जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Tuesday, 7 July 2026

गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ; कोट्यवधींचे अनुदान वितरण

 

विशेष वृत्त

 


       गोंदिया, दि.7 : राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यात करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. या योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी वितरित करण्यात आला असून जिल्ह्यातील २,११,७७३ लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली.

         राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना आणखी ६ हजार रुपयांची भर पडत असून, या योजनेचा सातवा हप्ता ९ सप्टेंबर २०२५ रोजी वितरित करण्यात आला आहे.

        कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे. विविध योजनांतर्गत एकूण ७४८ लाभार्थ्यांना ६ कोटी ८२ लाख ७९ हजार ७१२ रुपयांचे अनुदान थेट खात्यात (DBT) जमा करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा समावेश आहे.

        दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरी २३,७२३ हेक्टर क्षेत्र असताना सन २०२४-२५ मध्ये ३१,०६७.४७ हेक्टर (१३०.९५ टक्के) क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली. हरभरा, गहू, मका, उडीद, मसूर, मोहरी यांसह विविध पिकांचा यात समावेश आहे.

        शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत असून अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास १ ते २ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. चालू वर्षात जिल्ह्यात १२४ प्रस्ताव मंजूर झाले असून ७५ लाभार्थ्यांना १ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जानेवारी 2026 पासून ते 30 जून 2026 पर्यंत आणखी 76 शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी आर्थिक लाभ मिळणार आहे.

        महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमालाही वेग आला असून २०२५-२६ साठी १५०० हेक्टर लक्ष्यापैकी आतापर्यंत १०५१.६२ हेक्टर क्षेत्रावर आंबा, बोर, लिंबू, केळी, फणस यांसारख्या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे.

        एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत महाडिबीटी पोर्टलद्वारे विविध घटकांसाठी अनुदान दिले जात असून ४९० हून अधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

         याशिवाय, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे जिल्ह्यात लघु उद्योगांना चालना मिळाली असून आतापर्यंत ७८३ अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजूर होऊन ते कार्यान्वित झाले आहेत.

         एकूणच, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेती व संबंधित व्यवसायांना नवी गती मिळत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होत आहे.

                                                               00000000

No comments:

Post a Comment