जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 22 September 2026

गोंदिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'महागणेशउत्सव' कार्यक्रमाचे आयोजन आज : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

 


           गोंदिया, दि.22 : राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. त्यानिमीत्त उद्या (ता.23) सकाळी 10.30 वाजता जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक जलाराम लॉन येथे महागणेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‌ गणेश वंदनेसह महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या सांस्कृतिक महोत्सवातून अधोरेखित केला जाणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
          या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पत्की यांच्यासह पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
         गणेशोत्सव ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा बहाल केला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी होत असते. लोकांच्या धार्मीक भावनेला अनुसरूनच महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास देखील लोकांपर्यंत पोचविण्याचे शासनाचे धोरण आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात जिल्हा प्रशासनाने महागणेशोत्सव आयोजित केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सर्व संबंधित विभागांना दिले आहे.
          हा उपक्रम सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईतर्फे संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. गणेशोत्सवात यावर्षी शासनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये अध्यात्म, नाट्यरंग, महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे.
         गणेशोत्सवानिमित्त सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरीता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे.
         समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा. गणेश मंडळांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असेही शासनाचे निर्देश आहेत.
0000000

No comments:

Post a Comment