गोंदिया, दि.14 : स्व. माजी मुख्यमंत्री
सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रातील जलसंधारणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान
दिले असून “पाणी अडवा, पाणी जिरवा” या विचारातून पाणलोट विकास, भूजल
पुनर्भरण तसेच लघु जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या जलसंधारणातील
उल्लेखनीय कामांमुळे त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा “जलसंधारण
दिन” म्हणून साजरा करणेबाबत राज्याचे
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची संकल्पना असून मंत्री, मृद व जलसंधारण विभाग
यांच्या निर्देशानुसार 21 ऑगस्ट 2026 हा स्व. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक
यांच्या जयंतीदिनी जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने
घेतला आहे. त्यानिमित्ताने दि.15 ते 21 ऑगस्ट दरम्यान “जलसंधारण सप्ताह” साजरा करण्याचे शासनाचे धोरण आहे.
गोंदिया जिल्ह्यात सुध्दा जलसंधारण सप्ताह
15 ते 21 ऑगस्ट 2026 पर्यंत तालुका स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
त्यानुसार दि.15 ऑगस्ट रोजी जलसंधारणाची शपथ घेणे. दिनांक 16 ते 20 ऑगस्ट 2026
पर्यंत जलसंधारण विषयक निबंध, चित्रकला, घोषवाक्य व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे.
विद्यार्थ्यांसाठी जलसंधारण व पाणी बचतीबाबत व्याख्याने/मार्गदर्शन सत्रे आयोजित
करणे. स्थानिक जलस्त्रोत, तलाव, बंधारे इत्यादींच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे.
विद्यार्थ्यांना जलदूत/जलसंधारण दूत म्हणून सहभागी करुन घेऊन जलसंधारणाचा संदेश कुटुंब
व समाजापर्यंत पोहोचविणे. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या संकल्पनेवर आधारित जनजागृती करणे. पावसाचे पाणी साठवणूक, भूजल पुनर्भरण
व पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देणे. दिनांक 21 ऑगस्ट 2026
रोजी सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” (Maha Walkathon-Walk for Water) उपक्रम
राबविण्यात येणार आहे.
0000000
No comments:
Post a Comment