जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 22 September 2026

लोकसहभाग व जनजागृतीतून आपत्ती व्यवस्थापन करणे महत्त्वाचे - जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर : गणेश उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी Bappa.org संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन

 







गोंदिया, दि.21 : आपत्ती सांगून येत नाही. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी जीवित व वित्तीय हानी कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम तसेच रोजगाराच्या संधींची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी, दि.21 सप्टेंबरला गोंदिया येथील सिव्हील लाईन परिसरातील अपना गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर बोलत होते.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अपना गणेशोत्सव मंडळाचे संचालक पंकज रहांगडाले, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जीडीसीसी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. भेंडारकर यांनी आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच आपत्तीपूर्व तयारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि बचावकार्याबाबत प्रत्येकाने प्राथमिक माहिती घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. अलीकडे नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तीय हानी झाली. अशा आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर बचावकार्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांमुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती मिळण्यास मदत होत असल्याचे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनीही आपत्तीच्या प्रसंगी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व स्पष्ट केले.
गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देऊन गणेश उत्सव निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती तसेच भारताची संस्कृती आराध्य दैवत गणपती यांच्या माध्यमातून जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्यामार्फत करणाऱ्या उपक्रमांचे छायाचित्र व माहिती Bappa.org या लिंकवर जाऊन किंवा क्युआर कोड स्कॅन करुन विविध शासकीय योजनांची माहिती सदर लिंकवर अपलोड करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सदर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. यावेळी सदर उपक्रमाबद्दल जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये यांच्यामार्फत अपना गणेश मंडळाचे संचालक पंकज रहांगडाले यांना भित्तीपत्रक भेट देण्यात आले. तसेच सदर उपक्रमाची माहिती संपूर्ण जिल्हावासियांना व्हावी यासाठी सार्वजनिक मंडळ व घरगुती गणपती स्थापित करणाऱ्या भाविकांनी त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती Bappa.org या संकेतस्थळावर भेट देऊन किंवा क्युआर कोड स्कॅन करुन माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे निमसरकर यांनी केले आहे.
*टाकाऊ वस्तूंपासून ‘फ्लोटींग डिव्हाईस’ची निर्मिती *
यावेळी घरगुती तसेच टाकाऊ वस्तूंपासून शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक असणारे ‘फ्लोटींग डिव्हाईस’ तयार करून त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पूरपरिस्थितीत उपलब्ध साधनसामग्रीचा सुरक्षित पद्धतीने उपयोग करून बचावकार्य कसे करता येते, याबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या वेळी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर, सुरक्षितता आणि बचावाच्या प्राथमिक उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमास अपना गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित अवस्थी, सदस्य सर्वश्री अरविंद तिवारी, निलेश गुप्ता, अजित टेंभरे, विवेक रहांगडाले, दीपक मालगुजर, मोहन लिल्हारे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

No comments:

Post a Comment