जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601
Thursday, 20 August 2026
‘पहा, जाणा, बदल दिसल्यास उपचार करा’ हा कानमंत्र; स्तन कर्करोगावर मात करण्यासाठी जनजागृतीची गरज
गोंदिया, दि.20 : "पहा, जाणा,
बदल दिसल्यास त्वरित उपचार करा" हा स्तन कर्करोगावर मात करण्याचा प्रभावी
कानमंत्र देत 18 ऑगस्ट 'स्तन कर्करोग संशोधन दिवस' निमित्त आयोजित जनजागृती
कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील सुमारे 100 प्रभावशाली महिलांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमातून स्तन कर्करोगाबाबत जागरूकता, नियमित
तपासणी, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर उपचार केल्यास हा आजार पुर्णपणे
बरा होऊ शकतो, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
बी.जे.
हॉस्पिटल, गोंदिया यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध
लॅप्रोस्कोपी व ऑन्को सर्जन डॉ. विकास जैन, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन,
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लता जैन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेच्या
अध्यक्षा डॉ. शेफाली जैन, डॉ. अवि जैन, डॉ. जुली जैन, डॉ. निलेश जैन, डॉ. विवेक
जैन तसेच बी. जे. हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय चमूच्या सहकार्याने कार्यक्रम
आयोजित करण्यात आला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन
करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिलांनीही हातातील दीप प्रज्वलित करून स्तन
कर्करोग जनजागृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रास्ताविकात
डॉ. राजेंद्र जैन यांनी स्तन कर्करोगाबाबत जनजागृती ही काळाची गरज असल्याचे सांगून
या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी नियमित
तपासणी करून कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे
त्यांनी नमूद केले.
यावेळी
डॉ. विकास जैन यांनी 18 ऑगस्ट हा दिवस 'स्तन कर्करोग संशोधन दिवस' म्हणून पाळला
जात असल्याची माहिती दिली. भारतातील प्रत्येक आठ महिलांपैकी एका महिलेला आयुष्यात
कधीतरी स्तन कर्करोगाचा धोका असू शकतो, असे सांगून त्यांनी या आजाराबाबत समाजात
असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. सध्या अत्याधुनिक संशोधनामुळे अनुवंशिक
पद्धतीने स्तन कर्करोग होण्याच्या शक्यतेची तपासणी करणाऱ्या चाचण्याही उपलब्ध
झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. वेळेत निदान व योग्य उपचार झाल्यास स्तन
कर्करोगावर पुर्णपणे मात करता येते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. शेफाली जैन यांनी स्तन
कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे, नियमित स्व-स्तन तपासणीचे महत्त्व आणि महिलांनी
घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्तनात गाठ जाणवणे, त्वचेत बदल
होणे, स्तनाग्रातून असामान्य स्त्राव होणे अथवा इतर कोणतेही संशयास्पद बदल
दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू
करावेत, असे त्यांनी आवाहन केले.
डॉ. अवि जैन यांनी आधुनिक
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी तपासणीचे महत्त्व स्पष्ट
केले. मॅमोग्राफीद्वारे स्तन कर्करोग अगदी सुरुवातीच्या अवस्थेत ओळखता येतो.
त्यामुळे उपचार वेळेत सुरू होऊन रुग्ण पुर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक वाढते,
असे त्यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी अंजू
कांबळे-निमसरकर यांनी आपल्या मनोगतात स्तन कर्करोगावर यशस्वी मात केलेल्या
महिलांची उदाहरणे देत त्यांच्या जिद्दीचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. स्तन हा
स्त्रीच्या मातृत्वाचे, सौंदर्याचे आणि आरोग्याचे प्रतीक असून त्याचे आरोग्य जपणे
ही प्रत्येक महिलेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक महिलेने
स्वतः जागरूक राहून आपल्या कुटुंबातील व परिसरातील महिलांमध्येही जनजागृती
करण्याचे आवाहन केले.
यावेळी स्तन कर्करोगावर
यशस्वी मात केलेल्या प्रीती शामका यांनी स्वतःचा प्रेरणादायी अनुभव कथन केला.
आरोग्याची व आहाराची योग्य काळजी घेत असूनही त्यांना स्तन कर्करोगाचे निदान झाले.
मात्र वेळेत उपचार, सकारात्मक विचार आणि कुटुंबाच्या भक्कम पाठबळामुळे त्या या
आजारातून पूर्णपणे बाहेर पडल्या. त्यांच्या अनुभवामुळे उपस्थित महिलांमध्ये
आत्मविश्वास निर्माण झाला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी
स्तन कर्करोगासंदर्भात विविध प्रश्न विचारले. तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व प्रश्नांची
समाधानकारक उत्तरे देत शंकानिरसन केले. अनेक महिलांनी स्वतःच्या किंवा कुटुंबातील
सदस्यांच्या कर्करोगाशी संबंधित अनुभव मोकळेपणाने मांडल्याने कार्यक्रम अधिक
संवादात्मक आणि परिणामकारक ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी
उपस्थित महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचा, स्तन कर्करोगाबाबत समाजात
जनजागृती करण्याचा आणि "पहा, जाणा, बदल दिसल्यास उपचार करा" हा संदेश
प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन
डॉ. लता जैन यांनी केले.
0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment