जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday, 30 September 2026

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा जिल्हा व तालुकास्तरीय निकाल घोषित; राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार जिल्हास्तरावर प्रथम

 


गोंदिया दि.30 : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-2026' चा अंतिम निकाल जिल्हा प्रशासनाकडून अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक उत्सव, सामाजिक बांधिलकी, सुरक्षितता आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणाऱ्या मंडळांचे मूल्यमापन करून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत गोरेगाव तालुक्यातील राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ, मुंडीपार या मंडळाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विजेत्या मंडळांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे :

1) राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळ मुंडीपार, तालुका-गोरेगाव : जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक.

2) बाल गणेश उत्सव मंडळ पाटेकुर्रा, तालुका-सडक अर्जुनी : जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक

3) नवज्योत गणेश उत्सव मंडळ गोंदिया, तालुका-गोंदिया : जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक

4) अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ आमगाव, तालुका-आमगाव  : तालुका स्तरावर प्रथम क्रमांक

5) नवयुवक किसान गणेश मंडळ देवरी, तालुका-देवरी : तालुका स्तरावर प्रथम क्रमांक

6) सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ अर्जुनी मोरगाव, तालुका-अर्जुनी मोरगाव : तालुका स्तरावर प्रथम क्रमांक

मूल्यमापनाचे निकष आणि उद्दिष्ट :

या स्पर्धेचे आयोजन करण्यामागे गणेशोत्सवाला अधिक पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीशील बनवणे हा मुख्य उद्देश होता. जिल्हा गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे तसेच जिल्हा गणेशोत्सव समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. रुपेशकुमार राऊत यांनी माहिती दिली की, सर्व सहभागी मंडळांचे मूल्यमापन करताना पर्यावरणपूरक (शाडूच्या मातीची) मूर्ती, सजावटीमध्ये प्लास्टिक व थर्माकोलचा शून्य वापर, ध्वनी प्रदूषणाचे नियमन, आरोग्य शिबिरे, रक्तदान आणि वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम या निकषांना विशेष गुण देण्यात आले होते.

जिल्हा प्रशासनाचा संदेश :

सर्व विजेत्या आणि सहभागी गणेशोत्सव मंडळांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला आणि पर्यावरणपूरक संदेशाला मोठी चालना मिळाली आहे. भविष्यातही इतर मंडळांनी या आदर्श पावलांवर पाऊल ठेवून उत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विजेत्या मंडळांना जाहीर झालेले अधिकृत पुरस्कार व सन्मानचिन्ह लवकरच एका विशेष समारंभात प्रदान केले जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

                                                              00000000

 

No comments:

Post a Comment