गोंदिया, दि.20 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहाय्यता बचत गटांना शेतीसह पुरक व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना सन २०२६-२७ साठी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक पात्र बचत गटांकडून ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
दिनांक ६ डिसेंबर २०१२ च्या शासन निर्णयनुसार राबविण्यात येणाऱ्या या योजनेत १५ अश्वशक्तीचे युवराज २१५ मिनी ट्रॅक्टर, १.५ टन क्षमतेचा नॉन-टिपिंग ट्रेलर आणि ०.८ मीटर रोटावेटर यासाठी कमाल ३.५० लाख रुपये खर्च ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापैकी ९० टक्के म्हणजे ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान, तर उर्वरित १० टक्के म्हणजे ३५ हजार रुपये बचत गटाचा हिस्सा राहणार आहे.
योजनेसाठी आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा किंवा कृषी विभागाकडे नोंदणीकृत आणि नियमित आर्थिक व्यवहार करणारे स्वयं सहाय्यता बचत गट पात्र असतील. गटातील सदस्यांनी यापूर्वी पॉवर टिलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच प्रत्येक सदस्याचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे बंधनकारक आहे.
लाभार्थी बचत गटांना आवश्यक असल्यास ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी करण्याची मुभा राहील. मात्र शासनाकडून कमाल ३.१५ लाख रुपयांपर्यंतच अनुदान मिळणार असून अतिरिक्त खर्च संबंधित बचत गटाला स्वतः करावा लागेल.
योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर मान्यताप्राप्त उत्पादकाकडून ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करावी लागतील. खरेदीची पावती सादर केल्यानंतर आणि आवश्यक अटींची पूर्तता झाल्यावर टप्प्याटप्प्याने अनुदान लाभार्थी बचत गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. ट्रॅक्टरचा विमा, कायमस्वरूपी नोंदणी (Permanent Passing) आणि ट्रेलरची नोंदणी लाभार्थी गटाने स्वतःच्या खर्चाने करणे आवश्यक राहील.
शासनाने स्पष्ट केले आहे की, अनुदानातून मिळालेला ट्रॅक्टर विकणे किंवा गहाण ठेवणे हा बेकायदेशीर प्रकार मानला जाईल. अशा प्रकरणात संबंधित बचत गटावर फौजदारी कारवाई करून शासनाने दिलेले संपूर्ण अनुदान वसूल करण्यात येईल. तसेच संबंधित गटाला किमान पाच वर्षे शासनाच्या इतर योजनांसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
यापूर्वी अर्ज करूनही लाभ न मिळालेल्या बचत गटांनी नव्याने सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे आवश्यक आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थींची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.
इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयं सहाय्यता बचत गटांनी जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार किंवा इतर ओळखपत्र, रेशन कार्ड अथवा वीज बिलासह आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे दि.४ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment