गोंदिया, दि.27 :
राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध
प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना
मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल
यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे
मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर
पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.
यापूर्वी पिकस्पर्धेची
सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता
आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज
स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात
आलेली आहे.
त्यानुषंगाने अन्नधान्य,
कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत
खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत.
सर्वसाधारण व आदिवासी
गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता
आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची
निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप हंगाम मधील एकूण ११ पिकांसाठी
स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड
होणार आहे.
पिकस्पर्धेतील खरीप पीके :- भात,
ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल.
पात्रता निकष :- स्पर्धेत
भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे
आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी
स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थ्यांच्या स्वतःच्या शेतावर
भात पिकासाठी किमान २० गुंठे तसेच उर्वरित पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्रावर
सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक
कागदपत्रे :- फार्मर आयडी. ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. जात
प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास). बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित
प्रत.
अर्ज दाखल करण्याची अंतीम
तारीख; खरीप हंगाम :- मूग व उडीद पिक :- ३१ जुलै २०२६. भात, ज्वारी, बाजरी, मका,
नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल :- ३१ ऑगस्ट २०२६.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
:- पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३००/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम
१५०/- राहील.
बक्षिस स्वरूप :- तालुका
पातळीवर पहिले पुरस्कार 5,000 रुपये, द्वितीय 3,000 आणि तृतीय 2,000 रुपये असे
आहे. जिल्हा पातळीवर प्रथम पुरस्कार 10,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 7,000 आणि तृतीय पुरस्कार
5,000 आहे. राज्य पातळीवर प्रथम पुरस्कार 50,000 रुपये, द्वितीय पुरस्कार 40,000
आणि तृतीय पुरस्कार 30,000 असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.
तरी जास्तीत जास्त
शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी होण्याकरिता कृषी विभागाच्या संकेतस्थळावर
http://krishi.maharashtra.gov.in "पीक स्पर्धा नोंदणी" टॅबवर जाऊन
ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबत
अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी
संपर्क साधावा.
0000000
No comments:
Post a Comment