जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 21 August 2026

 






*तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा कार्यक्रम रानभाज्या या निसर्गाचे वरदान*

-        मुनेशजी रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया

 

गोंदिया,दि.21: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २१/०८/२०२६ रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता नविन प्रशासकिय इमारत, जयस्तंभ चौक गोंदिया येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती दिपाताई चंद्रिकापुरे कृषि व पशुसवर्धन सभापती जिल्हा परिषद गोंदिया, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. मुनेशजी रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया, मा. श्रीमती शैलेजा सोनवाने पंचायत समिती सदस्य नंगपूरा मुरी, मा.श्रीमती जितेश्वरी रहांगडाले पंचायत समिती सदस्य काटी, मा.श्री. अजित आडसुळे प्रकल्प संचालक आत्मा गोंदिया, मा.श्री. निलेश कानवडे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गोंदिया, मा.श्री. रूपेश मेश्राम प्रकल्प उपसंचालक आत्मा गोंदिया, मा.श्री. महेंद्र ठोकळे उपविभागीय कृषि अधिकारी गोंदिया, श्री. तिवारी नायब तहसिलदार गोंदिया, कु. नेहा आढाव तालुका कृषि अधिकारी गोंदिया आणि पाककला परिक्षक म्हणून प्राध्यापक श्रीमती तेजेश्वरी टेंभरे एस.एस. गर्ल्स हायस्कुल गोंदिया उपस्थित होते.

तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धाचे उद्घाटन मा. श्री. मुनेशजी रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया यांचे हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात मा. श्री. मुनेशजी रहांगडाले यांनी सांगितले कि, रानभाज्या या निसर्गाचे वरदान असून त्या त्यांच्यातील औषधीय गुणधर्मामुळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशिर आहेत. त्या फक्त पावसाळयामध्येच नैसर्गिकरीत्या मिळत असून त्याचा उपयोग आपल्या आहारात करावा. तसेच रानभाजी महोत्सव हा महोत्सवापुरताच न ठेवता दैनंदिन जिवनात लोकांना कसे उपलब्ध करता येईल याची सुचना कृषि विभागाला केली. मा. श्री. अजित आडसुळे प्रकल्प संचालक आत्मा यांनी सांगितले कि, नविन पिढीला रानभाज्यांचे महत्व कळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आपले पुर्वज रानभाज्यांचा समावेश आहारात करित होते त्यामुळे ते निरोगी व सुदृढ राहत होते. शरिराची रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी रानभाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे, जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहील. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. निलेश कानवडे यांनी विविध रानभाज्याबद्दल माहिती दिली. तसेच रानभाज्यावर प्रक्रिया करून त्यांचा वर्षभर वापर कसा करता येईल याकरिता प्रक्रिया उद्योगाबद्दल कृषि विभागाकडून संपर्क करून विविध योजनेची माहिती घेवनू अर्ज सादर करावा व कृषि विभागाच्या योजनांचा फायदा घ्यावा असे आव्हान केले. प्राध्यापक श्रीमती तेजेश्वरी टेंभरे यांनी शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच शरीरासाठी आवश्यक असणारी प्रथिने, खनिजे व सुक्ष्म गुणद्रव्ये व रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यासाठी रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच रानभाज्यांचे महत्व सांगितले. कु. नेहा आढाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राध्यापक श्रीमती तेजेश्वरी टेंभरे, कु. मृदुला कोळी तंत्र अधिकारी आणि कु. भावना शेंद्रे लिपीक यांनी पाककलेच्या स्टॉलचे परिक्षण केले.

तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा मध्ये तालुक्यातील नैसर्गिकरित्या उत्पादित झालेल्या रानभाज्यांचे व रानभाज्यांपासून बनविलेल्या पाककृतींचे स्टॉल लावण्यात आले होते. महोत्सवात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी व उमेदच्या बचत गटांनी सुध्दा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी जवळपास ६५ स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल मध्ये काटवल, सुरण, तरोटा, खापरखुटी, आंबाडी, सेवगा, मटारू, घोळभाजी, कोचईचे पाने, मशरूम, केना, पातुर भाजी इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता. महिला शेतकरी तसेच गटांमार्फत रानभाज्यांची व रानभाज्यांपासून बनविलेल्या खाद्य पदार्थाची विक्री करण्यात आली. यावेळी एकुण ३५४३० रुपयांची उलाढाल झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. टी.एस. तूरकर उपकृषि अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तालुका कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. सुनिल खडसे, कृषि अधिकारी श्री. मुनेश्वर ठाकुर, मंडळ कृषि अधिकारी श्री. रेशिम रामटेके, श्री. सुमित नंदनवार, उपकृषि अधिकारी श्री. जे.टी.मेंढे, श्री. किशोर रायसिडाम तसेच गोंदिया तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, कृषि सेवक तसेच सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हयातील उमेद व महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गटातील महिला, शेतकरी व गोंदिया शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment