जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 8 September 2026

बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यवेक्षिकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

 



गोंदिया, दि.8 : अंगणवाडीतील बालकांना गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत होणे गरजेचे आहे. बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे सेविकांना निश्चितच अधिक सक्षम होता येईल, असा विश्वास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार SARTHAQ-2 मधील टास्क क्र. 19 अंतर्गत 12 वी व त्यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आला असून, सत्र 2026-27 मध्ये राज्यातील सर्व पात्र अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी जिल्हास्तरीय एक दिवशीय उदबोधन प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजकुमार हिवारे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, गोंदिया CDPO प्रियंका किरणापुरे, सालेकसा CDPO श्रीमती बावणकर, विषय सहायक संदीप सोमवंशी व सुनील हरिनखेडे यांची उपस्थिती होती.
*12 मॉड्यूल्सवर सखोल मार्गदर्शन :*
प्रशिक्षणामध्ये बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील 12 मॉड्यूल्सवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच ब्लेंडेड मोड प्रशिक्षण म्हणजे काय, Unilearn अॅपवर बीट स्तरावर प्रशिक्षण कसे घ्यावे, स्वाध्याय व प्रात्यक्षिके कशी पूर्ण करून घ्यावीत, मूल्यांकन प्रक्रिया कशी राबवावी आणि अंतिम परीक्षा कशा पद्धतीने होणार याबाबत पर्यवेक्षिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षिका उषा आगाशे, अश्विनी कदम, विशेष शिक्षक सतीश गजभिये व साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी सुलभक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साधनव्यक्ती अनिता ठेंगडी व उर्मिला वैद्य यांनी विशेष सहकार्य केले.
00000000

Monday, 7 September 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद


• सहा विभागांना याच महिन्यात भेटी
• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद
गोंदिया, दि.8 : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक :
पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.
भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
00000000

स्वाधार योजनेंतर्गत अर्जातील त्रुटींची पुर्तता 10 सप्टेंबरपुर्वी करण्याचे आवाहन


गोंदिया, दि.7 : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले, सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता व शैक्षणिक साहित्यासाठी लागणारी आर्थिक मदत थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत केली जाते. त्याकरीता विद्यार्थ्यांना https//hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक असते. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील बऱ्याच विद्यार्थ्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या त्रुटीपुर्तते अभावी विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत (Send Back) करण्यात आले आहेत. शैक्षणिक सत्र 2025-26 मधील सद्यस्थितीत तालुकानिहाय गोंदिया तालुक्यातील 22, गोरेगाव 11, अर्जुनी मोरगाव 07, सडक अर्जुनी 04 व सालेकसा 01 असे एकुण 45 विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयामार्फत त्रुटी पुर्ततेकरीता विद्यार्थ्यांच्या आयडीवर परत पाठविण्यात आले आहे.
स्वाधार योजनेंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण कार्यालयाद्वारे सुचित करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती Send Back दिसत आहे, त्या विद्यार्थ्यांना त्रुटीची पुर्तता करण्याकरीता दि.10 सप्टेंबर 2026 अंतिम मुदत देण्यात आली आहे, करीता विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जातील त्रुटींची पुर्तता (आवश्यक कागदपत्र अपलोड) करून अर्ज दि.10 सप्टेंबर पुर्वी कार्यालयाचे आयडीवर सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. नमुद दिनांकापर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली नाही व विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची राहिल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता Send Back करण्यात आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या माहितीसाठी कार्यालयाच्या 07182-234117 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
00000000

भाडे तत्वावर वाहनाची आवश्यकता : अर्ज आमंत्रित


गोंदिया, दि.7 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया कार्यालयासाठी रोजगार मेळाव्याच्या प्रचार व प्रसाराकरीता, कार्यालयीन कामकाजाच्या आवश्यकतेनुसार कॉल बेसीसवर, ज्या दिवशी आवश्यकता पडेल त्यानुसार प्रती किलोमीटर दराप्रमाणे वाहन भाडे तत्वावर घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन भाडे तत्वावर घेण्याबाबतच्या अटी व शर्तीच्या माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.210, आमगाव रोड, गोंदिया येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दुरध्वनी क्रमांक 07182-299150 अथवा gondiyarojgar@gmail.com यावर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया यांनी केले आहे.
00000000

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत बँकर्स कर्ज मेळाव्याचे आयोजन


गोंदिया, दि.7 : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत कर्जप्रक्रिया प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील 860 लाभार्थींसाठी विशेष कर्ज मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हा अग्रणी प्रबंधक, बँक ऑफ इंडिया गोंदिया व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दि.8 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह आमगाव, 9 सप्टेंबरला पंचायत समिती सभागृह तिरोडा, 10 सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृह गोंदिया व 16 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समिती सभागृह गोरेगाव येथे बँकर्स कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून कर्ज प्रकरणाची पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तरी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत आयोजित या बँकर्स कर्ज मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देवीपुत्र यांनी केले आहे.
00000000

एस.आय.आर.(SIR)वर विशेष लेख... जागरुक नागरिकांनो मतदार यादीत आपले नाव तपासा!

 




           भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप मतदार यादीमध्ये जिल्ह्यातील एकूण 11 लाख 23 हजार 805 मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव, पत्ता, वय तसेच इतर तपशील तपासून घ्यावा. नाव नसल्यास किंवा नोंदीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित नागरिकांनी दि.30 सप्टेंबर 2026 पर्यंत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी केलेले आहे.

          भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित अथवा अपात्र मतदारांची नावे वगळणे तसेच मतदारांच्या नावातील, पत्त्यातील आणि अन्य तपशीलांतील त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
         भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या अनुषंगाने मतदारांनी मागील वर्ष 2002 च्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणामधील मतदार यादीत स्वतःचे तसेच संबंधित नातेवाईकांचे नाव व तपशील तपासावेत. यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार सेवा संकेतस्थळ https://voters.eci.gov.in यावर तपशील तपासता येणार आहे. मतदारांना घोषणापत्रामध्ये आवश्यक तपशील भरता येईल. याबाबत सहाय्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा.
          गणना प्रपत्रामध्ये नमूद केलेला मागील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणातील मतदार यादीतील तपशील उपलब्ध नसल्यास अथवा उपलब्ध तपशील आयोगाच्या डेटाबेसशी जुळत नसल्यास, संबंधित मतदारास मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस निर्गमित करण्यात येईल. नोटीस प्राप्त झाल्यानंतर मतदारांनी आपल्या जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच आवश्यकतेनुसार पालकांचा तपशील सिद्ध करण्यासाठी विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
         कोणती कागदपत्रे ग्राह्य?
* केंद्र शासन, राज्य शासन किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील (PSU) नियमित कर्मचारी अथवा
निवृत्तीवेतनधारकांना निर्गमित ओळखपत्र किंवा निवृत्तीवेतन प्रदान आदेश.
* शासन, स्थानिक प्राधिकरण, बँका, टपाल विभाग, एलआयसी (LIC) किंवा सार्वजनिक क्षेत्रातील
उपक्रमामार्फत भारतात निर्गमित केलेले 1 जुलै 1987 पूर्वीचे ओळखपत्र, प्रमाणपत्र किंवा अन्य दस्तऐवज.
* सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले जन्म प्रमाणपत्र.
* पारपत्र (पासपोर्ट).
* मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठाने निर्गमित केलेले मॅट्रिक्युलेशन अथवा शैक्षणिक प्रमाणपत्र.
* सक्षम राज्य प्राधिकरणाने निर्गमित केलेले कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र.
* वनहक्क प्रमाणपत्र.
* सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले इतर मागासवर्गीय (OBC), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) किंवा अन्य जात प्रमाणपत्र.
* राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC), ज्या ठिकाणी लागू असेल तेथे.
* शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही सांविधानिक किंवा प्रशासकीय नियमानुसार जतन केलेली कौटुंबिक नोंदवही.
* शासनामार्फत निर्गमित जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र.
* आधारबाबत भारत निवडणूक आयोगाच्या 9 सप्टेंबर 2025 (परिशिष्ट-11) अन्वये निर्गमित निर्देश लागू राहतील.
         वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे स्वतः, वडील आणि आई यांच्यासाठी स्वतंत्र स्व-प्रमाणित स्वरूपात, ज्या प्रकरणात आवश्यक आहेत त्या अनुषंगाने सादर करावीत.
         जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे
         1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्म झालेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी नमुद यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.
         1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान भारतात जन्म झालेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे यादीतील कोणतेही एक कागदपत्र तसेच वडील किंवा आई यांची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे यादीतील कोणतेही एक कागदपत्र सादर करावे.
         2 डिसेंबर 2004 नंतर भारतात जन्म झालेल्या व्यक्तींनी स्वतःची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारे कागदपत्र, तसेच वडील आणि आई यांची जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
         पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास, मतदाराच्या जन्माच्या वेळी संबंधित व्यक्तीचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत सादर करणे आवश्यक राहील.
         भारताबाहेर जन्म झाल्यास
भारताबाहेर जन्म झालेल्या व्यक्तींनी विदेशस्थित भारतीय दूतावास किंवा मिशनने जारी केलेल्या जन्म नोंदणीच्या पुराव्याची प्रत सादर करावी. नोंदणीकरण किंवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व प्राप्त केले असल्यास नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक राहील.
          मतदारांनी नोंदींची पडताळणी करावी
मतदार यादीतील नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ तसेच संबंधित नातेवाईकांच्या नोंदींमध्ये अचूकता असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदारांनी संकेतस्थळावर उपलब्ध असलेली मागील मतदार यादीतील माहिती तपासून घ्यावी. माहितीमध्ये तफावत आढळल्यास किंवा संबंधित नोंद उपलब्ध नसल्यास घाबरून न जाता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त झाल्यास त्यामध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत.
          पात्र नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढाकार घ्यावा
लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार यादीत आपले नाव नोंदलेले असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः प्रथमच मतदान करणारे युवक, स्थलांतरित नागरिक तसेच मतदार यादीतील तपशीलामध्ये बदल झालेले नागरिक यांनी मतदार यादीची विशेष पडताळणी करावी.
          30 सप्टेंबर 2026 ही दावे व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे नागरिकांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता प्रारुप मतदार यादीतील आपले नाव व तपशील तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

- जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया
00000000

Friday, 4 September 2026

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

 






मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा योगदानाचे स्मरण; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार

गोंदिया, दि.4 : भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या अधिपत्याखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया व एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 ऑगस्टदरम्यान विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे उत्साहात पार पडला. जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर हॉकीचे जादूगार व महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून देण्यात मेजर ध्यानचंद यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या क्रीडा कारकिर्दीची व ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरीची माहिती उपस्थित खेळाडूंना यावेळी देण्यात आली.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी पूजा श्रीवास, क्रीडा अधिकारी राहुल देशमुख, विविध एकविध क्रीडा संघटनांचे प्रशिक्षक व पदाधिकारी तसेच विविध खेळांचे प्रशिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षकांनी खेळाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासह व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व विशद केले. तसेच खेळाडूंनी योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित सराव याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास खेलो इंडिया, मिशन लक्ष्यवेध तसेच नेटबॉलचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार, क्रीडा प्रतिज्ञा, पारंपरिक खेळ, सायकल रॅली आदी विविध उपक्रम घेण्यात आले.
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविणाऱ्या युकांत उके, दक्ष ठाकरे, खुशी हलमारे, रोहित शरणागत आणि एविना चौरागडे या खेळाडूंना शिष्यवृत्तीचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज गायकवाड यांनी केले, तर अंकुश गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

‘प्रशस्त 2.0’ प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ आता मराठीत उपलब्ध


दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्राथमिक तपासणीसाठी शिक्षकांचे सक्षमीकरण
गोंदिया, दि.4 : दिव्यांग विद्यार्थ्यांची लवकर ओळख पटवून त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य मिळावे, यासाठी भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने विकसित केलेली ‘प्रशस्त 2.0’ प्रणाली शिक्षकांसाठी उपयुक्त ठरत आहे. या प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाच्या 21 प्रकारांची प्राथमिक तपासणी करण्यास मदत होते.
यापूर्वी या प्रणालीचे मार्गदर्शक व्हिडिओ हिंदी व इंग्रजी भाषेत उपलब्ध होते. आता मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे प्रणालीचा वापर अधिक सुलभ व प्रभावी होणार आहे.
‘प्रशस्त 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे निरीक्षण, प्राथमिक माहिती संकलन, माहितीची पडताळणी, अहवाल निर्मिती आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा देण्याची प्रक्रिया समजून घेता येते. ही प्रणाली केवळ प्राथमिक तपासणीसाठी असून, त्याद्वारे अधिकृत दिव्यांगत्व प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय निदान केले जात नाही.
दिव्यांग विद्यार्थ्यांची वेळेवर ओळख. योग्य संदर्भ सेवा आणि आवश्यक शैक्षणिक सहाय्य यामुळे समावेशित शिक्षण अधिक प्रभावी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. मराठी भाषेतील मार्गदर्शक व्हिडिओ हा महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी ‘प्रशस्त 2.0’ प्रणालीचा वापर अधिक सुलभ, परिणामकारक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
महाराष्ट्रातील 1,08,096 शाळांमधील 7,27,181 शिक्षकांपैकी 5,22,100 शिक्षकांनी (71.79%) मार्गदर्शक व्हिडिओच्या माध्यमातून ‘प्रशस्त 2.0’ प्रणालीची माहिती घेतली आहे. उर्वरित मुख्याध्यापक व शिक्षकांनी मराठी मार्गदर्शक व्हिडिओंचा उपयोग करून प्रणालीची माहिती घेऊन विद्यार्थ्यांचे संवेदनशीलपणे निरीक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000000

भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा

 


शिक्षण, कौशल्य विकासातून समाजाच्या प्रगतीला चालना देण्याचे आवाहन
गोंदिया, दि.4 : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या वतीने पंचायत समिती सभागृह, गोंदिया येथे 31 ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या सविता पुराम होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रूपेशकुमार राऊत व सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रणिता कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी केले.
शिक्षणासोबत कौशल्य विकास व पुनर्कौशल्य विकासावर भर देऊन भटके-विमुक्त समाजाच्या प्रगतीला चालना देणे आवश्यक आहे, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती, डिजिटल शिक्षण तसेच उच्च व व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सविता पुराम यांनी भटके-विमुक्त समाजाच्या स्थिर निवास, शिक्षण, आरोग्य, रोजगार व आवश्यक कागदपत्रांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी शासन व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चित्र व भिंतीचित्रक प्रदर्शनी, व्याख्यान, वैद्यकीय तपासणी शिबीर तसेच गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये रोहिणी गोपे, बैजेस्वरी मेश्राम, निलेश मेश्राम, अर्मन कोल्हे, सुमित नागपुरे, भावेश बावणे, तनुश्री मानकर, वेद दानवे तसेच एम.टेक. पदवी प्राप्त नेहा राठोड यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भटके-विमुक्त समाजातील पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश अतकरे, देवदास बनकर, महेश चौधरी, आत्माराम खंडाते, भोलेश्वर वाढई, आयुष पुस्तोडे, रजत कुंभरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नितीन साळुंखे यांनी मानले.
00000000

Thursday, 3 September 2026

जिल्ह्यात 6 ते 20 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

 

                                                                                                                     गोंदिया, दि.4 : जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 10 सप्टेंबर रोजी पोळा, 11 सप्टेंबरला मारबत व 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 6 सप्टेंबर पासून ते 20 सप्टेंबर 2026 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.                        

000000000


शासकीय वसतिगृह प्रवेशाकरीता 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

गोंदिया, दि.4 : शैक्षणिक सत्र 2026-२27 करिता इतर मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरण्यात यावा. मेरीट लिस्ट प्रमाणे वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळाला नाही, त्या विद्यार्थ्यांचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेमध्ये रुपांतरीत करण्यात येईल.
शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाईन पोर्टलवर 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह प्रवेशाकरीता दि.15 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधीत वसतिगृह अथवा इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात विहीत मुदतीत सादर करावी.
गोंदिया जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, दिव्यांग, अनाथ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या विद्यार्थ्यांनी वसतिगृह तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीकरीता ओबीसी मुला-मुलींचे वसतिगृह, गोंदिया येथील गृहपाल तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गोंदिया या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी केले आहे.
0000000

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचले पाहिजे - राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

 








गोंदिया, दि.3 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणारे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना नियमित, पारदर्शक व वेळेत मिळणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अन्नधान्य पोहोचले पाहिजे, यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.

राज्य अन्य आयोग बुधवारपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी राज्य अन्य आयोगाचे सदस्य ईश्वर बाळबुधे, सह सचिव अशोक आत्राम, अपर जिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी श्री. ढवळे यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय अन्नधान्य वितरण व्यवस्था, शिधापत्रिकाधारकांना मिळणारे धान्य, रास्त भाव दुकानदारांचे कामकाज तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारी, शालेय पोषण आहार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मातृवंदना योजना, बाल विकास केंद्र व कुपोषण आदींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013, हा देशातील नागरिकांना कमी दरात आणि दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन शासनाच्या विविध योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अन्नधान्य योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्नधान्य वितरणामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये, यासाठी नियमित तपासणी करावी. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी देखरेख ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.     

रास्त भाव दुकानांमध्ये लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दुकानांच्या कामकाजात पारदर्शकता ठेवावी. अन्नधान्य वितरणाबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे. पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आंगणवाडी, रास्तभाव दुकाने व शालेय पोषण आहार यामध्ये संबंधित यंत्रणांकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत याबाबत दर्शनी भागात फलक लावण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अडचणी, लाभार्थ्यांच्या समस्या आणि तक्रारी याबाबत स्थानिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करून शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासन, रास्त भाव दुकानदार आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोंदिया जिल्ह्यात एकूण 999 रास्तभाव दुकाने असून 3 लाख 8 हजार 215 शिधापत्रिकाधारक आहेत. अन्नधान्य साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यात 10 गोडाऊन आहेत. जिल्ह्यात आधार सीडींग 100% पूर्ण झालेली आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

यावेळी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 12 लाभार्थ्यांना आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत 02 लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पवन खंदारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.

                                                      00000000


Wednesday, 2 September 2026

स्वातंत्र्य लढ्यात स्व.सुखदेव अग्रवाल यांचे महत्वपूर्ण योगदान - पालकमंत्री इंद्रनील नाईक


 




गोंदिया, दि.2 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान दिले. गोंदिया येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांनीही स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून नव्या पिढीने देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

स्वातंत्र्य संग्राम सेनानी (माजी आमदार) स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त आज श्री गुरुनानक स्कुल ग्राऊंड, गोंदिया येथे आयोजित समारंभात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे, सर्वश्री माजी आमदार गोपालदास अग्रवाल, हेमंत पटले, केशव मानकर, गिरीष व्यास, तसेच माजी नगराध्यक्ष दामोधर अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, कमलकिशोर अग्रवाल मंचावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होताना स्व. सुखदेव अग्रवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले. अशा स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या स्मृती जपणे ही समाजाची जबाबदारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या कार्यातून देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी, जेणेकरुन नवीन पिढीला याची माहिती होईल व त्यापासून त्यांना प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

खासदार श्री. जैन म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांचे योगदान हे गोंदिया जिल्ह्याच्या आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, स्व. सुखदेव अग्रवाल यांचे जीवनकार्य भावी पिढीला देशहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या जीवनकार्यातून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार प्रफुल पटेल यांचा संदेश एैकविण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गोंदिया येथील स्व. सुखदेव अग्रवाल यांचे योगदान मोलाचे आहे, असा संदेश त्यांनी दिला.

यावेळी नगराध्यक्ष सचिन शेंडे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल व गिरीष व्यास, कमलकिशोर अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तत्पूर्वी एस. एस. अग्रवाल मुन्सीपल गर्ल्स हायस्कुल, गोंदिया येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या स्मरनार्थ गोंदिया जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांच्या परिवारातील व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले.

                                                      0000000


Tuesday, 1 September 2026

पळसगाव राका येथील नवजीवन विद्यालयातील 17 मुलींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे यशस्वी एचपीव्ही लसीकरण

 




          गोंदिया, दि.1 : 8 मार्च जागतिक महिला दिनापासुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतुन व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेतुन जिल्ह्यात सर्वत्र वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलींसाठी मोफत लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहे.
           जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रत्यक्ष कार्यवाहीत गावपातळीवरील शासकीय आरोग्य संस्थेत लसीकरण केले जात आहे.
            सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वंदना घरोटे यांच्या संकल्पनेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत पळसगाव राका येथील 'नवजीवन विद्यालया'तील 17 मुलींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे दि.31 ऑगस्ट रोजी यशस्वी एचपीव्ही लसीकरण करण्यात आले.
           गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) मुलींचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मोहिमेला या भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक पातळीवर मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत येणाऱ्या पळसगाव राका येथील 'नवजीवन विद्यालय' या शाळेतील 17 पात्र विद्यार्थिनींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे सुरक्षितपणे एचपीव्ही (HPV) लसीकरण पूर्ण करण्यात आले.
           14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना या जीवघेण्या आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागातर्फे ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वंदना घरोटे, नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापिका पद्मा चुटे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक आगलावे यांचे योग्य नियोजनामुळे शाळा प्रशासनाने मुलींना विश्वासात घेऊन या लसीकरणासाठी प्रवृत्त केले.
ग्रामीण रुग्णालय सौंदड येथील वैद्यकीय पथकाने सर्व मुलींची प्राथमिक तपासणी करून त्यांना एचपीव्ही लसीकरणचा डोस दिला. लसीकरणानंतर सर्व विद्यार्थिनींची प्रकृती उत्तम असून, त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही वेळ ठेवण्यात आले होते. आरोग्य प्रशासनाने इतरही पालकांना आपल्या 14 ते 15 वर्षे वयाच्या मुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
           सदर एचपीव्ही लसीकरण प्रसंगी आरोग्य सेविका सपना नागदेवे, आरोग्य सेवक अतुल टेंभुर्णे, आरोग्य सहायिका कल्पना ढोमणे, शिक्षकवर्ग माधुरी पातोडे, हेमणे, सुरेश मेंढे, मेश्राम यांचे समुपदेशन व मार्गदर्शन यशस्वी ठरले. स्टाफ नर्स अश्विनी गहाणे यांनी सर्व मुलींना एचपीव्ही लसीकरण केले.
          एचपीव्ही लस काय आहे?
ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा एक सामान्य विषाणू आहे. या संसर्गामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. ही लस या धोकादायक विषाणूपासून 93 ते 100 टक्के संरक्षण देते.
         वयाची कोणती वेळ योग्य आहे?
ही लस 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मोफत देण्यात येत आहे. या वयात रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. लैंगिक संबंध सुरू होण्यापूर्वी लस घेणे अधिक फायदेशीर ठरते.
        सुरक्षा आणि गैरसमज
ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेने याचा निवाळा दिला आहे. या लसीमुळे वंध्यत्व येत नाही, हा एक केवळ गैरसमज आहे. लसीमुळे हातावर हलकी सूज किंवा दुखणे यांसारखे अगदी सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु ते घाबरण्यासारखे नाही आहे.
000000000

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

 


हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश

गोंदिया,  दि.1 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि.16 नोव्हेंबर 2026 पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दि.25 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.

        सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. खेडेकर यांनी नमूद केले आहे.

        23 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर 2026 पासून विविध 10 केंद्रांवर तर 65 व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर 2026 पासून आयोजित करण्यात येणार आहे.

        नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि.25 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात.

         विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका भरता येणार नाही.

       स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

             राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

                                                             00000000


सुधारित- पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

 


गोंदिया, दि.1 : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक हे दि.2 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9 वाजता लोणारा, नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता गोंदिया येथे आगमन व स्व. सुखदेव अग्रवाल (स्वतंत्रता संग्राम सेनानी - माजी आमदार) यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त एस.एस.गर्ल्स स्कुल, गोंदिया येथे आयोजित प्रतिमा अनावरण समारंभास उपस्थिती. दुपारी 12 वाजता स्व. सुखदेव अग्रवाल (स्वतंत्रता संग्राम सेनानी – माजी आमदार) यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त श्री गुरुनानक स्कुल ग्राऊंड, गोंदिया येथे आयोजित मुख्य जयंती समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वाजता खासदार प्रफुल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट. तदनंतर सोईनुसार गोंदिया येथून मोटारीने पुसद, जि.यवतमाळकडे प्रयाण करतील.

                                                        0000000


Monday, 31 August 2026

गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

 



गोंदिया, दि.31 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज सोमवार (दि.31 ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत जिल्ह्यातील एकूण ११,२३,८०५ मतदारांचा समावेश असून नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी राजकीय पक्षाच्या आयोजित बैठकीत केले.
प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ९,६३,१५९ (८५.७१%) पडताळणी झालेले मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय 63-अर्जुनी मोरगावमध्ये २,२९,८८२ (८८.७१%), 64-तिरोडा २,२२,५५३ (८३.०८%), 65-गोंदिया २,६८,२३७ (८२.२९%) आणि 66-आमगाव २,४२,४८७ (८९.५४%) मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, पत्ता न सापडलेले, दुबार किंवा अन्य ठिकाणी नोंद असलेले असे १,६०,६४६ (१४.२९ %) मतदार स्वतंत्र यादीत समाविष्ट करण्यात आले असून ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हास्तरावर तसेच सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
दरम्यान, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदार यादीबाबतचे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000000

‘30 वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’अभियानात आरोग्य तपासणी करुन पुढील गुंतागुंत टाळा : झेनिथ दोंतुला, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.गोंदिया

 




1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार अभियान

            गोंदिया, दि.31 : महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतुन 'तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला' आरोग्य अभियान दि.1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान पुढील 100 दिवस राबबिण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तीस वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांमधील असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आहे. तरी गोंदियावासियांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंतुला यांनी केले आहे.

सदर अभियानात 30 वर्ष व त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषांची तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी व नोंदणी करणे, मधुमेह व उच्च रक्त्दाबाचे लवकर निदान करणे, तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करुन संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी संदर्भीत करणे तसेच तपासणीपासुन निदान, उपचार व पाठपुराव्यापर्यंतची माहिती पोर्टलवर अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.

सदर अभियान जिल्ह्यातील गावपातळीवर राबविण्यात येणार असुन तीस वर्षावरील 100 टक्के लोकांची अंससर्गजन्य आजाराबाबत तपासणी करण्यात येणार आहे. ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ यासाठी सदर अभियान महत्वपुर्ण असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी म्हटले आहे.

            अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्देश

कालावधी : हे अभियान 1 सप्टेंबरपासून पुढील 100 दिवस मिशन मोडवर राबवले जाणार आहे.

लक्ष्य गट : राज्यातील 30 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुष.

मुख्य उद्दिष्ट : केवळ आरोग्य तपासणी करणे नव्हे, तर आजाराचे लवकर निदान करून रुग्णाला त्वरित योग्य उपचारांखाली आणणे. तसेच जनमानसात जनजागृती करणे आहे.

कोणत्या आजारांची होणार तपासणी?

या अभियानांतर्गत प्रामुख्याने खालील गंभीर आजारांची मोफत तपासणी, निदान आणि उपचार केले जातील.

मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High Blood Pressure).

कर्करोग (Cancer) : यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग (Cervical Cancer), स्तन कर्करोग (Breast Cancer) आणि मुखाचा कर्करोग (Oral Cancer) यांची तपासणी केली जाईल.

        हे अभियान कसे राबवले जाईल?

घरोघरी भेट : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका (Asha Workers), एएनएम (ANM) आणि एमपीडब्ल्यू (MPW) दररोज सुमारे 40 ते 45 घरांना भेटी देऊन तपासणी न झालेल्या नागरिकांची यादी तयार करतील.

गावनिहाय पथके : समुदाय वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावनिहाय पथके तयार करून नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.

फॉलो-अप (पाठपुरावा) : तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक समुपदेशन (Counseling) आणि पुढील उपचारांची सुविधा मिळत आहे की नाही, यावर नियमित लक्ष ठेवले जाईल.

डिजिटल ट्रॅकिंग : अभियानांतर्गत होणाऱ्या सर्व तपासण्यांचे अहवाल जतन केले जातील आणि 'डॅशबोर्ड'च्या माध्यमातून प्रगतीवर देखरेख ठेवली जाईल.

00000000


जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटीपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी 2 सप्टेंबरला उपस्थित राहावे


         गोंदिया, दि.31 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात सीईटी, जेईई, नीट यासारख्या प्रवेश पात्रता प्रक्रियेमधून व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षीत प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले जाती दावा पडताळणीसाठी प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे सादर केलेले आहेत परंतु अर्जदारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल आयडीवर, फोनद्वारे, पत्राद्वारे त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत त्यांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी बुधवार दि.2 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            जाती दावा पडताळणीसाठी संबंधित प्रवर्गानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर 1961 तसेच इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 13 ऑक्टोबर 1967 च्या पूर्वीचे अथवा त्या लगतचे त्यांचे कुटुंबियांचे तसेच गोंदिया जिल्ह्याचे सर्वसाधारण अधिवासाच्या आवश्यक त्या मुळ पुराव्यासह उपस्थित रहावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी कळविले आहे.

                                              000000000                                         

विशेष लेख... 31 ऑगस्ट- भटक्या विमुक्त समाजाचा सोनेरी दिवस

 

भटक्या विमुक्त समाजाचा इतिहास समजून घेतल्याशिवाय या दिवसाचे महत्त्व स्पष्ट होऊ शकत नाही. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक लहान-लहान भटक्या आणि आदिवासी जमातींनी ब्रिटिशांविरुद्ध गनिमी काव्याने तीव्र संघर्ष केला होता. या जमाती जंगलात राहणाऱ्या, सातत्याने स्थलांतर करणाऱ्या आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या होत्या. त्यांच्या या फिरस्त्या स्वभावामुळे आणि स्वातंत्र्यवृत्तीमुळे ब्रिटिश सरकार त्रस्त झाले होते. या बंडखोर जमातींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये 'क्रिमिनल ट्राइब्स अ‍ॅक्ट' (Criminal Tribes Act - गुन्हेगार जमाती कायदा) संमत केला. या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतातील जवळपास १५० हून अधिक जमातींना थेट 'जन्मतः गुन्हेगार' (Criminal by Birth) म्हणून घोषित केले. याचा अर्थ असा होता की, या जमातीत जन्माला आलेले लहान मूलही कायद्याच्या नजरेत जन्मापासूनच गुन्हेगार मानले जाई. या कायद्यांतर्गत समाजबांधवांना विशिष्ट 'सेटलमेंट कॅम्प्स' (जसे की सोलापूर येथील सेटलमेंट) मध्ये डांबून ठेवण्यात आले. या छावण्यांभोवती काटेरी तारांचे कुंपण असायचे आणि पोलिसांचा कडक पहारा असायचा.  छावणीत राहणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा हजेरीच्या ठिकाणी जाऊन आपली उपस्थिती नोंदवावी लागत असे. जर एखादी व्यक्ती हजेरीला मुकली, तर त्याला अमानुष मारहाण आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली जाई. त्यांच्या मुक्त संचारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. शिक्षण, सन्मानाने जगणे किंवा स्वतःचा व्यवसाय करणे या गोष्टी त्यांच्यासाठी दिवास्वप्न बनल्या होत्या. पिढ्यानपिढ्या हा समाज या गुलामीच्या अंधारात जगत राहिला. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवातीच्या काळात वसतिगृहे सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली होती.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते, परंतु 'क्रिमिनल ट्राइब्स अ‍ॅक्ट' रद्द न झाल्यामुळे हे सेटलमेंट कॅम्प्स तसेच सुरू होते आणि भटक्या जमातींवरील अन्याय सुरूच होता.देशातील अनेक समाजसुधारक, नेते आणि विमुक्त समाजाच्या नेत्यांनी या कायद्याविरोधात आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या लक्षात आणून दिले की या जमातीचे लाखो लोकं जातीच्या नावाखाली  जन्मत:च गुन्हेगार म्हणून अद्याप कैदखान्यात आहेत. केंद्र सरकारने या कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी  एम. अनंतशयनम अय्यंगार समिती ची स्थापना केली. या समितीने देशभरातील स्थितीचा अभ्यास करून १९५१ मध्ये हा जुलमी कायदा रद्द करण्याची शिफारस केली. पुढे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः सोलापूर येथील सेटलमेंट कॅम्पला भेट दिली आणि ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा काळा कायदा अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा केली. आपल्या भाषणात पंडीत नेहरु म्हणतात, आम्ही सर्वजण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुक्त आहोत; पण या गुन्हेगार जमातीचे सगळेजण स्वातंत्र्यलढ्यात होते. त्यामुळे आजपासून (३१ ऑगस्ट१९५२) ते ‘विशेष मुक्त’ आहेत. पंडीत नेहरुंच्या या घोषणेमुळे या समाजाची 'जन्मतः गुन्हेगार' या कलंकातून आणि जाचातून मुक्तता झाली. म्हणूनच, १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन असला तरी, ३१ ऑगस्ट हा खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त समाजाचा 'स्वातंत्र्यदिन' म्हणजेच 'सोनेरी दिवस' आहे. 'क्रिमिनल ट्राइब्स अ‍ॅक्ट' या कायद्याच्या बदल्यात सरकारने 'हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट' (Habitual Offenders Act, १९५२) लागू केला, जो संपूर्ण जमातीला नव्हे तर वैयक्तिक गुन्हेगारांना लागू होतो.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या दिवसाचे महत्त्व ओळखून दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'भटके विमुक्त दिवस' म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय ३१  जुलै २०२५  रोजी घेतला आहे.

 -डॉ.रुपेशकुमार राऊत