जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 4 September 2026

‘प्रशस्त 2.0’ प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ आता मराठीत उपलब्ध


दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्राथमिक तपासणीसाठी शिक्षकांचे सक्षमीकरण
गोंदिया, दि.4 : दिव्यांग विद्यार्थ्यांची लवकर ओळख पटवून त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य मिळावे, यासाठी भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने विकसित केलेली ‘प्रशस्त 2.0’ प्रणाली शिक्षकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारांची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होते.
यापूर्वी या प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध होते. आता मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे प्रणालीचा वापर अधिक सुलभ व प्रभावी होणार आहे.
‘प्रशस्त 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे निरीक्षण, प्राथमिक माहिती संकलन, माहितीची पडताळणी, अहवाल निर्मिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा देण्याची प्रक्रिया समजून घेता येते. ही प्रणाली केवळ प्राथमिक तपासणीसाठी असून, त्याद्वारे अधिकृत दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय निदान केले जात नाही.
दिव्यांग विद्यार्थ्यांची वेळेवर ओळख. योग्य संदर्भ सेवा आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्य यामुळे समावेशित शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी ‘प्रशस्त 2.0’ प्रणालीचा वापर अधिक सुलभ, परिणामकारक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
महाराष्ट्रातील 1,08,096 शाळांमधील 7,27,181 शिक्षकांपैकी 5,22,100 शिक्षकांनी (71.79%) मार्गदर्शक व्हिडिओच्या माध्यमातून ‘प्रशस्त 2.0’ प्रणालीची माहिती घेतली आहे. उर्वरित मुख्याध्यापक व शिक्षकांनी मराठी मार्गदर्शक व्हिडिओंचा उपयोग करून प्रणालीची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे संवेदनशीलपणे निरीक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000000

No comments:

Post a Comment