गोंदिया, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया MahaDBT 2.0 या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. सन 2025-26 मधील शिष्यवृत्ती अर्ज अद्याप सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनाही विहित मुदतीत अर्ज सादर करता येणार आहेत.
या प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती यांसारख्या योजना ऑनलाइन राबविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांनी नवीन महाआयडी (Maha ID) तयार करणे आवश्यक असून आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करावे. आधारशी संबंधित वैयक्तिक माहिती, मोबाइल क्रमांक, ई-मेल व बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. आवश्यक कागदपत्रे स्पष्ट PDF स्वरूपात अपलोड करून अर्ज ऑनलाइन सादर करावा.
नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करावा’ हा पर्याय निवडावा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास सहकार्य करावे तसेच पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठवावेत.
अधिक माहितीसाठी 022-49150800 / 18001025311 किंवा helpdesk@mahadbt.gov.in येथे संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment