जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 5 August 2026

शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीवर सुरु

 


गोंदिया, दि.5 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सुरु करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीच्या लाभार्थी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने, अचूक माहिती अर्जामध्ये भरावी. महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे ऑनलाईन राबविण्यात येणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे आहेत.

मॅट्रिकोत्तर (Post-Matric) शिष्यवृत्ती योजना : विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना २. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना. राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (विजाभज/विमाप्र). व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहातील निवासी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता प्रदान करणे (विजाभज/विमाप्र). शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विजाभज विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता. इमाव प्रवर्गातील मुलींकरिता शिष्यवृत्ती (व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या मुलीकरिता 100%). इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क. इमाव प्रवर्गातील मुलींकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क. विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता फ्रिशीप. विजाभज विमाप्र विद्यार्थ्यांकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क. विमाप्र विद्यार्थ्यांकरिता शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क.

मॅट्रिकपूर्व (Pre-Matric) शिष्यवृत्ती योजना : इयत्ता 5 वी व 7 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इयत्ता 8 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इयत्ता 5 वी व 7 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मुलींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. इयत्ता 8 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींकरिता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. सैनिक शाळेत प्रशिक्षण घेणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजना. माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 5 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गात विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान करणे. PM-YASASVI मैट्रिकपूर्व शिष्यवृत्ती.

विद्यार्थ्यांनी करावयाची कार्ये :

महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे : सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युझर आयडी/पासवर्डची आता गरज नाही.

आधार आधारित नोंदणी : विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक वापरून नवीन महाआयडी बनवावा. आधार पोर्टलवर आपली सर्व माहिती (पत्ता, मोबाईल, ई-मेल आणि बँक खाते) अचूक व अद्ययावत ठेवावी.

दस्तऐवज संकलन : आवश्यक सर्व कागदपत्रे (जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके इत्यादी) स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करावीत.

नवीन व नूतनीकरण अर्ज : नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही अर्जासाठी नवीन महाआयडी/आधार लॉगिन करणे आवश्यक आहे. नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन नंतर "माझा अर्ज नूतनीकरण करावा' ही विशिष्ट टॅब निवडावी.

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्जदारांकडून संबंधित महाविद्यालय शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेत नसल्याने केंद्र हिस्सा विद्यार्थ्याच्या खात्यावर प्राप्त होताच संबंधित महाविद्यालयास शिक्षण शुल्काची रक्कम अदा करावी.

महाविद्यालयाने करावयाची कार्ये :

केवळ एकच लॉगिन (प्राचार्य लॉगिन) : महाविद्यालयासाठी आता केवळ एकच लॉगिन उपलब्ध असेल जे थेट महाविद्यालयाच्या प्राचार्याचे असेल (लिपीक लॉगिन पूर्णपणे बंद). ज्या महाविद्यालयांना अद्यापही लॉगिन पासवर्ड बाबत काही अडचणी असतील तर त्यांनी त्यांच्या संबंधित शैक्षणिक विभागास संपर्क साधावा.

प्रोफाईल व शुल्क निश्चिती : महाविद्यालयाने मागील युझर आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डने लॉगिन करून आपली प्रोफाईल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चित करण्यात आलेले शुल्क (Fee Structure) तत्काळ अद्ययावत करावे.

प्राचार्याची जबाबदारी : पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित (Pending) ठेवू नयेत, अर्ज विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठ्यण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्याची असेल.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेबाबत : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांकरिता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी (BEO) यांच्याशी समन्वय करून ऑनलाईन भरण्याकरिता संबंधितांना सहाय्य करावे.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करावा :

महाडीबीटी पोर्टलकरिता https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस उपरोक्त पोर्टलवरील लिंकवर किंवा टॅबवर "नागरिकांसाठी लॉगिन" किंवा "महाआयडीशिवाय प्रवेश करा" या पर्यायाचा वापर करून आधार बेस लॉगिन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडावा. त्यानंतर आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी अद्ययावत केल्यानंतर लॉगिन होईल. लॉगिन झाल्यानंतर पात्र योजनांचा तपशील अद्ययावत केल्यानंतर आपणास लागू होणाऱ्या विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होईल. आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेच्या नावासमोर 'पहा" क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर आपण निवड केलेल्या योजनांच्या समोर Apply टॅबवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी (उदा. वैयक्तिक माहिती चालू व मागील शैक्षणिक तपशील, योजने संबंधित आवश्यक कागदपत्रे) याप्रमाणे तपशील अद्ययावत करून अर्ज ऑनलाईन समाविष्ट सबमिट करावा व प्रिंट किंवा पीडीएफ मध्ये जतन करून ठेवावा. आवश्यक ती सर्व माहिती उदा. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्य, कौटुंबिक उत्पन्न इत्यादी पोर्टलमध्ये काळजीपूर्वक भरावी.

महाविद्यालयांसाठी सूचना :

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. इमाव, विजाभज, विमाप्र कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम घेवू नये. आपल्या महाविद्यालयाचे नाव, महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमांची नावे, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश शुल्क रचना इत्यादी माहिती पोर्टलवर मॅच करण्यासाठी संबंधित शैक्षणिक यंत्रणा (उदा. संचालनालयास/विद्यापीठास/परिषदेस/FRA) यांच्याकडून मॅच करून घेण्याची कार्यवाही करावी.

 अधिक माहितीकरिता ०२२-४९१५०८००/ १८००१०२५३९९ या नंबरवर अथवा ई-मेल आयडी helpdesk@mahadbt.gov.in यावर संपर्क साधावा. तक्रार निवारणासाठी तांत्रिक अथवा प्रशासकीय तक्रारीकरिता आपल्या लॉगिन मधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सविता किर्तीकर यांनी कळविले आहे.

                                                         00000000

No comments:

Post a Comment