जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 17 September 2026

 










*‘सेवा से संकल्प’ म्हणजे शासन आपल्या दारी, शासन आपल्या घरी - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी*

लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी निश्चित ध्येय ठेवून काम करण्याचे प्रशासनाला निर्देश

 

गोंदिया, दि. १७ : ‘सेवा से संकल्प’ अभियान म्हणजे शासन आपल्या दारी आणि शासन आपल्या घरी पोहोचविण्याचा संकल्प आहे. या अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळवून द्यावा. प्रशासनाने निश्चित ध्येय ठेवून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.

‘सेवा से संकल्प’ अभियानाचा शुभारंभ आज नियोजन भवनातील सभागृहात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. हे अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक गोरख भांबरे, उपवनसंरक्षक अधिकारी पवन कुमार जोंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त बिदरी म्हणाल्या, जनतेला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. ‘सेवा से संकल्प’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अधिक सक्रियपणे योजनांचा लाभ देण्यात यावा. महसूल विभागामार्फत जमिनीशी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तडजोडीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास यामुळे मदत होईल आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळेल.

सर्व विभागांनी लाभार्थ्यांची निश्चिती करून विविध योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी पोहोचून सेवा देण्याच्या भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी मंदार पत्की, यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवा से संकल्प’ अभियान उपयुक्त ठरणार आहे. अभियानाच्या कालावधीत महसूल विभागाशी संबंधित पट्टे, विविध दाखले तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. विश्वकर्मा दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.

सुमारे २०० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ

अभियानाच्या शुभारंभप्रसंगी विविध योजनांच्या लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यामध्ये नगरपरिषद पट्टेवाटप, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, भूमी अभिलेख सनद, ग्रामीण सेतू, पट्टेवाटप, अंत्योदय योजना व रेशनकार्ड तसेच महसूल विभागामार्फत नोंदणी व वाटणीपत्र आदी विविध सेवांचा समावेश होता. सुमारे २०० लाभार्थ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार समशेर पठाण यांनी केले, तर आभार अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांनी मानले.

 

*विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला *

कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रपत्र अ, ब, क, ड मधील मागणी व वसुली, आरआरसी प्रकरणे, नजूल जमीन, भाडेपट्टे, विशेष अभय योजना, पट्टेवाटप मोहीम, लँड बँक निर्मिती, भोगवटादार वर्ग-२, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, व्हीबीजीआरआरएमजी मोहीम, युक्तधारा, महसूल लोकअदालत, डिजिटल क्रॉप सर्वे, झुडपी जंगल डिलिस्टिंग आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस जिल्हाधिकारी मंदार पत्की, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, ज्योती कांबळे, पूजा गायकवाड, दर्शन निकाळजे, तहसीलदार समशेर पठाण, मोनिका कांबळे, प्रज्ञा भोकरे, नारायण ठाकरे, श्रीमती गोमासे तसेच अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

00000

 

 


No comments:

Post a Comment