गोंदिया, दि.2 : देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक
स्वातंत्र्यसैनिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान दिले. गोंदिया येथील स्वातंत्र्य
संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांनीही स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण योगदान
दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून नव्या पिढीने देशसेवेची प्रेरणा घ्यावी, असे
प्रतिपादन उद्योग, सार्वजनिक
बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे
राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.
स्वातंत्र्य
संग्राम सेनानी (माजी आमदार) स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या 125 व्या जयंती
महोत्सवानिमित्त आज श्री गुरुनानक स्कुल ग्राऊंड, गोंदिया येथे आयोजित समारंभात
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र जैन,
आमदार विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष सचिन शेंडे, सर्वश्री माजी आमदार गोपालदास
अग्रवाल, हेमंत पटले, केशव मानकर, गिरीष व्यास, तसेच माजी नगराध्यक्ष दामोधर
अग्रवाल, जयप्रकाश गुप्ता, कमलकिशोर अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य
लढ्यात सहभागी होताना स्व. सुखदेव अग्रवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च
प्राधान्य दिले. त्यांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ
मिळाले. अशा स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे त्यांनी
सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती नव्या
पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या स्मृती जपणे ही समाजाची जबाबदारी आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या कार्यातून देशप्रेम, सामाजिक
बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या
कार्याची माहिती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी,
जेणेकरुन नवीन पिढीला याची माहिती होईल व त्यापासून त्यांना प्रेरणा मिळेल, असे
त्यांनी सांगितले.
खासदार श्री. जैन म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम
सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांचे योगदान हे गोंदिया जिल्ह्याच्या आणि देशाच्या
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण
करून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी
सांगितले.
आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, स्व. सुखदेव
अग्रवाल यांचे जीवनकार्य भावी पिढीला देशहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे
आहे. त्यांच्या जीवनकार्यातून देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठेची
प्रेरणा घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार प्रफुल पटेल यांचा संदेश
एैकविण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गोंदिया येथील स्व. सुखदेव अग्रवाल
यांचे योगदान मोलाचे आहे, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन शेंडे, माजी आमदार
गोपालदास अग्रवाल व गिरीष व्यास, कमलकिशोर अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी एस. एस. अग्रवाल मुन्सीपल गर्ल्स
हायस्कुल, गोंदिया येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव अग्रवाल यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या
हस्ते अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. सुखदेव
अग्रवाल यांच्या स्मरनार्थ गोंदिया जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी
यांच्या परिवारातील व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत
विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख
सुत्रसंचालन अपुर्व अग्रवाल यांनी केले.
0000000
No comments:
Post a Comment