालुका-सडक अर्जुनी : जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक

3) नवज्योत गणेश उत्सव मंडळ गोंदिया, तालुका-गोंदिया : जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक

4) अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ आमगाव, तालुका-आमगाव  : तालुका स्तरावर प्रथम क्रमांक

5) नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी, तालुका-देवरी : तालुका स्तरावर प्रथम क्रमांक

6) सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अर्जुनी मोरगाव, तालुका-अर्जुनी मोरगाव : तालुका स्तरावर प्रथम क्रमांक

मूल्यमापनाचे निकष आणि उद्दिष्ट :

या स्पर्धेचे आयोजन करण्यामागे गणेशोत्सवाला अधिक पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीशील बनवणे हा मुख्य उद्देश होता. जिल्हा गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे तसेच जिल्हा गणेशोत्सव समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनी माहिती दिली की, सर्व सहभागी मंडळांचे मूल्यमापन करताना पर्यावरणपूरक (शाडूच्या मातीची) मूर्ती, सजावटीमध्ये प्लास्टिक व थर्माकोलचा शून्य वापर, ध्वनी प्रदूषणाचे नियमन, आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम या निकषांना विशेष गुण देण्यात आले होते.

जिल्हा प्रशासनाचा संदेश :

सर्व विजेत्या आणि सहभागी गणेशोत्सव मंडळांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला आणि पर्यावरणपूरक संदेशाला मोठी चालना मिळाली आहे. भविष्यातही इतर मंडळांनी या आदर्श पावलांवर पाऊल ठेवून उत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विजेत्या मंडळांना जाहीर झालेले अधिकृत पुरस्कार व सन्मानचिन्ह लवकरच एका विशेष समारंभात प्रदान केले जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

                                                              00000000

 

Tuesday, 29 September 2026

सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासनाचे दार सदैव खुले - जिल्हाधिकारी मंदार पत्की : शहिदांना नमन करून ‘शौर्य दिन’ साजरा







गोंदिया, दि.29 : देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची जबाबदारी आहे. माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे दार सदैव खुले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज ‘शौर्य दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की बोलत होते. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी दर्शन निकाळजे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोहर अंचुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी शहीद जवानांना अभिवादन करून देशसेवेसाठी समर्पित सैनिकांच्या शौर्याचे स्मरण केले. भारतीय सशस्त्र दलातील जवान प्रतिकूल परिस्थितीतही देशाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे देशातील नागरिक सुरक्षित व शांततामय जीवन जगत आहेत. देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची जबाबदारी आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, येत्या काळात माजी सैनिकांच्या उदरनिर्वाह संदर्भात तसेच वैद्यकीय सेवा व सैनिकांसाठी कॅन्टीन जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासित केले.
*जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार हुतात्मा स्मारक*
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी या कार्यक्रमात केली. यासंदर्भातील कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
*प्रथमत:च माजी सैनिकांना जमीन मंजुरीचा आदेश*
यावेळी माजी सैनिक प्रकाश तांडेकर यांना जमीन मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते देण्यात आला. जिल्ह्यातील पहिले जमीन मंजुरीचे प्रकरण झाले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले असून यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. उर्वरित पात्र माजी सैनिकांनाही जमिनीचे आदेश येत्या काळात निर्गमित करण्यात येतील.
*माजी सैनिक व वीर पत्नींच्या समस्या सोडविणे प्रशासनाची नैतिक जबाबदारी*
अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी तसेच देशवासीयांच्या संरक्षणासाठी सैनिक अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या शौर्य, त्याग आणि समर्पणामुळे देश सुरक्षित आहे. उरी सर्जिकल स्ट्राईकदरम्यान भारतीय सैन्याने दाखविलेल्या शौर्याचे स्मरण करत त्यांनी सैनिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी ‘शासन आपल्या दारी’ विशेष उपक्रम राबवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, असे त्यांनी सूचित केले.
*वीर पत्नींचा सन्मान*
यावेळी वीर पत्नी ममता गितेश चौधरी व वैशाली कार्तिक गौतम यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
*विद्यार्थ्यांनी सादर केले सर्जिकल स्ट्राईकचे नृत्याविष्कार*
अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळा, नंगपुरा/मुर्री येथील विद्यार्थ्यांनी भारतीय सर्जिकल स्ट्राईकचे नृत्याविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रात्यक्षिकाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी या नृत्याविष्काराचे कौतुक केले.
*जिल्ह्यात 1242 माजी सैनिक व 200 वीर पत्नी*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी केले. त्यांनी शौर्य दिनाचे महत्त्व विशद करत भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्ण परंपरेचा गौरव केला. सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी दिलेले योगदान, त्याग आणि बलिदान सदैव स्मरणात ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात 1242 माजी सैनिक आणि 200 वीर पत्नी आहेत. माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. माजी सैनिकांसाठी गोंदिया शहरातील खाजगी सहयोग हॉस्पिटल व बाहेकर हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने कल्याणकारी निधीतून माजी सैनिकांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ माजी सैनिकांना मिळवून देण्यासाठीही प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी काही माजी सैनिकांनी वेतन व आदिवासी भत्त्याबाबत समस्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी यांनी आपल्या समस्यांचे नक्कीच निराकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक गणेश बिसेन यांनी केले, तर सैनिक कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच माजी सैनिक, वीर पत्नी आणि वीर माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Monday, 28 September 2026

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा

 


गोंदिया, दि.28 : जुलै 2027 च्या सत्रासाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कोलेज (RIMC), डेहराडून, प्रवेशपात्रता परीक्षा डिसेबर 2026 मध्ये घेण्यात घेणार आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणाच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येत होती. तथापि यापुढे डिसेंबर 2026 ची परीक्षा National Testing Agency (NTA) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र https://examinationservices.nic.in/ExamSys26Part2/RootHome.aspx/?enc=Ei4cajBkK1gZSfgr53 lmFQBut9oTMxhETt9bNm6zcP2ghS+a59eor30/A5h2io4z या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडुन यांच्या rimc.deu.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी कळविले आहे.

0000000

‘ॲट्रॉसिटी कायदा’ विषयावर जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा 5 ऑक्टोबरला

 


         गोंदिया, दि.28 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015 (ॲट्रॉसिटी) या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आमगाव रोड, पतंगा मैदान, गोंदिया येथे दि.5 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

        कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की हे राहणार आहेत. कार्यशाळेमध्ये इतरही मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यशाळेत तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यशाळेतील व्याख्यानाद्वारे सदर कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015 (ॲट्रॉसिटी) ची प्रचार व प्रसिध्दी होण्यास मदत होणार आहे, असे समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.

0000000 

        

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ : ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर


गोंदिया, दि.28 : जिल्ह्यातील काही क्षेत्रांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रातील ४५५ आणि नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्रातील ६ अशा एकूण ४६१ आपले सरकार सेवा केंद्रांचा समावेश आहे.
यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतरही काही क्षेत्रांमध्ये अर्ज प्राप्त झाले नसल्याने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सुधारित ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.
प्राप्त ऑनलाइन अर्जांवर आक्षेप नोंदविण्याची मुदत १२ ते १४ ऑक्टोबर २०२६ अशी असून, मुलाखतीस पात्र अर्जांची अंतिम यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार मुलाखती २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घेण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांची यादी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
*अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना*
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा उमेदवार संबंधित भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा. अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच एक अर्जदार केवळ एका आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो.
आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत जोडणे आवश्यक असून, अर्जासाठी आवश्यक बाबी, अटी व शर्ती, अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे तसेच निवड प्रक्रियेबाबतची माहिती https://gondia.gov.in किंवा https://asskgondia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्जदारांनी दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळाव्यतिरिक्त ई-मेल, पोस्ट किंवा हार्ड कॉपीद्वारे प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
0000000

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी मंदार पत्की

 


गोंदिया, दि.28 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या कालावधीत सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.
आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पत्की यांनी निवडणूक कालावधीत प्रशासनाच्या कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून, तर जिल्हाधिकारी मंदार पत्की यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेनुसार 29 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 ऑक्टोबर रोजी होणार असून, उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. मतदान 23 ऑक्टोबर 2026 रोजी, तर मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयातील कामकाजावर आवश्यक नियंत्रण ठेवावे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.
0000000

सुधारित विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर : अंतिम यादी 16 नोव्हेंबर रोजी होईल प्रसिद्ध


गोंदिया, दि.28 : भारत निवडणूक आयोगाकडून 14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये जाहीर केलेल्या मतदार यादीचा विशेष सखोल पुननिरीक्षणाच्या कार्यक्रमात थोडा बदल करून सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 31 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2026 असा राहील, तर नोटीस कालावधी/दावे व हरकती निकालात काढणे यांचा कालावधी हा 31 ऑगस्ट 2026 ते 10 नोव्हेंबर 2026 असा राहील आणि मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी ही 16 नोव्हेंबर 2026 रोजी सुधारित नुसार होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची दखल घेऊन यानुसार दावे व हरकती दाखल करावे तसेच प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी दावे व हरकती निकालात काढावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांनी केले आहे.

0000000

Friday, 25 September 2026

विना अनुदानित क्रीडा प्रकारचे खेळ; अधिकृत प्रमाणपत्र 30 सप्टेंबरपर्यंत सादर करावे


गोंदिया, दि.25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत वर्ष 2026-27 मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया द्वारे आयोजित विना अनुदानित खेळ पुढीलप्रमाणे आहेत.

आष्टे-दु-आखाडा, कुडो, टेंग-सु-डो, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, सुपर सेवन क्रिकेट, फ्लोअरबॉल, हाफकिडो बॉक्सिंग, सिलंबम, टेनिस व्हॉलीबॉल, कुराश, रस्सीखेच, बीच व्हॉलीबॉल, टेनिस क्रिकेट, फुटसाल, टेबल सॉकर, युगा मुन दो, ड्रॉप रो बॉल, पेंटाक्यू, जंपरोप, चॉकबॉल, फुटबॉल टेनिस, म्युजिकल चेअर, कलरीपयट्ट, युनिफाईट, स्पीडबॉल, फिल्ड आर्चरी, मिनीगोल्फ, बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, रोप स्किपिंग, वुडबॉल, थांग ता मार्शल आर्ट, लगोरी, पॉवरलिफ्टिंग, टार्गेटबॉल, जित कुने दो, कॉर्फबॉल, हुप क्वॉन दो, वोवीनाम, ग्रॅपलिंग, लंगडी, स्पोर्ट डान्स, शस्त्रांग मार्शल आर्ट, बुडो, टेनिस बॉल क्रिकेट, गतका.

वरील खेळाचे गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्य संघटनेव्दारा प्रमाणित संघटना असेल त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे राज्य संघटना व्दारा मान्यता प्राप्त नोंदणी प्रमाणपत्र दिनांक 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.

0000000

नवमतदार नोंदणीसाठी तहसील व उपविभागीय कार्यालयांत विशेष व्यवस्था

 

गोंदिया, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाच्या दि.22 सप्टेंबर 2026 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दि. 26 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

नवमतदार नोंदणीसाठी दि.26 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी (निवडणूक) विजय अवधाने यांनी केले आहे.

                                                       0000000

29 सप्टेंबरला होणारा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित


गोंदिया, दि.25 : जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा समावेश नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात असल्याने 22 सप्टेंबर 2026 पासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या नऊ रोजगार मेळाव्यांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नियोक्ते, रोजगाराच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवार तसेच सहभागी संस्था व इतर भागधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
स्थगित करण्यात आलेले रोजगार मेळावे पुढील ठिकाणी आयोजित करण्यात येणार होते : नटवरलाल माणिकलाल दलाल कॉमर्स कॉलेज गोंदिया, भवभूती महाविद्यालय आमगाव, सी. जे. पटेल कॉलेज तिरोडा, राजीव गांधी महाविद्यालय सडक अर्जुनी, मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी, शंकरलाल अग्रवाल कला व विज्ञान महाविद्यालय सालेकसा, शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया, जगत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोरेगाव, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज मोरगाव अर्जुनी.
निवडणूक प्रक्रिया व आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने या रोजगार मेळाव्यांना स्थगिती देण्यात आली असून, पुढील आयोजनाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे कौशल्य विकास विभागाने स्पष्ट केले आहे.
0000000

जिल्ह्यात रासायनिक खत विक्रीसाठी FFS प्रणाली लागू : घरबसल्या खताचे बुकिंग; QR कोडद्वारे अधिकृत विक्रेत्याकडून मिळणार खत


गोंदिया, दि.25 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ व पारदर्शक उपलब्धता करून देण्यासाठी दि.25 सप्टेंबर 2026 पासून Framework for Fertilizer Sale (FFS) प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून उपलब्ध खतांची माहिती पाहून आवश्यक खताचे बुकिंग करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी Google Play Store वरून FFS App डाउनलोड करून आधार किंवा Farmer ID द्वारे लॉगिन करावे. संबंधित शेतजमीन व पिकाची माहिती निवडून आवश्यक खताचे प्रमाण नोंदविल्यानंतर उपलब्ध अधिकृत विक्रेत्याची निवड करता येईल. विक्रेत्याची निवड केल्यानंतर मोबाईलवर QR Code तयार होईल. हा QR Code 72 तासांसाठी वैध असून, संबंधित विक्रेत्याकडे दाखविल्यानंतर स्कॅन करून नियमानुसार खताची विक्री केली जाईल.
या प्रणालीमुळे खताची मागणी, उपलब्धता व विक्री व्यवहाराची डिजिटल नोंद होणार असून अनधिकृत साठवणूक, कृत्रिम टंचाई, काळाबाजार व अनियमित विक्रीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना घरबसल्या उपलब्ध खताची माहिती मिळाल्याने अनावश्यक रांगा व गर्दी कमी होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी FFS प्रणालीचा वापर करूनच रासायनिक खतांची खरेदी करावी, तसेच अनधिकृत विक्रेत्याकडून खत खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कैलाश मरकाम यांनी केले आहे.
00000000

Thursday, 24 September 2026

गोंदिया जिल्ह्यात महिनाभर 'सेवा संकल्प अभियान' सुरू राहील : मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला


गोंदिया, दि.24 : सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान चालणार असून या अंतर्गत विविध लोकोपयोगी कामे हाती घेण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमार्फत हे अभियान राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
*प्रमुख कार्यक्रम* : 17 सप्टेंबर रोजी मानवी रांगोळीने या अभियानाचा शुभारंभ झाला. 18 सप्टेंबर - लाभार्थ्यांच्या घरी दीप प्रज्वलन व नवीन बचत गट स्थापना, 21 सप्टेंबर- 300 कोटी वृक्ष लागवड, 23 सप्टेंबर - स्वच्छताही सेवा व प्लास्टिक मुक्ती, 24 सप्टेंबर - आरोग्य शिबिर, रक्तदान, आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर - आपले सरकार सेवा केंद्रातून दाखले वाटप, 28 सप्टेंबर - ग्रामपंचायत कर वसुली. 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर - शाळा, पंचायत समिती व जिल्हा स्तरावर चित्रकला-वक्तृत्व स्पर्धा.
1 ऑक्टोबर - अंगणवाडी उत्सव, 7 ऑक्टोबर - सिंचन विहिरीसाठी नोंदणी, 8 ऑक्टोबर - दिव्यांग नोंदणी व सर्वेक्षण. 13 ते 15 ऑक्टोबर - रथ यात्रा, जनजागृती फेरी आणि कला पथकाद्वारे 'नमो यशोगाथा' कार्यक्रमातून शासकीय योजनांची माहिती, तर 17 ऑक्टोबर रोजी तालुका मुख्यालयी पंतप्रधानांचे भाषण लाईव्ह दाखवून 'जनसेवा महाकुंभ'ने अभियानाचा समारोप होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दोन्तुला यांनी दिली.
0000000

Wednesday, 23 September 2026

गणेशोत्सव संस्कृतीचा आणि कलांचा जागर - अभिजीत घोरपडे : ढोल-ताशांच्या गजरात महागणेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

 







    गोंदिया, दि.23 : गणेशोत्सव सांस्कृतिक परंपरा, कला आणि लोकसंस्कृतीचा जागर असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले.

         ढोल-ताशांच्या गजरात महागणेशोत्सव कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागातर्फे जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेला बळ मिळते, असे त्यांनी सांगितले.

         सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त गोंदिया येथील जलाराम लॉन येथे महागणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून पूजा-अर्चा व सामूहिक गणेश आरती करण्यात आली.

         गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर आपल्या जिल्ह्यातील आदिवासी गोंडी नृत्याने ठेका धरला आणि भक्तांची मने जिंकली. यानंतर वाजत गाजत आली वासुदेवाची स्वारी... लोककला नृत्याने मन मोहले. यानंतर दिलखेच लावणीचे सादरीकरण झाले. मुर्री येथील समाजकल्याण शाळेच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी सामाजिक जागरुकता करणारे नृत्य सादर करीत सामाजिक जागृतीचे फलक उंचावले.

         विविध लोककला, आदिवासी संस्कृती, नृत्य, संगीत आणि लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. ढोल-ताशांचा निनाद, गणेशभक्ती आणि विविध कलाविष्कारांनी जलाराम लॉन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे होते. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, सर्वश्री उपजिल्हाधिकारी विजय अवधाने, मानसी पाटील, दर्शन निकाळजे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, गोरेगावच्या तहसीलदार प्रज्ञा भोकरे, आमगावच्या तहसीलदार मोनिका कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, तिरोड्याचे तहसीलदार नारायण ठाकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख देश-विदेशात पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

             लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी पुणे येथे 1893 मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सव सामाजिक एकात्मता आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरला. आजच्या काळातही सामाजिक समतेची गरज आहे. महागणेशोत्सवासारख्या उपक्रमातून विविध कला, संस्कृती आणि परंपरा एकाच व्यासपीठावर येतात. हा नियोजनबद्ध आणि स्तुत्य उपक्रम असून, उपस्थित सर्वांना श्री. घोरपडे यांनी शुभेच्छा दिल्या.

          जिल्ह्यातील, तसेच पुणे व नागपूर मधील शमा डान्स अकॅडमी, आदिवासी गोंडी नृत्य, ‘देवा श्रीगणेशा’ या गीतावर नागकुडा ग्रुप, रावेणी डान्स ग्रुप, निवासी शाळा मुर्री/नंगपूरा, ‘वासुदेवाची स्वारी’, रजनी नागपुरकर यांची लावणी तसेच जय सेवा डान्स ग्रुप आणि संजीव बापट यांच्या गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणून उपस्थितांची मने जिंकली.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी कहालकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजन चौबे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                      

                                                                                0000000

      

 



अनंत चतुर्दशीला गोंदियात

 विविध ठिकाणी होणार गणरायाचे विसर्जन

गोंदिया, दि. 23 : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने शुक्रवार, 25 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी जिल्ह्यातील विविध तलाव, नदीघाट व जलस्रोत निश्चित करण्यात आले आहेत.

गोंदिया शहरातील छोटा गोंदिया तलाव, भीमघाट पांगोली नदी, पिंडकेपार नाला, सरकारी तलाव (रेल्वे) आणि मुर्री तलाव येथे गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गोंदिया ग्रामीण भागातील खमारी तलाव व टेमणी घाट (पांगोली नदी), रामनगर भागातील बांधतलाव सूर्याटोला, हिवरा गाव तलाव व टेमणी नदी घाट, तसेच रावणवाडी क्षेत्रातील कोरणी-रजेगाव नदीघाट येथेही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आमगाव भागातील संत तुकडोजी तलाव, गायत्री मंदिर तलाव व बाघ नदी घाट, गोरेगाव क्षेत्रातील पवन तलाव व पांगोली नदी घाट, सालेकसा भागातील रोंढा नाला व साखरीटोला गाव नाला, तसेच देवरी क्षेत्रातील धुकेश्वरी मंदिर तलाव व गाव तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे.

डुग्गीपार भागातील चुलबंद नदी घाट व गाव तलाव, अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील महागाव तलाव व अर्जुनी मोरगाव गाव तलाव, नवेगावबांध तलाव, तिरोडा भागातील शिंगाडा तलाव, काशीघाट (गराडाटोला), खामतलाव व गिरजाबाई शाळेजवळील तलाव, तसेच गंगाझरी क्षेत्रातील कवलेवाडा, पांगळी, मुंडीपार व एकोडी तलाव येथेही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक तसेच लहान मुलांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जन सायंकाळी व रात्रीच्या वेळी होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विसर्जनस्थळी विद्युत प्रकाश व्यवस्था, बॅरिकेट्स, बोधचिन्हे व सूचना फलक लावण्यासोबतच सीसीटीव्ही आणि क्रेनची व्यवस्था करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून गणरायाचे विसर्जन शांततेत व सुरक्षितपणे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000


Tuesday, 22 September 2026

गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सायबर सुरक्षा व ग्राहक जनजागृती : लोकसंवाद-2026 अंतर्गत आमगावात विविध उपक्रम






          गोंदिया, दि.22 : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शासकीय योजना, सायबर सुरक्षा आणि ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी लोकसंवाद-2026 अंतर्गत आमगाव येथे विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
         आमगाव येथील वक्रतुंड गणेश उत्सव मंडळ, जय बजरंग चौक येथे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय, गोंदियाच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर होत्या. आमगाव येथील सायबर सेलचे अजय पटले यांनी सायबर सिक्युरिटी बाबत अधिक माहिती दिली.
         यावेळी आमगाव पोलीस विभागातील अजय पटले यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी व बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही न देणे याबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
         महाराष्ट्र शासनाच्या विविध जनजागृती उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून लोकसंवाद साधला जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या नागरिकांना उपयुक्त माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
         कार्यक्रमाचे संचालन पत्रकार भोला गुप्ता यांनी केले. गणेश मंडळाच्या सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.
0000000
           *अष्टविनायक गणेश उत्सव मंडळात ग्राहक जनजागृती*
दरम्यान, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ, अष्टविनायक चौक, मेन रोड, आमगाव येथेही शनिवारी (ता.19) सायंकाळी नागरिक आणि ग्राहकांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
          यावेळी अखिल भारतीय ग्राहक मंचाचे कोषाध्यक्ष बिनेश्वर कटरे यांनी ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत तसेच व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. नागरिकांनी जागरूक ग्राहक म्हणून आपल्या हक्कांची माहिती करून घ्यावी आणि कोणत्याही व्यवहारात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
         गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना उपयुक्त माहिती देण्याच्या लोकसंवाद-2026 उपक्रमाला आमगाव परिसरात नागरिकांचा सहभाग मिळत आहे.
00000000

लोकसंवादातून पाटेखुर्रा येथे शासनाच्या योजनांची माहिती : बाल गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती





गोंदिया, दि.22 : शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद-2026 अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील पाटेखुर्रा येथे सोमवारी सायंकाळी बाल गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, सरपंच प्रशांत बालसंनवार यांच्यासह प्रशांत शहारे, हितेश डोंगरे, रवी भलावी, निखील पारधी, अनिरुद्ध गेडाम, रोहितकुमार पारधी, सुरेश बोपचे, जितेंद्र कवरे आदींचे सहकार्य लाभले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध शासकीय योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना काही अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने लोकसंवादासाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
*दरम्यान*, कारंजा येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातही लोकसंवाद-2026 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाविक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. नागरिकांनी योजनांची माहिती इतरांपर्यंतही पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.
0000000

गोंदिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'महागणेशउत्सव' कार्यक्रमाचे आयोजन आज : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

 


           गोंदिया, दि.22 : राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. त्यानिमीत्त उद्या (ता.23) सकाळी 10.30 वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक जलाराम लॉन येथे महागणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‌ गणेश वंदनेसह महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या सांस्कृतिक महोत्सवातून अधोरेखित केला जाणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
          या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पत्की यांच्यासह पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
         गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा बहाल केला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी होत असते. लोकांच्या धार्मीक भावनेला अनुसरूनच महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास देखील लोकांपर्यंत पोचविण्याचे शासनाचे धोरण आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात जिल्हा प्रशासनाने महागणेशोत्सव आयोजित केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहे.
          हा उपक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवात यावर्षी शासनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये अध्यात्म, नाट्यरंग, महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे.
         गणेशोत्सवानिमित्त सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरीता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे.
         समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा. गणेश मंडळांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असेही शासनाचे निर्देश आहेत.
0000000

लोकसहभाग व जनजागृतीतून आपत्ती व्यवस्थापन करणे महत्त्वाचे - जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर : गणेश उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी Bappa.org संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन

 







गोंदिया, दि.21 : आपत्ती सांगून येत नाही. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी जीवित व वित्तीय हानी कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच रोजगाराच्या संधींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी, दि.21 सप्टेंबरला गोंदिया येथील सिव्हील लाईन परिसरातील अपना गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर बोलत होते.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अपना गणेशोत्सव मंडळाचे संचालक पंकज रहांगडाले, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जीडीसीसी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. भेंडारकर यांनी आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच आपत्तीपूर्व तयारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि बचावकार्याबाबत प्रत्येकाने प्राथमिक माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. अलीकडे नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तीय हानी झाली. अशा आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर बचावकार्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनीही आपत्तीच्या प्रसंगी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले.
गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देऊन गणेश उत्सव निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती तसेच भारताची संस्कृती आराध्य दैवत गणपती यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्यामार्फत करणाऱ्या उपक्रमांचे छायाचित्र व माहिती Bappa.org या लिंकवर जाऊन किंवा क्युआर कोड स्कॅन करुन विविध शासकीय योजनांची माहिती सदर लिंकवर अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सदर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी सदर उपक्रमाबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यामार्फत अपना गणेश मंडळाचे संचालक पंकज रहांगडाले यांना भित्तीपत्रक भेट देण्यात आले. तसेच सदर उपक्रमाची माहिती संपूर्ण जिल्हावासियांना व्हावी यासाठी सार्वजनिक मंडळ व घरगुती गणपती स्थापित करणाऱ्या भाविकांनी त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती Bappa.org या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा क्युआर कोड स्कॅन करुन माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे निमसरकर यांनी केले आहे.
*टाकाऊ वस्तूंपासून ‘फ्लोटींग डिव्हाईस’ची निर्मिती *
यावेळी घरगुती तसेच टाकाऊ वस्तूंपासून शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक असणारे ‘फ्लोटींग डिव्हाईस’ तयार करून त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पूरपरिस्थितीत उपलब्ध साधनसामग्रीचा सुरक्षित पद्धतीने उपयोग करून बचावकार्य कसे करता येते, याबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या वेळी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, सुरक्षितता आणि बचावाच्या प्राथमिक उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमास अपना गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित अवस्थी, सदस्य सर्वश्री अरविंद तिवारी, निलेश गुप्ता, अजित टेंभरे, विवेक रहांगडाले, दीपक मालगुजर, मोहन लिल्हारे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. प्रभाकर गद्रे अनंतात विलीन

 


            गोंदिया, दि.22 : इतिहास संशोधन, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. प्रभाकर गद्रे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी सोमवारी, दि.21 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

           डॉ. गद्रे यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा मंगळवार, दि.22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमगाव येथील जमीदार वाड्यासमोरील त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली. साकरीटोला घाट मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

           जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. इतिहास संशोधन, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी समाजात ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्राची तसेच सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

          डॉ. गद्रे यांच्या अंत्यदर्शनासाठी इतिहास, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, सहकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

         डॉ. प्रभाकर गद्रे यांच्या निधनाने एक अभ्यासू इतिहास संशोधक, मार्गदर्शक आणि सामाजिक प्रबोधनाची भूमिका जपणारा व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांच्या कार्याची आठवण सदैव प्रेरणादायी राहील.

                                              00000000

Monday, 21 September 2026

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत

 


गोंदिया, दि.21 : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने लोकसंवाद उपक्रमांतर्गत मनोहर चौक गणेश उत्सव समिती, छोटी जे.एम. स्कूल, मनोहर चौक, गोंदिया येथे जनजागृती करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी एकत्र येणाऱ्या भाविक व नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, प्रक्रिया आणि उपलब्ध माध्यमांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, या उद्देशाने लोकसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचत असल्याने शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होत आहे.
मनोहर चौक गणेश उत्सव समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
00000000