जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 17 September 2026

 






गणरायाच्या साक्षीने पुस्तकांशी नाते जोडणारे ‘लोकसंवाद’चे ग्रंथालय दालन

प्रशासकीय इमारतीतील सार्वजनिक गणेशोत्सवात जिल्हा ग्रंथालयाचा उपक्रम; नागरिकांना मिळते पुस्तकांची आणि ग्रंथालय सदस्यत्वाची माहिती

 

गोंदिया, दि. १७ : गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता ज्ञान, संस्कृती आणि जनजागृतीचा उत्सव व्हावा, या उद्देशाने ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रशासकीय इमारत परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालयाचे विशेष दालन उभारण्यात आले आहे.

प्रशासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ग्रंथालयाची ओळख व्हावी, ग्रंथालयातील विविध पुस्तके सहजपणे उपलब्ध होऊ शकतात तसेच ग्रंथालयाचे सदस्यत्व कसे घेता येते, याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने हे दालन उभारण्यात आले आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी खोमेंद्र बोपचे यांनी पुढाकार घेत ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत हा उपक्रम राबविला आहे. गणराया हे विद्येचे प्रतीक मानले जाते आणि ज्ञानाचा खजिना पुस्तकांमध्ये व ग्रंथांमध्ये सामावलेला असतो. याच भावनेतून गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना पुस्तकांशी जोडण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

दालनाला भेट देणाऱ्या नागरिकांना उपलब्ध पुस्तकांची माहिती, ग्रंथालयाच्या विविध सुविधा तसेच सदस्यत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागरिकांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक ग्रंथालयाच्या सदस्यत्वाबाबत माहिती घेत आहेत.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती, जनजागृती आणि ज्ञानाचा प्रसार नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या ‘लोकसंवाद-२०२६’च्या उद्देशाला हा उपक्रम पूरक ठरत आहे.

00000


No comments:

Post a Comment