गोंदिया, दि.11 : देवरी तालुक्यातील
प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत वडेगाव येथे दि.6 ऑगस्ट रोजी दूषित
पाण्यामुळे अतिसाराची साथ उदभवली होती. गुरुवारपासून वडेगाव गावात अतिसाराचे रुग्ण
आढळून येत असून, पाच दिवसात 45 जणांना या आजाराची लागण झाली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत
गोल्हार यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य
विभागाचे एक पथक दि.6 ऑगस्टपासून वडेगाव येथे तैनात करण्यात आले आहे. हे पथक बाधित
रुग्णांवर उपचार करण्यासोबतच संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना
करीत आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या एकत्रित सहकार्याने साथरोग आटोक्यात
आणण्यात आले आहे. सद्यस्थितीत सर्व 45 बाधित रुग्णांची प्रकृती ठिक आहे.
दि.10 ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी साथरोग वडेगावला भेट देवुन देत असलेल्या आरोग्य
सेवा व प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती घेतली. यावेळी त्यांचेसोबत जिल्हा साथरोग
अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल, प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्लाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ.वंजारी व डॉ.रामकृष्ण येळणे यांचेसह इतर कर्मचारी उपस्थित होते.
गावात पिण्याच्या पाण्यासाठी 3
बोअरवेल, 3 सौरपंप तसेच नळ योजनेच्या 2 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यावर आवश्यक
क्लोरिनेशन व पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्याचबरोबर
ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता, पाईपलाईन व नळ
दुरुस्ती तसेच साफसफाई करण्याच्या सुचना दिल्या. भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा
उदभवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
साथरोग नियंत्रण आरोग्य पथकाव्दारे
घरोघरी जाऊन तापाचे किंवा इतर साथरोगांचे रुग्ण शोधणे, पिण्याच्या पाण्याच्या
स्रोतांची तपासणी करणे, क्लोरिन व ब्लीचिंग पावडरची मात्रा तपासणे आणि दूषित
पाणीपुरवठा रोखणे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांसाठी डासांची उत्पत्ती केंद्र
नष्ट करणे आणि औषध फवारणी करणे. नागरिकांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, उकळून पाणी पिणे
आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या सुचना यावेळी दिल्या.
साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असुन पावसाळ्यात
डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला आणि गॅस्ट्रोसारख्या संसर्गजन्य आजारांचा फैलाव
रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार
0000000
No comments:
Post a Comment