जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 31 August 2026

गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

 



गोंदिया, दि.31 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज सोमवार (दि.31 ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत जिल्ह्यातील एकूण ११,२३,८०५ मतदारांचा समावेश असून नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी राजकीय पक्षाच्या आयोजित बैठकीत केले.
प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ९,६३,१५९ (८५.७१%) पडताळणी झालेले मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय 63-अर्जुनी मोरगावमध्ये २,२९,८८२ (८८.७१%), 64-तिरोडा २,२२,५५३ (८३.०८%), 65-गोंदिया २,६८,२३७ (८२.२९%) आणि 66-आमगाव २,४२,४८७ (८९.५४%) मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, पत्ता न सापडलेले, दुबार किंवा अन्य ठिकाणी नोंद असलेले असे १,६०,६४६ (१४.२९ %) मतदार स्वतंत्र यादीत समाविष्ट करण्यात आले असून ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हास्तरावर तसेच सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
दरम्यान, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदार यादीबाबतचे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000000

‘30 वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’अभियानात आरोग्य तपासणी करुन पुढील गुंतागुंत टाळा : झेनिथ दोंतुला, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.गोंदिया

 




1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार अभियान

            गोंदिया, दि.31 : महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतुन 'तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला' आरोग्य अभियान दि.1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान पुढील 100 दिवस राबबिण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तीस वर्षांवरील सर्व महिला व पुरुषांमधील असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आहे. तरी गोंदियावासियांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंतुला यांनी केले आहे.

सदर अभियानात 30 वर्ष व त्यावरील प्रत्येक महिला व पुरुषांची तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी व नोंदणी करणे, मधुमेह व उच्च रक्त्दाबाचे लवकर निदान करणे, तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करुन संशयित रुग्णांना पुढील तपासणीसाठी संदर्भीत करणे तसेच तपासणीपासुन निदान, उपचार व पाठपुराव्यापर्यंतची माहिती पोर्टलवर अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.

सदर अभियान जिल्ह्यातील गावपातळीवर राबविण्यात येणार असुन तीस वर्षावरील 100 टक्के लोकांची अंससर्गजन्य आजाराबाबत तपासणी करण्यात येणार आहे. ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ यासाठी सदर अभियान महत्वपुर्ण असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी म्हटले आहे.

            अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्देश

कालावधी : हे अभियान 1 सप्टेंबरपासून पुढील 100 दिवस मिशन मोडवर राबवले जाणार आहे.

लक्ष्य गट : राज्यातील 30 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुष.

मुख्य उद्दिष्ट : केवळ आरोग्य तपासणी करणे नव्हे, तर आजाराचे लवकर निदान करून रुग्णाला त्वरित योग्य उपचारांखाली आणणे. तसेच जनमानसात जनजागृती करणे आहे.

कोणत्या आजारांची होणार तपासणी?

या अभियानांतर्गत प्रामुख्याने खालील गंभीर आजारांची मोफत तपासणी, निदान आणि उपचार केले जातील.

मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (High Blood Pressure).

कर्करोग (Cancer) : यामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग (Cervical Cancer), स्तन कर्करोग (Breast Cancer) आणि मुखाचा कर्करोग (Oral Cancer) यांची तपासणी केली जाईल.

        हे अभियान कसे राबवले जाईल?

घरोघरी भेट : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका (Asha Workers), एएनएम (ANM) आणि एमपीडब्ल्यू (MPW) दररोज सुमारे 40 ते 45 घरांना भेटी देऊन तपासणी न झालेल्या नागरिकांची यादी तयार करतील.

गावनिहाय पथके : समुदाय वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवकांच्या माध्यमातून गावनिहाय पथके तयार करून नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.

फॉलो-अप (पाठपुरावा) : तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक समुपदेशन (Counseling) आणि पुढील उपचारांची सुविधा मिळत आहे की नाही, यावर नियमित लक्ष ठेवले जाईल.

डिजिटल ट्रॅकिंग : अभियानांतर्गत होणाऱ्या सर्व तपासण्यांचे अहवाल जतन केले जातील आणि 'डॅशबोर्ड'च्या माध्यमातून प्रगतीवर देखरेख ठेवली जाईल.

00000000


जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटीपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी 2 सप्टेंबरला उपस्थित राहावे


         गोंदिया, दि.31 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात सीईटी, जेईई, नीट यासारख्या प्रवेश पात्रता प्रक्रियेमधून व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षीत प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले जाती दावा पडताळणीसाठी प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे सादर केलेले आहेत परंतु अर्जदारांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल आयडीवर, फोनद्वारे, पत्राद्वारे त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत त्यांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी बुधवार दि.2 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया येथे आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            जाती दावा पडताळणीसाठी संबंधित प्रवर्गानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 10 ऑगस्ट 1950, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 21 नोव्हेंबर 1961 तसेच इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 13 ऑक्टोबर 1967 च्या पूर्वीचे अथवा त्या लगतचे त्यांचे कुटुंबियांचे तसेच गोंदिया जिल्ह्याचे सर्वसाधारण अधिवासाच्या आवश्यक त्या मुळ पुराव्यासह उपस्थित रहावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी कळविले आहे.

                                              000000000                                         

विशेष लेख... 31 ऑगस्ट- भटक्या विमुक्त समाजाचा सोनेरी दिवस

 

भटक्या विमुक्त समाजाचा इतिहास समजून घेतल्याशिवाय या दिवसाचे महत्त्व स्पष्ट होऊ शकत नाही. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक लहान-लहान भटक्या आणि आदिवासी जमातींनी ब्रिटिशांविरुद्ध गनिमी काव्याने तीव्र संघर्ष केला होता. या जमाती जंगलात राहणाऱ्या, सातत्याने स्थलांतर करणाऱ्या आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या होत्या. त्यांच्या या फिरस्त्या स्वभावामुळे आणि स्वातंत्र्यवृत्तीमुळे ब्रिटिश सरकार त्रस्त झाले होते. या बंडखोर जमातींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये 'क्रिमिनल ट्राइब्स अ‍ॅक्ट' (Criminal Tribes Act - गुन्हेगार जमाती कायदा) संमत केला. या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतातील जवळपास १५० हून अधिक जमातींना थेट 'जन्मतः गुन्हेगार' (Criminal by Birth) म्हणून घोषित केले. याचा अर्थ असा होता की, या जमातीत जन्माला आलेले लहान मूलही कायद्याच्या नजरेत जन्मापासूनच गुन्हेगार मानले जाई. या कायद्यांतर्गत समाजबांधवांना विशिष्ट 'सेटलमेंट कॅम्प्स' (जसे की सोलापूर येथील सेटलमेंट) मध्ये डांबून ठेवण्यात आले. या छावण्यांभोवती काटेरी तारांचे कुंपण असायचे आणि पोलिसांचा कडक पहारा असायचा.  छावणीत राहणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्तीला दिवसातून अनेक वेळा स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा हजेरीच्या ठिकाणी जाऊन आपली उपस्थिती नोंदवावी लागत असे. जर एखादी व्यक्ती हजेरीला मुकली, तर त्याला अमानुष मारहाण आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली जाई. त्यांच्या मुक्त संचारावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. शिक्षण, सन्मानाने जगणे किंवा स्वतःचा व्यवसाय करणे या गोष्टी त्यांच्यासाठी दिवास्वप्न बनल्या होत्या. पिढ्यानपिढ्या हा समाज या गुलामीच्या अंधारात जगत राहिला. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवातीच्या काळात वसतिगृहे सुरू करून शिक्षणाची दारे खुली केली होती.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते, परंतु 'क्रिमिनल ट्राइब्स अ‍ॅक्ट' रद्द न झाल्यामुळे हे सेटलमेंट कॅम्प्स तसेच सुरू होते आणि भटक्या जमातींवरील अन्याय सुरूच होता.देशातील अनेक समाजसुधारक, नेते आणि विमुक्त समाजाच्या नेत्यांनी या कायद्याविरोधात आवाज उठवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या लक्षात आणून दिले की या जमातीचे लाखो लोकं जातीच्या नावाखाली  जन्मत:च गुन्हेगार म्हणून अद्याप कैदखान्यात आहेत. केंद्र सरकारने या कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी  एम. अनंतशयनम अय्यंगार समिती ची स्थापना केली. या समितीने देशभरातील स्थितीचा अभ्यास करून १९५१ मध्ये हा जुलमी कायदा रद्द करण्याची शिफारस केली. पुढे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः सोलापूर येथील सेटलमेंट कॅम्पला भेट दिली आणि ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा काळा कायदा अधिकृतपणे रद्द करण्याची घोषणा केली. आपल्या भाषणात पंडीत नेहरु म्हणतात, आम्ही सर्वजण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुक्त आहोत; पण या गुन्हेगार जमातीचे सगळेजण स्वातंत्र्यलढ्यात होते. त्यामुळे आजपासून (३१ ऑगस्ट१९५२) ते ‘विशेष मुक्त’ आहेत. पंडीत नेहरुंच्या या घोषणेमुळे या समाजाची 'जन्मतः गुन्हेगार' या कलंकातून आणि जाचातून मुक्तता झाली. म्हणूनच, १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन असला तरी, ३१ ऑगस्ट हा खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्त समाजाचा 'स्वातंत्र्यदिन' म्हणजेच 'सोनेरी दिवस' आहे. 'क्रिमिनल ट्राइब्स अ‍ॅक्ट' या कायद्याच्या बदल्यात सरकारने 'हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट' (Habitual Offenders Act, १९५२) लागू केला, जो संपूर्ण जमातीला नव्हे तर वैयक्तिक गुन्हेगारांना लागू होतो.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या दिवसाचे महत्त्व ओळखून दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'भटके विमुक्त दिवस' म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय ३१  जुलै २०२५  रोजी घेतला आहे.

 -डॉ.रुपेशकुमार राऊत

Friday, 28 August 2026

‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस’ निमित्ताने कायदेविषयक जनजागृती

 



गोंदिया, दि.28 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गोंदिया यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय गोदिया मार्फत ग्रामपंचायत कवलेवाडा ता.गोरेगाव येथे 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस’ निमित्ताने कायदेविषयक जनजागृती कार्यकम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके, सहाय्यक लोकअभिरक्षक अॅड. अतुल येडे, रिटेनर/पॅनल लॉयर अॅड. रोशनी पटले, पोलिस पाटील डोंगरुटोला किशोरकुमार भगत, पोलिस पाटील कवलेवाडा राहुल बोरकर, ग्रामपंचायत कवलेवाडा सरपंच सकुंतला कटरे, उपसरपंच टोमेंद्र तांडेकर, ग्रामविकास अधिकारी एस.एस. पाझारे, पी.एल.व्ही. आनंदकुमार पटले, माजी पं.स. सदस्य कुतनबाई पारधी व कवलेवाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अॅड. अतुल येडे यांनी 21 ऑगस्ट राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, NALSAची राष्ट्रीय विधी सेवा हेल्पलाइन आणि नालसा पोर्टल, नालसा जागृती योजना 2025, नालसा योजना 2025 अंतर्गत शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपाययोजना, समाजात महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता या विषयावर माहिती दिली.
अॅड. रोशनी पटले यांनी पर्यायी विवाद निवारण (ADR) आणि त्यांचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये, पीडीत व्यक्तींसाठी नुकसानभरपाई योजना, वन्यजीव-मानव संघर्ष प्रकरणांमधील पीडीतांना न्याय मिळवून देण्याबाबतची NALSA योजना 2025 या विषयावर मार्गदर्शन केले.
ॲड. एन.के. वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य व हक्क या विषयी माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांच्या 'समस्या, त्यांचे अधिकार, कायदेशीर सरंक्षण, मोफत कायदेविषयक सेवा तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा आदर करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे असे सांगण्यात आले. सदर कार्यकमाच्या माध्यमातुन जेष्ठ नागरिकांना कायदेशीर मदत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोरकुमार भगत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राहुल बोरकर यांनी मानले. कार्यक्रमास कवलेवाडा गावातील रहिवासी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया कर्मचारी व पी.एल व्ही असे जवळपास 100 नागरिक उपस्थित होते.
0000000

राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याची संधी : प्राप्त अर्जांची 31 ऑगस्टला सोडत; शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहावे


गोंदिया, दि.28 : राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादनाच्या अत्याधुनिक पद्धती, कृषी प्रक्रिया, मूल्यवर्धन, बाजारपेठ व्यवस्था तसेच कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे - राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे.
सन 2026-27 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार छाननी करण्यात येत असून, पात्र अर्जदारांची निवड करण्यासाठी सोडत (लॉटरी) प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
सदर सोडत प्रक्रिया दि.31 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आयोजित करण्यात आली आहे. सोडतीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियम, अटी व मार्गदर्शक सूचनांनुसार देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यामुळे या योजनेसाठी अर्ज केलेल्या संबंधित शेतकऱ्यांनी दि.31 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे प्रत्यक्षरित्या उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी केले आहे.
00000000

विशेष लेख... रानभाजी महोत्सव : आरोग्य, परंपरा आणि ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा

 





रानभाज्यांच्या जतनातून निरोगी जीवनशैली आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश


पावसाळा सुरू झाला की जंगल, शेतशिवार आणि डोंगरकपारींमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची रेलचेल दिसून येते. एकेकाळी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या रानभाज्या आज आधुनिक जीवनशैलीत मागे पडत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम केवळ पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणारे नसून, आरोग्यदायी आहाराची जाणीव करून देणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये रानभाजी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात महिला बचत गट, उमेद अभियानातील स्वयं-सहाय्यता गट आणि महिला शेतकऱ्यांनी आयोजीत उपक्रमात सहभागी झाल्यात. गोंदिया तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाची, स्थानिक उत्पादनांच्या बाजारपेठेची आणि रानभाज्यांच्या वाढत्या मागणीची साक्ष देणारी ठरली.
रानभाज्या म्हणजे निसर्गाची आरोग्यसंपदा रानभाज्या कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि कीटकनाशकांशिवाय नैसर्गिकरीत्या वाढतात. त्यामुळे त्या सुरक्षित, पौष्टिक आणि आरोग्यदायी मानल्या जातात. काटवल, सुरण, तरोटा, खापरखुटी, अंबाडी, शेवगा, घोळभाजी, कोचईची पाने, केना, पातूर भाजी, मशरूम यांसारख्या रानभाज्यांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, तंतुमय घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पचनक्रिया सुधारणे आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी या भाज्या उपयुक्त ठरतात.
परंपरा जपण्याची आणि नव्या पिढीला जोडण्याची गरज
आजच्या फास्टफूड संस्कृतीत अनेक मुलांना रानभाज्यांची नावेही माहिती नाहीत. पूर्वी आपल्या पूर्वजांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या या भाज्या हळूहळू विस्मृतीत जात आहेत. त्यामुळे रानभाजी महोत्सव नव्या पिढीला आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देतो. या महोत्सवातून रानभाज्यांचे पौष्टिक मूल्य, त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचतात.
महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे साधन
रानभाजी महोत्सव हा केवळ प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून ग्रामीण महिलांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग ठरत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे मूल्यवर्धन करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास महिलांना रोजगाराच्या नव्या संधी यानिमित्त उपलब्ध होऊ शकतात. योग्य प्रक्रिया, पॅकेजिंग आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्यास रानभाज्यांवर आधारित लघुउद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतात.
रानभाजी महोत्सव का आवश्यक आहे?
रानभाजी महोत्सवामुळे लोकांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण होते, पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन होते, स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित होते आणि ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होतात. तसेच रानभाज्यांचे संवर्धन, त्यावरील संशोधन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळते. अशा उपक्रमांमुळे "आरोग्यदायी आहार, समृद्ध शेतकरी आणि सक्षम महिला" हा उद्देश प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होते.
रानभाज्या या केवळ पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या नाहीत, तर त्या आपल्या आरोग्याचा, संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अमूल्य ठेवा आहेत. त्यामुळे अशा महोत्सवांचे आयोजन वर्षानुवर्षे अधिक व्यापक स्वरूपात होणे ही काळाची गरज आहे. यामुळे निरोगी समाज, स्वावलंबी महिला आणि समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था घडविण्याच्या दिशेने निश्चितच मोठे पाऊल उचलले जाईल.

- अंजु कांबळे निमसरकर
जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदाचा खुमेंद्र बोपचे यांनी स्वीकारला पदभार

 





गोंदिया, दि.28 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदियाचा प्रभारी पदभार खुमेंद्र बोपचे यांनी गुरुवारी स्वीकारला.

            मीनाक्षी कांबळे यांची बदली नागपूर कार्यालयात झाली असून श्री. बोपचे यांनी गोंदिया जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. श्री. बोपचे सध्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी भंडारा या पदावर कार्यरत आहेत.

            पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालये, ग्रंथालय चळवळ, वाचकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा तसेच ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने कामकाजाला प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला. 

00000000


Thursday, 27 August 2026

विशेषवृत्त... विद्यार्थी खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता मात्र नववीनंतर गती थांबते

 

शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही क्रीडा प्रकारात प्रचंड क्षमता आणि आकर्षण दिसून येत असले आणि खेळाची आवड असली तरी नववी नंतर त्यामध्ये खंड पडत असल्याचे जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असल्याचे समजते.

जिल्ह्यामध्ये शासकीय व नगरपालिकेचे असे एकूण दहा क्रीडा मैदान आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी खेळाडू सह सर्वच वयोगटातील नागरिक विविध खेळ खेळताना अथवा व्यायाम करताना दिसून येतात.
आठ तालुक्यातील आठ ठिकाणी शासकीय क्रीडा संकुल आणि गोंदिया शहरात 1 असे नऊ तसेच नगरपालिकेमार्फत एक असे दहा क्रीडा संकुल आहेत.
भारतीय लोकप्रिय क्रीडा प्रकार क्रिकेट हा सर्वत्र खेळला जात असला तरी, त्याच बरोबर कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती हे क्रीडांगणात खेळले जाणारे खेळही दिसून येतात. मात्र, क्रिकेट हा खेळ मैदानात खेळला जात असल्यामुळे आणि त्याला आतापर्यंतची लाभलेली लोकप्रियता अधिक असल्यामुळे तसेच जास्त प्रेक्षक पहात असल्यामुळे तो भारतातला नंबर एकचा खेळ मानला जातो.
कबड्डी, खो-खो, कुस्ती यासारखे भारतीय खेळही लोकप्रिय आहेत, प्रत्येक विद्यार्थी दशेतला खेळाडू हे खेळ खेळतोच हे मात्र निश्चित. गोंदिया जिल्ह्यातही खेळांमध्ये खेळणारे खेळाडू आहेतच आणि त्यांनी जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय आणि काहींनी तर राष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक मिळवलेले आहे.
ज्याला इनडोअर खेळ म्हणतात ते टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळातही आत्ता खेळाडू मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागील दहा वर्षापासून खाजगी बॅडमिंटन अकादमी चालवणारे कोच अँथनी यांचे म्हणणे आहे आज बॅडमिंटन या खेळाला खूप मागणी आहे. जागतिक स्तरावर हा खेळ तिसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतातही राष्ट्रीय पातळीवर चौथ्या, पाचव्या क्रमांकावर हा खेळ खेळला जातो. कोच अँथनी यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या हाताखालून जाणारे खेळाडू हे अति उत्कृष्ट खेळत असताना त्यांची दहावीची अथवा बारावीची परीक्षा येते आणि ट्युशन अथवा अभ्यासामुळे ते खेळांपासून दूर होतात हे फार दुखत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील काही खेळाडूंनी बॅडमिंटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पटलावर नावलौकिक केले आहे. गोंदिया सारख्या शहरातही क्षमता असलेले खेडाळू आहेत, मात्र काही प्रमाणात सातत्य नसणे, दहावीच्या - बारावीच्या अभ्यासामुळे त्यांचे खेळ सुटणे हे एक मोठे कारण आहे. जर या खेळाडूंनी सातत्य ठेवले तर हे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावू शकतात एवढी क्षमता इथल्या खेळाडूंमध्ये आणि या खेळांमध्ये आहे असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारची खेलो इंडिया या योजनेअंतर्गत सातवी - आठवी च्या विद्यार्थ्यांना खेळांमध्ये अधिक आवड निर्माण व्हावी. पुढे राष्ट्रीय पातळीवर या खेडाळूंना मंच मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहेत. भविष्यात ऑलम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई गेम सारख्या खेळांमध्ये अधिक पदके भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. खेलो इंडिया अंतर्गत जिल्ह्यात एक प्रशिक्षक नेमलेला आहे.
यासह मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत राज्यस्तरावरील सहभागी खेळाडूंना प्रशिक्षकासह त्यांच्या आहाराची व्यवस्थाही करण्यात येते. मिशन लक्षवेध अंतर्गतही एक प्रशिक्षक जिल्ह्यात आहे. राज्य शासनाकडून एकूण 49 खेळ प्रकारांना अनुदान दिले जाते.
जिल्ह्यात ॲथिलिटिक या क्रीडा प्रकारात सर्वाधिक खेळाडू आहेत. ज्यांनी जिल्हास्तर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय पातळीवरही नाव कमावलेले आहे. राजेश राऊत या खेळाडूला आट्यापाट्या या खेळ प्रकारात राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कारही मिळालेला आहे.
योग्य प्रशिक्षण, आहार, व्यायाम आणि पालकांचा खंबीर पाठिंबा खेडाळूला मिळाला तर खेडाळूंचे आयुष्य उज्ज्वल आहे, असे प्रशिक्षक अँथनी सांगतात.

-जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

🏅 राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष... गोंदियातील सुसज्ज क्रीडा संकुलांचा लाभ घ्या; ग्रामीण खेळाडूंना मिळतेय आधुनिक व्यासपीठ

  


गोंदिया | २७ ऑगस्ट : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता आणि क्रीडा कौशल्याला योग्य दिशा मिळावी, त्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि जिल्ह्यात क्रीडा संस्कृती अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात जिल्हा तसेच तालुका क्रीडा संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. आज ही क्रीडा संकुले शेकडो खेळाडूंसाठी सराव व प्रशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळे आणि युवा खेळाडूंनी या उपलब्ध क्रीडा सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

🏟️ मरारटोलीतील जिल्हा क्रीडा संकुल ठरतेय खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ

मरारटोली, गोंदिया येथे सुमारे ६ हेक्टर क्षेत्रावर जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलात इंडोअर हॉल, जलतरण तलाव, पॅव्हेलियन इमारत, मुलांचे वसतिगृह, ४०० मीटर धावनपथ यासह क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस, हँडबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो आणि कबड्डी आदी खेळांसाठी सुविधा उपलब्ध आहेत.

याशिवाय संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रणाली आणि विद्युतीकरणाच्या सुविधाही उपलब्ध आहेत. दररोज सुमारे ५०० ते ६०० खेळाडू या संकुलाचा लाभ घेत आहेत.

🏃 तालुका क्रीडा संकुलांतून ग्रामीण खेळाडूंना संधी

तिरोडा, सालेकसा, गोंदिया (कामठा), देवरी, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे तालुका क्रीडा संकुले कार्यान्वित झाली आहेत.

या संकुलांमध्ये २०० मीटर धावनपथ, मल्टिपर्पज इनडोअर बॅडमिंटन हॉल, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल व व्हॉलीबॉलची मैदाने उपलब्ध आहेत. कार्यालयीन इमारती, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि संरक्षण भिंतीची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून खेळाडू नियमितपणे सराव करत आहेत.

🔧 दुसऱ्या टप्प्यात सुविधांचे आधुनिकीकरण

क्रीडा संकुलांमध्ये दुसऱ्या टप्प्यात विविध विकासकामे सुरू आहेत. यात धावनपथाचे अपग्रेडेशन, सिंथेटिक व्हॉलीबॉल कोर्ट, जिम हॉल, बॅडमिंटन हॉल व प्रसाधनगृहांचे आधुनिकीकरण, चेनलिंक फेन्सिंग, सोलर सिस्टीम, विद्युतीकरण, हायमास्ट दिवे, अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा यांचा समावेश आहे.

ही कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

🏹 तिरोड्यात आर्चरी-कराटे, सालेकसात कबड्डी-खो-खोचे प्रशिक्षण

तिरोडा येथे आर्चरी व कराटे, तर सालेकसा येथे कबड्डी व खो-खो या खेळांचे नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना त्यांच्या गावाजवळच दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

अर्जुनी मोरगाव येथील तालुका क्रीडा संकुलात मल्टिपर्पज गेम हॉल, २०० मीटर धावनपथ, संरक्षण भिंत तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल कोर्टची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, संबंधित जागेबाबत उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने पुढील विकासकामे सध्या स्थगित आहेत.

⏰ सकाळ-संध्याकाळ नियमित प्रशिक्षण

जिल्ह्यातील क्रीडा संकुलांमध्ये सकाळी ६.३० ते ८ आणि सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत प्रशिक्षित क्रीडा मार्गदर्शकांमार्फत व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कराटे आणि आर्चरीचे नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात शेकडो मुले-मुली उत्साहाने सहभागी होत आहेत.

🥇 राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये गोंदियाची चमक

गोंदिया जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असून आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत आहेत. उपलब्ध क्रीडा सुविधा आणि नियमित प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपल्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नागरिकांनी क्रीडा संकुलांना भेट देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, तसेच "क्रीडा हीच जीवनशैली" हा संदेश समाजात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.


🌟 क्रीडा संकुले : ग्रामीण प्रतिभेला नवी दिशा!

गोंदियातील क्रीडा संकुले ही केवळ खेळाची मैदाने नसून ग्रामीण भागातील युवा प्रतिभेला घडविणारी आधुनिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर केल्यास गोंदियातील खेळाडू भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करू शकतात.

खेळा • घडवा • जिंका!
"क्रीडा हीच जीवनशैली" 🏆

#Hashtags

#राष्ट्रीयक्रीडादिन #गोंदिया #क्रीडासंकुल #क्रीडामहोत्सव #ग्रामीणखेळाडू #क्रीडासंस्कृती #SportsDay #Gondia #Sports #खेळाडी #क्रीडाहीचजीवनशैली

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचा लाभ घेऊन पिकांचे संरक्षण करावे

 


गोंदिया, दि.27 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव वेळेत ओळखून योग्य उपाययोजना करता याव्यात, यासाठी क्रॉपसॅप (CROPSAP)- पिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत विविध पिकांमध्ये आढळणाऱ्या किडी व रोगांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणामधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पिकांवरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव, त्याची तीव्रता आणि परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना योग्य वेळी पीक संरक्षणाचा सल्ला देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी क्रॉपसॅप प्रकल्पाचा उपयोग पिकांवरील किडी व रोगांची प्राथमिक अवस्थेत ओळख होण्यास मदत होते. किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करता येतात. कृषी विभागाकडून पिकाच्या परिस्थितीनुसार शास्त्रीय व तांत्रिक मार्गदर्शन मिळते. अनावश्यक कीटकनाशकांच्या फवारण्या टाळून आवश्यकतेनुसारच पीक संरक्षण उपाययोजना करता येतात. योग्य कीटकनाशक, योग्य मात्रा व योग्य वेळी फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन मिळते. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या (IPM) उपाययोजनांना प्रोत्साहन मिळते.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नियमित पाहणी करावी. पिकावर किडी किंवा रोगाची लक्षणे आढळल्यास सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप अंतर्गत देण्यात येणाऱ्या कीड-रोग व पीक संरक्षण विषयक सल्ल्याची माहिती नियमितपणे घ्यावी व त्यानुसारच उपाययोजना कराव्यात. पिकांची नियमित पाहणी करावी व कीड व रोगाची लक्षणे ओळखून कृषी विभागाचा सल्ला घ्यावा तसेच योग्य वेळी योग्य उपाययोजना करावे. सर्व शेतकरी बांधवांनी पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचा लाभ घेऊन पिकांचे प्रभावी पीक संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

                                                                               00000000

Wednesday, 26 August 2026

विशेष लोक अदालतीत चार प्रकरणांचा निपटारा

 


गोंदिया, दि.27 : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली दि.21, 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया येथे सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे सामंज्यस्याने निकाली काढण्यासाठी 'समाधान समारोह-2026' या विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये 23 प्रकरणे गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाले, त्यापैकी 3 प्रकरणे इतर जिल्ह्यात स्थांनातरीत करण्यात आले. 20 प्रकरणांपैकी 1 प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले. उर्वरीत 19 प्रकरणात मध्यस्थी करीता त्यातील सर्व पक्षकारांच्या पुर्वबैठका जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके यांनी प्रत्यक्ष व आभासी पध्दतीने घेवुन मध्यस्थी केली. त्यामुळे 19 प्रकरणांपैकी 4 प्रकरणे सामोपचाराने व सामंजस्याने निकाली काढण्यात यश आले.

सदर प्रकरणे निकाली काढण्याकरीता व 'समाधान समारोह-2026' ही विशेष लोक अदालत यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया येथील न्यायालयीन कर्मचारी व पी.एल.व्ही यांनी अथक परिश्रम घेवुन सहकार्य केले. अशाप्रकारे सदर लोकअदालतीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना दिल्लीला जाण्याची गरज भासली नाही. तसेच पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.   

अशाच लोकअदालतीचा लाभ सामान्य लोकांना मिळण्याकरीता दि.12 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यात नियमित लोकअदालतीचे आयोजन केले आहे. त्याचा संबंधीत पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

                                                                                00000000

नेपाळमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

 


गोंदिया, दि. २६ ऑगस्ट २०२६ : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल :

जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, गोंदिया

☎️ 07182-230196

☎️ 1077 (टोल फ्री) for BSNL

Mo:- 9404 991599 (Whatsapp)

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा.

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती व समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.

                                                                    00000000

Tuesday, 25 August 2026

जिल्ह्यातील 5,169 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटींहून अधिक कर्जमाफीची रक्कम जमा

 



गोंदिया, दि.25 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 5,169 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 30 कोटी 30 लाख 38 हजार रुपयांहून अधिक कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

राज्यभरात या टप्प्यात 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी 30 लाख 62 हजार  रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील 5,169 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 4355 शेतकऱ्यांच्या खात्यात 24 कोटी 59 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थी हे विविध राष्ट्रीयकृत बँकांचे खातेदार आहेत.

कर्जमाफीची रक्कम थेट खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, शासनाच्या या निर्णयाबद्दल लाभार्थी शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

                                                   00000000


अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज MahaDBT 2.0 वर सादर करावेत

 


गोंदिया, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया MahaDBT 2.0 या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. सन 2025-26 मधील शिष्यवृत्ती अर्ज अद्याप सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनाही विहित मुदतीत अर्ज सादर करता येणार आहेत.

या प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती यांसारख्या योजना ऑनलाइन राबविण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांनी नवीन महाआयडी (Maha ID) तयार करणे आवश्यक असून आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करावे. आधारशी संबंधित वैयक्तिक माहिती, मोबाइल क्रमांक, ई-मेल व बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. आवश्यक कागदपत्रे स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करून अर्ज ऑनलाइन सादर करावा.

नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करावा’ हा पर्याय निवडावा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सहकार्य करावे तसेच पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठवावेत.

अधिक माहितीसाठी 022-49150800 / 18001025311 किंवा helpdesk@mahadbt.gov.in येथे संपर्क साधावा.

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत मोकाट जनावरे व अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईचे निर्देश - अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे

 




गोंदिया, दि.२५ : महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अंतर्गत गोवंश हत्या बंदीच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी आणि प्राणी कल्याणाच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

बैठकीला पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. जालिंदर तिटमे, सहायक आयुक्त डॉ. संजय गायगवळी, पोलीस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे, सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच विविध गौशाळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. घोरपडे यांनी ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात प्राणी जन्म नियंत्रण केंद्र (Animal Birth Control Unit) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरांमध्ये वाढलेल्या मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचा नियमानुसार बंदोबस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात वाढत असलेल्या कुत्रा चावण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच जनावरांच्या अवैध वाहतुकीवर पोलीस विभागाने कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या जनावरांना अधिकृत अॅनिमल शेल्टर हाऊसमध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

प्राणी जन्म नियंत्रण केंद्रांच्या उभारणीसाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यानुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे वर्गीकरण, गौशाळांची अद्ययावत यादी, मासिक घटनांची नोंद आणि जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यावरही भर देण्यात आला.

पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त डॉ. जालिंदर तिटमे यांनी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकृत गौशाळांची माहिती देत, दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येत असल्याचे सांगितले.

                                                      00000000


Monday, 24 August 2026

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ : क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल


गोंदिया, दि.24 : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून 21 ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आणि ‘मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धे’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेसाठी यापूर्वी 19 ऑगस्ट 2026 पर्यंत रील्स अपलोड करण्याची मुदत निश्चित करण्यात आली होती. परंतु नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल घेत मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेसाठी रील्स अपलोड करण्याची मुदत आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

मृद व जलसंवर्धनाबाबत नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच या विषयाशी संबंधित नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र, क्षेत्रीय स्तरावर या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रील्स तयार करून अपलोड करण्यासाठी उपलब्ध झालेला कमी कालावधी लक्षात घेऊन स्पर्धेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत रील्स अपलोड करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्याचा शासन निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. “माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा” या संदेशातून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

 

गोंदिया, दि.24 : "खेलेगा भारत, जीतेगा भारत" या संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन दिनांक 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. यावर्षीचे अभियान "Tribute | Play | Move -अभिवादन । खेळ । सक्रिय हालचाल" या तीन स्तंभांवर आधारित आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, क्रीडा संस्था, क्रीडा मंडळे तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी आपल्या स्तरावर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रमांतर्गत मेजर ध्यानचंद यांना अभिवादन, क्रीडा स्पर्धा, "Ek Ghanta Khel Ke Maidan Mein" अंतर्गत किमान एक तास क्रीडा उपक्रम, पारंपरिक खेळ, मैत्रीपूर्ण सामने, फिटनेस उपक्रम, सायकल रॅली, वॉकेथॉन, रनिंग तसेच जनजागृतीपर उपक्रम आयोजित करता येतील.

विशेषतः दि.29 ऑगस्ट रोजी "Ek Ghanta Khel Ke Maidan Mein" या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी किमान एक तास क्रीडा उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करावा. तसेच दि.30 ऑगस्ट 2026 रोजी "Special Sundays on Cycle" अंतर्गत सायकल रॅली व विविध फिटनेस उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा.

कार्यक्रमांचे आयोजन करताना महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचा सर्वसमावेशक सहभाग, तसेच सुरक्षितता, पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रथमोपचार व आवश्यक सुरक्षा व्यवस्था यांची विशेष काळजी घ्यावी.

राष्ट्रीय क्रीडा दिन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता "क्रीडा ही जीवनशैली" या भावनेतून प्रत्येक नागरिकाने क्रीडेशी जोडले जावे, यासाठी सर्व संबंधित संस्था व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी कळविले आहे.

0000000

बेरोजगार व्यक्तींकरिता "सीसीटीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन व रीपेरिंग" व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण

 





गोंदिया, दि.24 : बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कुडवा (गोंदिया) द्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केले जातात. ही संस्था भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे संचालित केले जाते. स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने आजपर्यन्त 10,713 ग्रामीण व्यक्तींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 7,875 व्यक्तींनी मिळविलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वयंरोजगार सुरू केला आहे.

बँक ऑफ इंडिया (आरसेटी) स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेद्वारे बेरोजगार 18 ते 50 वयोगटातील व्यक्तींकरीता "सीसीटीव्ही कॅमेरा इंस्टॉलेशन व रीपेरिंग" या व्यवसायाचे 13 दिवसीय मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परंतु आरसेटीला कोर्स सुरू करण्याकरिता कमीत कमी 30 ते 35 उमेदवारांची गरज असते. तसेच या संस्थेमध्ये विविध प्रकारचे कोर्स नि:शुल्क असून राहण्याची, जेवणाची नि:शुल्क सोय प्रशिक्षण संस्थेतच करण्यात येत आहे. त्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखाली कुटुंबातील इच्छुक लोकांनी जास्तीत जास्त संख्येने व लवकरात लवकर संस्थेत येऊन आपले नाव नोंद करावेत.

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा व तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार करावा. ग्रामीण भागातील बेरोजगारांना प्राधान्य देण्यात येइल. इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन पत्र निदेशक, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, वाहने पॅलेस, हरिणखेडे पेट्रोलपंप जवळ, तिरोडा रोड, कुडवा (गोंदिया) येथे त्वरित जमा करावे. अधिक माहितीसाठी 9834895077/8698140105/8788625680 यावर संपर्क साधावा, असे संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांनी कळविले आहे.

                                                         00000000


जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक : 10 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे


गोंदिया, दि.24 : प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम 1960 ची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 14 मार्च 2017 च्या अधिसुचनेनुसार सदर समितीवर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यासाठी जिल्ह्यातील गौशाळा/पांजरपोळ संस्थापैकी एक संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाचे दोन सदस्य, मानव हितकारक कार्य करणारे किंवा प्राण्यांवर प्रेम करणारे अथवा प्राणी कल्याणासाठी कार्य करणारे पाच ते सहा नावाची शिफारस शासनास करावयाची आहे.

यासाठी गट निहाय तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी यांचेमार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी व gondia.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी संबंधितांनी दि.10 सप्टेंबर 2026 पर्यंत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती (सर्व) यांचेकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त, गोंदिया यांनी केले आहे.

0000000

जिल्ह्यात 5 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

 


        गोंदिया, दि.24 : जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्ता रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत. तसेच 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद, 28 ऑगस्टला रक्षाबंधन व 4 सप्टेंबर रोजी कृष्ण जन्माष्टमी हे सण/उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियम क्रमांक 22 चे कलम 37 (1) (3) अन्वये दिनांक 22 ऑगस्ट पासून ते 5 सप्टेंबर 2026 पर्यंत अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.                        

0000000

लोकशाही दिनाचे आयोजन 7 सप्टेंबरला

 


            गोंदिया, दि.24 :  जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेसाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत. सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवारी दि.7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. 

            लोकशाही दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांचेकडून जनतेच्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी एैकून घेण्यात येतील आणि शासनाच्या विविध विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी यांना त्या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त या कार्यक्रमात ज्या नागरिकांनी 15 दिवसापूर्वी अर्ज सादर केलेले आहेत, त्यांनीच लोकशाही दिनात उपस्थित राहून आपल्या तक्रारी, अडचणी व गाऱ्हाणी सादर करावीत. याबाबत सर्व जनतेनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले आहे.

0000000

Friday, 21 August 2026

गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील पायाभुत सुविधांसाठी 15 कोटी मंजूर - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 





         गोंदिया, दि.21 : गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील पायाभुत सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

         तत्पूर्वी जिल्ह्यातील उद्योजक आणि उद्योग विभागाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीत गोंदिया जिल्ह्यातून दरवर्षी 2 हजार कोटीचा तांदूळ निर्यात होतो. त्यामुळे या भागात राईस मिल उद्योगांची संख्या अधिक आहे. त्याअनुषंगाने येथील एमआयडीसीमधील राईस मिल उद्योग व इतर उद्योगांना चालना देवून औद्योगिक विकासाला गती देणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि खादी व ग्रामोद्योग विभागाचा आढावा घेण्यात आला, तसेच जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मंदार पत्की, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनिथ चंद्रा दोंतुला, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त विक्की खिराळे, एमआयडीचे प्रादेशिक अधिकारी मनोहर पोटे, खादी व ग्रामोद्योग अधिकारी इंद्रजित देवीपुत्र यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

          श्री. सामंत म्हणाले, येथील औद्योगिक पदाधिकाऱ्यांच्या ट्रान्सपोर्टबाबत अडचणी लक्षात घेता, गोंदिया एमआयडीसीमध्ये कंटेनर पार्क तयार करण्यात येणार. 2 हजार कोटीचा तांदूळ जिल्ह्यातून उत्पादित होते, त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चांगला प्रकल्प निर्माण करण्यात येईल. राज्य शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बॅंकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त बेरोजगारांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी पी. एम. विश्वकर्मा व मधाचे गाव या योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यात अविकसित असलेले भूखंड तातडीने ताब्यात घेऊन गरजू लहान उद्योजकांना वाटप करण्याच्या अनुषंगाने तत्परतेने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकसित करण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याविषयी त्यांनी आवश्यक सूचना एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या.

          यावेळी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी गोंदिया जिल्ह्यातून जवळपास 2 हजार कोटी तांदळाची निर्यात होत असल्याबाबत अवगत केले. तसेच जिल्ह्यातील तांदूळ निर्यातकांचा वाहतूक खर्च कमी होण्याच्या उद्देशाने गोंदिया शहरालगत कंटेनर डेपो विकसित करण्याची मागणी केली. या विषयावर त्यांनी कॉनकॉर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. कॉनकॉर कंपनी याबाबत सकारात्मक असून जिल्हा प्रशासनाने सदर डेपोकरिता जागा उपलब्ध करुन द्यावी,असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच गोंदिया तालुक्यात मौजा डोंगरगाव येथे अंदाजे 40 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित एमएसएमई पार्कच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला.

         गोंदिया जिल्ह्यात राईस मिलिंग ही मुख्य औद्योगिक प्रक्रिया असून राईस मिल उद्योजकांना व विशेषत: तांदूळ निर्यातकांना निर्यातवाढीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. बैठकीत उद्योजकांना होणाऱ्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत सखोल चर्चा त्यांनी औद्योगिक संघटनांशी केली व या समस्या तत्परतेने सोडविण्याबाबत आवश्यक निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

         यावेळी उपस्थित औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व अडचणींवर सखोल व सकारात्मक चर्चा केल्याबद्दल मंत्रीमहोदयांचे आभार मानले.

                                                                   0000000