गोंदिया,दि. 6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष पुनरावलोकन (Special Intensive Revision) कार्यक्रमाला गती मिळाली असून 20 जून 2026 ते 7 जुलै 2026 या कालावधीत घराघरात जाऊन मतदार पडताळणीचे काम करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत एकूण 11 लाख 23 हजार 805 मतदारांची नोंद असून 29 जून 2026 पर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदारांना गणना पत्रकांचे वितरण करण्यात आले आहे. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडत असून नागरिकांनी दिलेली माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, बहुतांश ठिकाणी 80 टक्क्यांहून अधिक गणना पत्रके वितरित झाली आहेत. तसेच काही मतदारसंघांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्याप काही प्रमाणात पत्रके वितरित होणे बाकी आहे.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली नावे, पत्ता, वय आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या सुधारणा BLO यांच्याकडे कराव्यात. चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास तत्काळ दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
दरम्यान, मतदार यादीत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सर्व पात्र नागरिकांची नोंद सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून 24x7 नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात असून, मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही सांगण्यात आले आहे. voters.eci.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन गणना पत्रक सादर करता येईल.
No comments:
Post a Comment