जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Thursday, 20 August 2026

वृद्ध व मयत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला गती; प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीच्या सूचना

 


गोंदिया, दि.20: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः वृद्ध शेतकरी, ज्यांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (SOP) लागू करण्यात आली आहे.

महाआयटीने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत राज्यभरातील १६.९६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असून त्यापैकी १३.४८ लाख लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण सुरू आहे. मात्र, वृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने अनेकांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने विशेष प्रक्रिया निश्चित केली आहे.

यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार कार्ड व बँक पासबुकसह भेट देऊन आधार प्रमाणीकरणाचा प्रयत्न करायचा आहे. किमान तीन वेळा प्रयत्न करूनही प्रमाणीकरण न झाल्यास "Unable to Authenticate" हा पर्याय वापरून प्रकरण तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पाठविले जाईल. त्यानंतर तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ओळख निश्चित करून प्रमाणीकरण पूर्ण करण्यात येईल.

महाआयटीच्या यादीतील काही पात्र शेतकरी मयत असल्याचे बँकांच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित बँकांनी प्रथम वारस नोंद करून योजनेच्या पोर्टलवरील "Upload Deceased Accounts" सुविधेद्वारे वारसांची माहिती अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एका कर्ज खात्यास कमाल सहा वारसांची नोंद करता येणार असून प्रत्येक वारसाचा कर्जातील हिस्सा पूर्णांक स्वरूपात नमूद करावा लागणार आहे. सर्व वारसांच्या हिश्श्यांची एकूण बेरीज १०० टक्के असणे आवश्यक आहे.

अपलोड केलेल्या माहितीची महाआयटीमार्फत शासनाच्या निकषांनुसार छाननी करण्यात येईल. पात्र वारसांची नव्याने यादी प्रसिद्ध करून प्रत्येक वारसाचे आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक (Farmer ID) नोंदणी अनिवार्य राहणार आहे. एका पेक्षा अधिक वारस असल्यास त्यांच्या कर्जातील हिश्श्यानुसार कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल. आयकरदाता किंवा शासकीय/निमशासकीय सेवेत कार्यरत अथवा निवृत्तीवेतनधारक वारस योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरू शकतात.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व संबंधित बँका, आपले सरकार सेवा केंद्रे आणि महसूल प्रशासनाने या दोन्ही प्रक्रियांची तातडीने अंमलबजावणी करून पात्र वृद्ध व मयत शेतकऱ्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, तरी पात्र शेतकऱ्यांनी लाभ उचलण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

                                                  0000000

No comments:

Post a Comment