गोंदिया, दि. 15 ऑगस्ट : अपर तहसील कार्यालय, चिचगड येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.
14 वर्षांपासून प्रलंबित वनहक्क प्रकरणांना मिळाला न्याय
या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सामूहिक वनहक्क फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
संबंधित ग्रामपंचायतींना सामूहिक वनहक्काचे पट्टे यापूर्वीच प्राप्त झाले होते. मात्र फेरफार प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सातबारा उतारे उपलब्ध झाले नव्हते. तहसील कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांतून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि संबंधित ग्रामपंचायतींना सातबारा उताऱ्यांचे वितरण करण्यात आले.
यामुळे वनहक्कधारक ग्रामपंचायतींच्या हक्कांची महसुली नोंद अधिकृतरीत्या पूर्ण झाली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रीराम विद्यालय, चिचगड येथील सुमारे 700 विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद शाळेतील सुमारे 150 विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले. देशभक्तीपर घोषणा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राष्ट्रप्रेमपर उपक्रमांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
कार्यक्रमादरम्यान महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्यांचे जतन आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सक्रिय सहकार्य करण्याचा संकल्प केला.
No comments:
Post a Comment