पोलीस अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत बालस्नेही
दृष्टिकोनावर भर; अधिकाऱ्यांचा सहभाग
गोंदिया, दि.13 : बालकांच्या
संरक्षणासंदर्भातील कोणत्याही गुन्ह्यात तडजोड केली जाणार नाही. बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर
बाबी सक्षमपणे हाताळण्याबरोबरच त्यांचे सुरक्षित पुनर्वसन आणि समाजात
पुनर्एकात्मीकरण करण्यासाठी बालस्नेही वातावरण निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे
प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण
आयोग, मुंबई आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया
व भंडारा जिल्ह्यातील बाल कल्याण पोलीस अधिकारी, बाल कल्याण समिती, बाल न्याय
मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ तसेच बाल न्याय
अधिनियम २०१५ या विषयांवरील सचेतन कार्यशाळेचे आयोजन पोलीस मुख्यालयातील प्रेरणा
सभागृह, कारंजा येथे करण्यात आले. या कार्यशाळेत बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल
हक्क संरक्षण आयोग कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.
यावेळी आयोगाच्या सदस्या गीतांजली बुटी
यांनी बालकांशी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलता आणि समन्वयाने कार्य करण्याची
गरज व्यक्त केली. बालके हे देशाचे भविष्य असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि
सुरक्षित बालपण सुनिश्चित करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने बालस्नेही
दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रविण भुजाडे यांनी रस्त्यावर
राहणाऱ्या तसेच भिक्षावृत्तीत अडकलेल्या बालकांबाबत सामाजिक दायित्व स्वीकारून
पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. बाल भिक्षेकरी प्रणाली
संपुष्टात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी
अधोरेखित केली.
कार्यशाळेपूर्वी आयोगाचे सदस्य प्रविण
भुजाडे व गीतांजली बुटी यांनी गोंदिया येथील शासकीय मुलांचे निरीक्षणगृह (बालगृह)
आणि आसरा शिशुगृहाला भेट देऊन तेथील सुविधा व व्यवस्थेची पाहणी केली. बालकांसाठी
उपलब्ध सुविधा समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण
करून दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर यांनी POCSO
कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात
ॲड. परम आनंद यांनी बाल न्याय कायद्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या
बालकांबाबत माहिती दिली, तर वसीम शेख यांनी विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पुनर्वसन
प्रक्रियेवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले. सूत्रसंचालन बाल संरक्षण अधिकारी
गजानन गोबाडे यांनी केले, तर आभार रविंद्र टेंभूर्णे यांनी मानले. कार्यशाळेस
परिविक्षा अधिकारी रेश्मा मोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती कुळमेथे यांच्यासह
सुमारे १३५ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment