तिरोडा, अर्जुनी मोरगावसह 6
तालुक्यातील 16 बालकांवर नागपूरच्या प्रवीरा हॉस्पिटलमध्ये
मोफत
शस्त्रक्रिया यशस्वी
गोंदिया, दि.30 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने
राबविण्यात येत असलेल्या 'सेवा संकल्प अभियाना' अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील गंभीर
अस्थिभंग असलेल्या बालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक वैद्यकीय
उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) व जिल्हा
प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र (DEIC), गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील एकूण १६ गरजू बालकांवर
नागपूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी अधिकृत माहिती . राष्ट्रीय
बाल स्वास्थ्य कार्यक्रम गोंदियाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक (RBSK) संजय बिसेन
यांनी दिली आहे.
सहा
तालुक्यांमधील बालकांचा समावेश :
RBSK आणि DEIC च्या चमूने संपूर्ण जिल्ह्यात
राबविलेल्या शोधमोहिमेत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या १६ बालकांमध्ये
जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रांमधील बालकांचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक
तिरोडा तालुक्यातील ५, अर्जुनी मोरगाव ४, गोरेगाव २, देवरी २, सडक अर्जुनी २ आणि
सालेकसा तालुक्यातील १ अशा एकूण १६ बालकांवर या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
पडल्या.
22 व 25 सप्टेंबर
रोजी यशस्वी शस्त्रक्रिया :
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत
(RBSK) ग्रामीण व दुर्गम भागात घेतलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये या
बालकांच्या अस्थिभंगाचे व हाडांच्या विकृतीचे वेळेत निदान करण्यात आले होते.ही
बालके आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल कुटुंबातील असल्याने त्यांना पुढील तातडीच्या
उपचारांसाठी नागपूर येथील नामांकित प्रवीरा चाइल्ड हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.
तेथे दि.२२ आणि २५ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. विराज शिंगाडे व
त्यांच्या वैद्यकीय चमूच्या हस्ते या बालकांवर अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया
करण्यात आल्या.
वरिष्ठ
अधिकाऱ्यांचे सक्षम मार्गदर्शन :
सदर संपूर्ण मोहीम व शस्त्रक्रिया प्रक्रिया
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले
व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या थेट देखरेखीखाली आणि सक्षम
मार्गदर्शनाखाली अत्यंत चोखपणे पार पाडण्यात आली.
RBSK व DEIC
चे सातत्यपूर्ण कार्य :
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गोंदिया
जिल्ह्यातील गरजू बालकांना वेळेवर आवश्यक वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध
करून दिल्या जात आहेत. बालकांच्या आरोग्यविषयक विविध समस्यांचे वेळेत निदान करणे,
त्यांच्यावर दर्जेदार उपचार करणे आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांचा पुढील योग्य पाठपुरावा
करण्यासाठी RBSK व DEIC ची टीम जिल्हाभरात सातत्याने अविरत कार्य करत आहे, असेही
जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक संजय बिसेन यांनी स्पष्ट केले आहे.
लाखो रुपयांचा खर्च असणाऱ्या या शस्त्रक्रिया
पूर्णपणे मोफत झाल्यामुळे बालकांना नवीन आयुष्य मिळाले असून, त्यांच्या पालकांनी
शासनाचे व जिल्हा आरोग्य प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
0000000
No comments:
Post a Comment