आदिवासी विकास विभागाच्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ देवरीत शुभारंभ;
आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जनजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी
गोंदिया, 17 : आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ आज १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, देवरी येथे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जनजागृतीपर चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाची सुरुवात करण्यात आली.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. आदिवासी नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना आणि त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधांची माहिती पोहोचविणे, नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या अभियानांतर्गत देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयासह गोंदिया जिल्ह्यातील ११ आदिवासी आश्रमशाळांमध्ये विविध उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यासोबतच आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, शिबिरांचे आयोजन करणे आणि पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
वन हक्क अधिनियमांतर्गत पात्र अतिक्रमणधारकांना ७/१२ उतारे व हक्क प्रमाणपत्रांचे वाटप, विविध प्रमाणपत्रांसाठी विशेष उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला बचत गटांची स्थापना आणि महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘फिट इंडिया’ क्रीडा सत्र, आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व ग्रामसभांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड वाटप, गावागावांत ‘पेसा मोबिलायझर’च्या माध्यमातून योजनांची माहिती व आवश्यक साहित्याचे वाटप तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची तपासणी करून आवश्यक सूचना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून प्रशासन आणि आदिवासी नागरिक यांच्यातील थेट संपर्क अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांच्यासह नगराधक्ष संजय उईके, महिला व बालविकास विभागाच्या माजी सभापती सविता पुराण, शारदा उईके, शिला मारगाये, शीलाताई उईके, छाया ताई मडावी, अवंतिका आचरे, नूतन सयाम, प्रभा सलामे, सुषमा पांढरे आदी उपस्थित होते. सेवा, समर्पण, संवेदनशीलता या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा आदिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर यांनी केले आहे.
00000000000
No comments:
Post a Comment