जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Tuesday, 22 September 2026
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. प्रभाकर गद्रे अनंतात विलीन
गोंदिया, दि.22 : इतिहास संशोधन,
शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ मोलाचे योगदान देणारे
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. प्रभाकर गद्रे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी सोमवारी, दि.21
सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन व
सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
डॉ. गद्रे यांच्या पार्थिवाची
अंत्ययात्रा मंगळवार, दि.22 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आमगाव येथील जमीदार
वाड्यासमोरील त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली. साकरीटोला घाट मोक्षधाम
येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना
श्रद्धांजली देण्यात आली. इतिहास संशोधन, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या
माध्यमातून त्यांनी समाजात ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य
केले. त्यांच्या निधनाने इतिहास क्षेत्राची तसेच सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
झाली असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
डॉ. गद्रे यांच्या अंत्यदर्शनासाठी
इतिहास, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, सहकारी आणि नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत भावपूर्ण
श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. प्रभाकर गद्रे यांच्या निधनाने एक
अभ्यासू इतिहास संशोधक, मार्गदर्शक आणि सामाजिक प्रबोधनाची भूमिका जपणारा
व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांच्या कार्याची आठवण सदैव
प्रेरणादायी राहील.
00000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment