गोंदिया, दि .17: महसूल व वन विभागाच्या
पुढाकारातून गोंदिया जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत “महसूल जनकल्याण शिबिरे” आयोजित करण्यात येणार असून,
नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा तत्काळ निपटारा तसेच विविध शासकीय योजनांचा
लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
अभियान” अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात विशेष
महसूल जनकल्याण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमधून नागरिकांना महसूल
विभागाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने देण्यात येणार आहेत. तसेच
विविध शासकीय योजनांची माहिती व लाभही याच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे नागरिकांना
शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या टाळता याव्यात आणि सर्व सेवा गावपातळीवर उपलब्ध
व्हाव्यात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या गरजा लक्षात घेऊन शिबिरांचे नियोजन
करण्यात आले असून, संबंधित लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था
आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे शिबिरे पार पडणार आहेत.
शिबिरांचे
वेळापत्रक : 22 जुलै 2026 रोजी
गोंदिया विधानसभा (65) – ठिकाण : जलाराम लॉन, गोंदिया. तिरोडा-गोरेगाव (64) – अटल बिहारी वाजपेयी
सभागृह, तिरोडा. देवरी-आमगाव (66) – ठिकाण : विजयालक्ष्मी सभागृह, आमगाव येथे
शिबिराचे आयोजन होणार आहे. तर अर्जुनी मोरगाव (63) – 25 जुलै 2026, ठिकाण :
आशिर्वाद मंगल कार्यालय, सडक अर्जुनी येथे होणार आहे.
गोंदिया, तिरोडा, आमगाव आणि सडक अर्जुनी
या तालुक्यातील शिबिरासाठी अनुक्रमे चंद्रभान खंडाईत, पूजा गायकवाड, कविता गायकवाड,
ज्योती कांबळे या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नागरिकांना
आवश्यक सेवांसाठी मार्गदर्शन व तत्काळ निर्णय देण्यावर भर राहणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी
आपल्या संबंधित विधानसभा क्षेत्रातील शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय
योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment