जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 31 August 2026

गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

 



गोंदिया, दि.31 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज सोमवार (दि.31 ऑगस्ट) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीत जिल्ह्यातील एकूण ११,२३,८०५ मतदारांचा समावेश असून नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मंदार पत्की यांनी राजकीय पक्षाच्या आयोजित बैठकीत केले.
प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ९,६३,१५९ (८५.७१%) पडताळणी झालेले मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय 63-अर्जुनी मोरगावमध्ये २,२९,८८२ (८८.७१%), 64-तिरोडा २,२२,५५३ (८३.०८%), 65-गोंदिया २,६८,२३७ (८२.२९%) आणि 66-आमगाव २,४२,४८७ (८९.५४%) मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, पत्ता न सापडलेले, दुबार किंवा अन्य ठिकाणी नोंद असलेले असे १,६०,६४६ (१४.२९ %) मतदार स्वतंत्र यादीत समाविष्ट करण्यात आले असून ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हास्तरावर तसेच सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
दरम्यान, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदार यादीबाबतचे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000000

No comments:

Post a Comment