जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Friday, 3 July 2026

विशेष लेख... मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम-2026

 


           भारत निवडणूक आयोगाने दिनांक १४ मे २०२६ रोजीच्या पत्राद्वारे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यासह गोंदिया जिल्ह्यातही ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व अचूकता सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.

          या पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणी केली जाईल.

          मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. प्रारूप मतदार याद्या ०५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यानंतर ०५ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल. पुढे ०५ ऑगस्ट ते ०३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा करण्यात येईल. अंतिम मतदार याद्या ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.

         या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबीयांचे नाव मतदार यादीत तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. आवश्यक असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मदतही मिळू शकते.

         जर मतदाराचा तपशील उपलब्ध नसेल किंवा डेटाबेसशी जुळत नसेल, तर संबंधित मतदारास नोटीस देण्यात येईल. अशावेळी मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी विविध कालावधीप्रमाणे कागदपत्रांची अट निश्चित करण्यात आली आहे.

          ०१ जुलै १९८७ पूर्वी जन्म झालेल्या व्यक्तींना स्वतःची ओळख सिद्ध करणारे एक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. ०१ जुलै १९८७ ते ०२ डिसेंबर २००४ दरम्यान जन्म झालेल्या व्यक्तींना स्वतःबरोबरच पालकांचेही कागदपत्र सादर करावे लागेल. तर ०२ डिसेंबर २००४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तींना स्वतः, वडील व आई यांचे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, जमीन वाटप प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. आवश्यकतेनुसार परदेशात जन्म झाल्यास संबंधित दूतावासाचे प्रमाणपत्र किंवा नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

        जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत आहे याची खात्री करून घ्यावी तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या व बदल वेळेत करावेत. या प्रक्रियेमुळे निवडणूक प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासार्ह व अचूक होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. सर्वांनी वेळेवर आपली कागदपत्रे सादर करून या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

           या संपूर्ण प्रक्रियेत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून नागरिकांनीही जागरूक राहून आपली नावे मतदार यादीत अचूकरीत्या नोंदविण्यास सहकार्य करावे, हीच अपेक्षा आहे.       

  

-जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

 000000000


No comments:

Post a Comment