गोंदिया, दि.21: विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व विविध प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.
अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध शासकीय योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांची यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहे.
शिबिरापूर्वी वस्तीस्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर देण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
शिबिरांचे ठिकाण व वेळ याबाबतची माहिती संबंधित तालुका प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे अभियान नियमितपणे प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे.
0000000
No comments:
Post a Comment