जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Monday, 13 July 2026

यशोगाथा... प्रगतशील शेतकरी श्री. दादा रामजी फुंडे

 





        गोंदिया, दि.13 : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खारी सुकळी येथील शेतकरी श्री. दादा रामजी फुंडे यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत वर्ष 2023 मध्ये  उद्यानपंडित पुरस्कार सन 2023 घोषित झाला असून नुकताच विद्यमान राज्यपाल यांच्या हस्ते उद्यान पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       सुरुवात साधी, ध्येय मोठे : परंपरागत शेतीतून सुरुवात करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, बदलत्या काळानुसार त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा निर्धार केला आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात केली.

       विविध पिकांची यशस्वी लागवड : श्री. फुंडे यांनी आंबा, पेरू, चिकू, सीताफळ यांसह विविध भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत वाढवले. त्यांनी स्वतःची रोपवाटिका सुरू करून भाजीपाल्याची दर्जेदार रोपे तयार करून विक्रीही सुरू केली.

       सेंद्रिय शेतीचा अवलंब : रासायनिक खतांपासून दूर जात त्यांनी सेंद्रिय खत, जीवामृत, दशपर्ण अर्क यांचा वापर सुरू केला. गांडूळ खत व कंपोस्ट खताची स्वतः निर्मिती करून उत्पादन खर्च कमी केला आणि मातीची सुपीकता वाढवली.

       पाणी व्यवस्थापनात स्मार्ट पद्धती : ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची बचत केली. प्लास्टिक मल्चिंगद्वारे बाष्पीभवन कमी करत उत्पादनात लक्षणीय वाढ साधली.

       पर्यावरणपूरक किटक नियंत्रण : रासायनिक कीटकनाशकांऐवजी फेरोमोन सापळे, चिकट सापळे आणि जैविक उपायांचा वापर करून त्यांनी सुरक्षित व निरोगी शेतीचा आदर्श निर्माण केला.

          आधुनिक शेतीकडे वाटचाल : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेडनेट हाऊस उभारून कोबी, मिरची, चवळी यांसारखी पिके घेतली. तसेच APEDA अंतर्गत नोंदणी करून निर्यातक्षम शेतीकडेही त्यांनी पाऊल टाकले.

        समूह शेती व मार्गदर्शन : ‘योगश्री एफपीओ’ आणि शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सामूहिक शेतीला चालना दिली. विविध प्रशिक्षण, प्रदर्शन आणि सोशल मीडियाद्वारे ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

          प्रेरणादायी निष्कर्ष : श्री. दादा रामजी फुंडे यांची ही यशोगाथा दाखवून देते की, नवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय पद्धती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर शेतीत मोठे यश मिळवता येते. त्यांच्या कार्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी प्रेरित होत असून, आधुनिक शेतीचा मार्ग अधिक बळकट होत आहे.

00000000

No comments:

Post a Comment